मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची कालमर्यादा सप्टेंबर महिन्यात संपत असून नवीन कुलगुरू निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १८ एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठात व्यवस्थापन आणि विद्वत्त परिषदेची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवीन कुलगुरू शोधण्यासाठी चर्चा करण्यात येणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू केला आहे. राज्यपाल यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल असा पूर्ण संघर्ष निर्माण होणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मागील अधिवेशनात मंजूर केले होते.
मात्र त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली नसून राज्य सरकारच्या विधेयक विरोधात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांनी कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही सभागृहात मंजूर केलेल्या विधेयकाला डावलून राज्यपालांकडून केल्या जात असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात राज्य सरकारकडून कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर दाद मागितली जाण्याची शक्यता उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार राज्य सरकार विद्यापीठाच्या कुलगुरूंसाठी दोन नावे सुचविणार होती आणि त्या दोन नावांमधील एक नाव निवडून कुलगुरूंची घोषणा करण्याची तरतूद नव्या विद्यापीठ कायद्यात करण्यात आली आहे.
मात्र राज्य सरकार राज्यातील विद्यापीठांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे राज्यातील भाजप पक्ष, शिक्षक संघटना, कर्मचारी संघटनाकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला होता. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या विद्यापीठ विधेयकवर सही न केली नाही. मात्र आता विद्यापीठाच्या कुलगुरूंची कालमर्यादा संपत आल्यामुळे नव्या कुलगुरूंचा शोध सुरू करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.