अॅड. रिया करंजकर
घडाळ्याच्या पुढे पळणाऱ्या या जगामध्ये किंवा कुठे कधी काही होईल, हे सांगता येत नाही. समोर दिसणारी गोष्ट क्षणात कधी नाहीशी होईल. याची शाश्वती या धावपळीच्या युगामध्ये कोणालाही देता येत नाहीये. या पळणाऱ्या जगामध्ये जो काही जास्त परिणाम होत आहे तो नव्या पिढीवर. दिवसेंदिवस नवीन पिढी बिघडत चालली आहे. काही चांगल्या गोष्टीमुळे, तर काही वाईट गोष्टींमुळे. त्याचे मूळ कारण त्यांची घरची परिस्थिती, ज्यांच्यासोबत असतात ते मित्र-मैत्रिणी यांचा सर्रास परिणाम या नवीन पिढीवर होत आहे.
यश हा तरुण मुलगा घरची परिस्थिती बेताची. आई घरकाम करणारी, वडील रोजंदारीवर काम करणारे, बहिण घरकाम करणारी, मोठा भाऊ तर घरातच बसून काहीच कामधंदे न करणारा, अशा गरीब परिस्थितीत तो वाढत होता. आजूबाजूची, शेजाऱ्यांची परिस्थितीही तशीच होती. पत्राच्या झोपडीमध्ये दिवस काढत होते. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण अर्धवट राहून गेलं होतं. बाकी सगळे कामाला घरात भाऊ आणि हाच असल्यामुळे नको त्या मित्रांच्या संगतीमध्ये वाढू लागला. मुलांना चार घास मिळावे म्हणून आई-वडील कष्ट करत होते आणि त्यामुळे त्यांचं मुलांकडे लक्ष कमी होऊ लागलं होतं आपली मुलं कोणासोबत राहतात, काय करतात या गोष्टींचा विचार आई-वडील करत नव्हते आणि मित्रांच्या संगतीत राहून यश लहान वयातच दारूच्या व इतर सर्व व्यसनाच्या अधीन झाला. व्यसन करत राहायचं आणि आजूबाजूच्या शेजारी लोकांशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करत राहायचं ही त्याची दिनचर्या होत चालली होती. खेळत बसायचं, पण आई-वडिलांसोबत कुठे काम धंदा मिळतो का? याचा कुठलाही विचार तो करत नव्हता.
दारूसाठी पैसे मिळावेत म्हणून तो आई-वडिलांना नको नको ते शब्द बोलून शिव्या देऊन पैसे मिळवत असे. आई-वडील मुलगा आहे, जाऊ दे भांडण नको, घरामध्ये शांतता राहावी म्हणून मागितले पैसे देत होते. त्यांच्या शेजारी राहणारे बापू हे व्यसनी होते. म्हणजे आजूबाजूचा परिसर हा गरीब लोकांचा आणि व्यसनाधीन झालेला असा परिसर होता. लहान-मोठ्यांपासून सगळेच व्यसनी बनलेले होते. त्याच्यामुळे संध्याकाळ झाली की, शेजारी एकमेकांना शिव्या घालण्यापासून सुरुवात होत असे. बापू वयस्कर होते आणि मुलं खेळायला लागली की, त्यांना त्रास व्हायचा. मग ते शिव्या द्यायला लागायचे. असेच एकदा यश आणि त्याचे मित्र समोर क्रिकेट खेळत होते त्यावेळी त्यांनी भांडण सुरू केले. मुलांना शिव्या दिल्या. क्रिकेट खेळू नका, असं सांगितलं आणि परत दुसऱ्या दिवशी त्याने भांडण केलं की क्रिकेट खेळू नका, त्रास होतोय. त्या वेळी त्यांचे ऐकून घेतलं आणि तिसऱ्या वेळी ते पुन्हा शिव्या द्यायला लागले त्यावेळी तेही दारू प्यायलेले होते आणि क्रिकेट खेळणारी मुलेही दारू प्यायलेली होती.
त्यामुळे यशला जास्त राग आला. तो दारूच्या नशेत होता आणि तो त्यांच्याशी भांडायला लागला आणि यश तरुण होता आणि बापू वयस्कर होते. एकमेकांना शिव्या देता देता यशने त्यांना धक्का दिला. धक्का दिल्यावर बापू खाली पडला कारण, तोही दारू पिऊन आलेला होता. स्वतःचा तोल त्याला स्वतःला संभाळता येत नव्हता. बापू खाली पडला नि बेशुद्ध झाला आणि यश दारूच्या नशेत असल्यामुळे त्याने त्याच्या छातीवर, त्याच्या तोंडावर लाथा मारायला सुरुवात केली. तो बेशुद्ध झालेला आहे, याचे भान त्याला त्यावेळी नव्हतं. आजूबाजूच्या लोकांनी येऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मारत होता त्याच वेळी शेजारच्या लोकांनी त्याचे व्हीडिओ शूटिंग केलं.
बापूची बायको धावत आली आणि तिने आपल्या पतीला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. बापू दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला. बापूच्या बायकोने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्याने यशला पोलिसांनी पकडून कस्टडीत ठेवलं. आधी मारामारीची तक्रार झाली होती. आता ज्याला मारलं होतं, त्या बापूचं निधन झाल्यामुळे खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. बापू हा २४ तासांच्या आत गेलेला होता. त्यामुळे यशच्या अडचणी वाढल्या होत्या. घरच्यांना वाटलं, तो आता २-३ दिवसांनी सुटेल. पण बापूचे निधन आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यामुळे म्हणजेच तिथल्या लोकांनी यशला बापूंना लाथेने मारतानाचे शुटिंग पोलिसांच्या हाती सापडले. त्याच्या पायाच्या चप्पलचे वळ हे बापूच्या चेहऱ्यावर व छातीवर सापडलेले होते. त्यामुळे यशविरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना मिळालेला होता. त्यामुळे यशला जामीन मिळत नव्हता. कारण वकील करण्याची परिस्थिती यशच्या घरची नव्हती. त्यामुळे चार्जशीट पडूनही यश जेलमध्ये होता. त्याच्या घरातल्या लोकांचे त्याला जेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते.
घराला सावरण्यासाठी आई-वडील काबाड कष्ट करत होते. त्यामुळे आपल्या मुलांना चांगला माणूस घडवण्यासाठी ते कमी पडत होते. दोघेही घराबाहेर असल्यामुळे आपली मुलं काय करतात त्यावर त्यांचे लक्ष नव्हते. मुलं दारूसाठी कुठल्याही थराला जातात. घरात भांडणं नको म्हणून आई-वडील त्यांना पैसे देत होते. पण हा आपला व्यसनाधीन झालेला मुलगा एखाद्याचा खून करील, याची कल्पना त्यांच्या आई-वडिलांना नव्हती. २ दिवस बापू येऊन खेळताना त्यांना शिवीगाळ करत होता व २ दिवसानंतर हाच राग यशने त्या बापूंवर काढला. नशेत असल्याने आपण काय करतो आहे, यावर ताबा त्याचा राहिला नाही. ज्या वेळी पोलिसांनी त्यांना पकडून कस्टडीत ठेवले व जेव्हा त्याची दारूची नशा उतरली तेव्हा त्याला कळले, आपण दारूच्या नशेत मोठी चूक केली आहे. जेलमधून बाहेर काढण्यासाठी तो आपल्या घरातल्यांना विनवणी करत होता. पण घरची आर्थिक परिस्थिती त्याला बाहेर काढू शकत नव्हती.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)