मुंबई : ठिय्या आंदोलन करत रेल्वे फलाटावर बसलेले एसटी कर्मचारी ऐकत नसल्याने पोलिसांनी शक्कल लढवत त्यांना वडापाव देण्याच्या बहाण्याने १८ क्रमांकाच्या फलाटावर नेले आणि ताब्यात घेतले.
शनिवारी पहाटे एसटी कर्मचा-यांना आझाद मैदानातून पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर ते सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. मात्र काही काळानंतर त्यांनी येथून हालण्यासाठी नकार दिल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनसवर संपकऱ्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्याचे ठरवले. याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत वडापावचे आमिष दाखवले. यानंतर घटनेला वेगळे वळण मिळाले.
वडापावची बातमी संपकऱ्यांमध्ये पसरली. कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सगळ्यांनी १८ नंबर फलाटावर चला, वडापाव मिळेल, असे आश्वासनही दिले. आणि तेच वडापाव खाण्यासाठी १८ क्रमांक फलाटावर आलेले एसटी कर्मचारी फसले आणि अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.