पुणे (वृत्तसंस्था) : आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागणाऱ्या मुंबईला बुधवारी कोलकाताविरुद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील विजयाचे खाते खोलण्याची संधी आहे. उभय संघांमध्ये पुण्यातील स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे.
आयपीलच्या १५ व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात मुंबईचा दिल्लीविरुद्ध पराभव झाला, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईला पराभवाची धूळ चारली. दरम्यान बुधवारी मुंबई यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात मुंबईसमोर कोलकाताचे आव्हान आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसरा सलामीवीर इशान किशन आणि यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. तिलक वर्माही धावा करण्यात यशस्वी होत आहे. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आलेला नाही. अमोलप्रीत सिंग, कायरॉन पोलार्ड, टीम डेविड यांना आतापर्यंत मोठ्या धावा करता आलेल्या नाहीत. ही कोंडी त्यांना फोडावी लागेल. जसप्रीत बुमराह, तायमल मिल्स या गोलंदाजांना धावा रोखण्यात आणि बळी मिळवण्यात यश आलेले आहे. पण त्यांनाही अन्य गोलंदाजांची साथ मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे मुंबई अद्याप पहिल्या विजयाच्या शोधातच आहे.
दुसरीकडे कोलकाताचे गोलंदाज चांगलेच फॉर्मात आहेत. पंजाबला त्यांनी १३७ धावांवर रोखले होते, तर बंगळूरुलाही १२८ धावा करताना शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. उमेश यादव, टीम साउदी, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती असा भेदक मारा त्यांच्याकडे असून हे चारही गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाले आहेत. पण फलंदाजांचा फॉर्म नसणे ही कोलकातासाठी दुखरी नस आहे. त्यांच्या फलंदाजांना यंदाच्या हंगामात आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश राणा, सुनील नरेन, बिलींग्स यांना धावा जमवाव्या लागतील. त्यात आंद्रे रसलची बॅट तळपतेय ही कोलकातासाठी जमेची बाजू आहे. पण अन्य फलंदाजांना त्याला साथ द्यावी लागेल.
वेळ: रात्री ७.३०वा.
ठिकाण : पुणे