राजापूर (प्रतिनिधी) : धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बहिष्काराची धमकी, नारळावर हात ठेवून शपथा घेण्यास लावण्याचे प्रकार आणि गेले दोन दिवस प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाबाबत वेगवेगळ्या पसरविलेल्या अफवा यामुळे धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विरोधकांचा प्रकल्प विरोधात ठराव पारित करण्याचा हेतू साध्य झाला आहे. मात्र गुप्त पद्धतीने मतदान होते तर चित्र वेगळे दिसले असते, असे काही प्रकल्प समर्थकांनी ग्रामसभेनंतर सांगितले. तर मतदानातील अनेकांची प्रकल्पात जमीनही जात नाही, अशांनी विरोध केल्याचे पुढे आले असून बारसू गावातील काही ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेत आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू व मग आमचा निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मांडत विरोधकांची हवा काढली.
धोपेश्वर, बारसू परिसरात नव्याने प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत चाचपणी करण्यासाठी बुधवारी श्री धूतपापेश्वर मंगल कार्यालय धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी सरपंच स्नेहा ओगले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. अशाप्रकारे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे व यामध्ये प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव पारित होणार हे कळताच कायमच प्रकल्प विरोधाची गरळ ओकणारे एनजीओ आणि त्यांचे दलाल यांनी गेले तीन ते चार दिवस धोपेश्वर गावात ठाण मांडले. या प्रकल्पामुळे धोपेश्वर मंदिराला धोका निर्माण होणार, प्रकल्पाचे दूषित पाणी मृडाणी नदीत सोडणार, अशा एक नाही अनेक अफवा पसरवून व जुनेपुराणे व्हीडिओ दाखवून गावातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
तर काही वाडीतील प्रमुख ग्रामस्थांना हाताशी धरून त्यांना प्रकल्पाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी मग त्या प्रमुखांमार्फत गावातील गरीब जनतेला तुमच्यावर सामाजिक बहिष्कार घालू, तुमच्याकडे कोणते कार्य असेल तर आम्ही येणार नाही, पालखी आणणार नाही, अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचे तर काहींनी यासाठी नारळाचाही वापर केल्याचे प्रकल्प समर्थकांनी सांगितले. अशा प्रकारे जनतेमध्ये भीती निर्माण करण्यात आली. त्यामुळे आपल्यावर बहिष्कार घातला गेला, तर काय या भीतीपोटी अनेक प्रकल्प समर्थक ग्रामसभेसाठी गेलेच नाहीत. त्यामुळे प्रकल्प विरोधकांचा हेतू साध्य झाला व रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात ४६६ मते, समर्थनार्थ १४४ मते पडली, तर २३ जण तटस्थ राहिले. बारसू गावातील काही प्रकल्प विरोधी ग्रामस्थांनी आपण तटस्थ राहूया, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रकल्प समर्थकांनीही त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित तटस्थ राहण्याचे निश्चित केले.
मात्र प्रत्यक्ष मतदार प्रक्रियेप्रसंगी ज्या प्रकल्प विरोधकांनी तटस्थ राहूया, अशी भूमिका घेतली त्यांनीच प्रकल्पाच्या विरोधात जात मतदान केले व दुटप्पी भूमिका घेतल्याचे समर्थकांनी सांगितले. मात्र काही ग्रामस्थ आपल्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी परदेशी वाऱ्या करणारे एनजीओंचे दलाल आणि कोकण पर्यावरणाच्या गप्पा मारणारे स्वयंघोषित पुढारी यांची गेले दोन दिवस केविलवाणी धडपड या भागात सुरू होती. त्याला काही मंडळींनी साथ देत जनतेवर अशा प्रकारे दबाव आणल्याने आज कागदावर जरी विरोधाचा आकडा दिसत असला तरी प्रत्यक्षात धोपेश्वर गावात प्रत्येकाच्या मनात प्रकल्प आमच्या गावातच झाला पाहिजे हेच आहे, असेही प्रकल्प समर्थकांनी सांगितले.