नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने कमी होत आहे आणि त्याच दरम्यान, त्याचा धोका पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवार १० एप्रिल पासून देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
एखाद्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर तो खासगी रुग्णालयात जाऊन तो घेऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ही लस घेऊ शकते. मात्र, हा बूस्टर डोस घेणे बंधनकारक नाही. ते पूर्णपणे ऐच्छिक आहे. जर एखाद्याला बूस्टर डोस घेणे आवश्यक वाटले तर तो लसीकरण करून घेऊ शकतो.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, असे लोक बुस्टर डोस घेऊ शकतात. खासगी लसीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असेल असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
तसेच सध्या पहिला आणि दुसरा डोस सरकारी केंद्रांवर दिला जात आहे. याशिवाय या केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही बूस्टर डोस दिला जात आहे. याशिवाय, जे इतर लोक बूस्टर डोस घेण्यास इच्छुक आहेत, ते देखील खाजगी लसीकरण केंद्रांना भेट देऊन लसीकरण करू शकतात.