मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डेब्रिज काढण्याची आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बुधवारी संबधित विभागांना दिले.
महानगरातील पावसाळापूर्व कामांचा व डेब्रिज व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठक झाली.
या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मंडळाचे महाव्यवस्थापक शलभ गोयल, पश्चिम रेल्वेचे जीव्हीएल सत्यकुमार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह महानगरपालिका, एमएमआरडीए, पोलीस, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.