Saturday, June 14, 2025

एक धाव वीज सुरक्षेसाठी!

एक धाव वीज सुरक्षेसाठी!

कल्याण परिमंडलात मॅरेथॉनद्वारे वीज सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ


कल्याण : महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून दरम्यान राज्यभरात वीज सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कल्याण परिमंडलात काल (१ जून) सकाळी मॅरेथॉनच्या उत्साही वातावरणात सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. ‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रिद घेऊन वीज सुरक्षेबाबत जनजागृती करत निघालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्याच्या मॅरेथॉनचे नेतृत्व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले.


महावितरणचा २० वा वर्धापन दिन येत्या ६ जूनला साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित वीज सुरक्षा सप्ताहात वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कल्याण परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणातून रविवारी सकाळी ८ वाजता कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहभागातून आयोजित मॅरेथॉनला सुरुवात झाली.



वीज सुरक्षेबाबत फलक हाती घेत व घोषणा देत ही मॅरेथॉन प्रेम ऑटो चौकापर्यंत पोहचली. वीज सुरक्षेचा जागर करत ‘रन फॉर सेफ्टी’ हे घोषवाक्य घेऊन निघालेल्या मॅरेथॉनचा समारोप परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणात झाला.


या मॅरेथॉनमध्ये वाशी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, मुख्यालयातील वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन काळे, कल्याण मंडल दोनचे अधिक्षक अभियंता विजय फुंदे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित ईगतपुरीकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते कौमुदी परदेशी, देबाशिश दत्ता, मिलींद चौधरी, जगदिश बोडखे, मनिष ढाकरे, वरिष्ठ व्यवस्थापक योगेश अमृतकर यांच्यासह उपविभागीय, शाखा अभियंते, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज २ जून रोजी परिमंडलातील सर्वच उपविभागांमध्ये रहिवासी परिसरात वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर ३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment