Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

सोमय्या पिता-पुत्र आज पोलीस चौकशीला गैरहजर

सोमय्या पिता-पुत्र आज पोलीस चौकशीला गैरहजर

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होते. मात्र सोमय्या पिता-पुत्र आज चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र आज ते चौकशीला गैरहजर राहणार आहेत.


सोमय्या यांच्या वकिलांनी माहिती दिली की, 'आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.'


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोप प्रकरणी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सत्र न्यायालयात 11 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपयांचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी सोमय्या यांनी राजभवनात जमा केलेला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


यासंदर्भात किरीट सोमय्या म्हणाले होते की, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते असा सवालही त्यांनी केला. मात्र त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्वीटचा आधार घेत 58 कोटींचा आरोप आता 140 कोटी रुपयांवरही नेऊन ठेवला आहे, असं म्हटलं होतं.

Comments
Add Comment