पूर्णिमा शिंदे
बहु असोत सुंदर संपन्न की महा… समृद्ध कृषिप्रधान देशाच्या युवापिढीने काय करायचं? मी तत्परता, तल्लीनता, तन्मयता हे तारुण्याचे तीन होकार नैराश्याच्या एका नकाराने मारले जातात. सद्यस्थितीत गुणवत्ताधारक युवकांनी चहा, भेळ, मिसळ, डोसा आणि वडा की पकोडा, काय विकायचं तरुणांनी? उच्चपदवी प्राप्त केल्यानंतरही नोकरीच नाही.
राजकारणात भ्रष्टाचाराचे फोफावलेले पीक, चोर सोडून संन्याशाला फाशी, नोकरीच्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि आता तर या काळानंतर सतत वाढता महागाईचा भस्मासुर… विस्कटलेली आर्थिक घडी, उद्ध्वस्त मन:स्थिती, अशा अवस्थेत भारतामध्ये उच्चशिक्षण असून नोकऱ्या नसतील, तर मुलांनी करायचं काय? संधी मिळाली नाही, तर अनुभव कसा मिळेल? अनुभव डायरेक्ट काय मार्कलिस्ट जोडून येतो का? तरुणाईने नापास न होता गुणवत्ता, टक्केवारी, क्षमता असूनदेखील सगळ्यांवर पाणीच. परदेशात शिकून आपल्या मायदेशी कोणत्या नजरेतून मुलांनी यावे? कोणत्या आशेतून अपेक्षेने राहावे? मुले परदेशात का जातात शिक्षणासाठी. उच्चशिक्षण घेऊन परतल्यानंतर मात्र अगतिकता व सगळेच मार्ग थोपलेले. मुलांनी मात्र आपल्या पालकांनी लादलेल्या आज्ञा पाळायच्या आणि स्वप्न भरारीला छेद द्यायचा.
शाळेच्या पुस्तकातील प्रतिज्ञेतील पहिल्याच पानातील समता कुठे जाते? प्रयत्न, जिद्द, मेहनत क्षणार्धात स्वप्नांचा चक्काचूर व्हावा, अशी दयनीय अवस्था तरुणाईची झाली आहे. गुणवत्तेतून कामे करू म्हटलं तर भ्रष्टाचाराचा निवडुंग फोफावतोय. सत्ताधिकाऱ्याचं आश्वासनांचं गवत माजलेय. आपल्याच नशिबानं प्रयत्न करू म्हटलं, तर आरक्षणाचं तण मात्र वयाच्या चार पटीने वाढले आणि गुणवत्तेतून करू म्हटलं तर संधी, भरती, अनुभव, यांच्यामध्ये जोडून येतो तो भ्रष्टाचार लपून वार करतोय. परवा एका वाढदिवसानिमित्त भांड्यांच्या दुकानात गेले. भांडी विकणाऱ्या त्या नोकराला विचारलं, कसं चाललंय दुकान? भांडीवाल्याच्या दुकानात काम करणारा मुलगा म्हणाला, चार महिने पगार होत नाही.
आईला गावी पैसे पाठवावे लागतात. वेळी-अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतातील धान्य नासून गेलं. सांगा कसं जगायचं? ‘वाट दिसेना रं देवा वाट दिसेना’. इतकी वाट लावून ठेवली आहे.मग अशा वेळी मात्र आपण मुलांचे समुपदेशन करायचे? आणि ते कसे? कुठून आणायचे परिस्थितीवर मात करण्याचे बळ? मी स्वतः गोदरेज कंपनीमध्ये व्यसनमुक्तीवर व्याख्यान देत असताना माझ्यासमोर बावीस वर्षांचा एक तरुण आला. त्याचा प्रश्न काळजाला भिडणारा. हा मुलगा डेलिवेजेसवर द्विपदवीधर सफाई कामगार म्हणून काम करत असताना नाईटला मात्र ‘सीए’चा अभ्यास करत होता.
चेहऱ्यावर प्रचंड ताण. त्याला पाहून असे वाटले गेले कित्येक दिवस हा मुलगा झोपला, जेवला असेल काय? या मुलांना जर कोवळ्या वयात पोक्त जखमा मिळाल्या, तर त्यांचं जगणं म्हणजे काय हो. मर्मभेदी कथा मुलगा परदेशातून एमबीए मेरिट शिकून स्टुडन्ट विजा संपल्यानंतर मायदेशी भारतात परतल्यानंतर मात्र नोकरीसाठी अथक प्रयत्नानंतर हाती काय, तर आता काय ९ /१० ते १२ तास काम करून महिन्याकाठी १०,००० पगार, काय होते हो १० हजारांत? घरी आलेल्या सफाई करणाऱ्या किंवा पेशंट सांभाळणाऱ्या व्यक्तीला देखील आपण पाचशे रुपये रोज देतो. गुणवत्ताधारक युवकांना सिक्युरिटी, लेबर, हेल्पर, डीटीपी, डिलिव्हरी बॉय, असे मुलांना लांबवर प्रवास करून हातात दोनशे – तीनशे रुपये रोजंदारीवर डेली वेजेसप्रमाणे… काय येणार ९ आणि १० हजारांत. एकीकडे नॅशनलाईज बँकांना लुबाडणारे, थकवणारे अमराठी भाषिक मात्र वाचत आहेत. राजकारण्यांना पेन्शन असते, भत्ता असतो, पगार असतो, इतर सोयी-सुविधाही असतात आणि आता तर सरकारने आमदारांना घरे सुद्धा देण्याची घोषणा झाली आहे. मग मला सांगा सर्वसामान्यांचे काय? गरिबांचे काय? कमवायचे आणि खायचे काय? त्यांनी जगावे कसे, काय करावे प्रश्नचिन्ह? गगनाला भिडणारे भाव, महागाई, भ्रष्टाचार, चोरी, लुटमार, व्यसनाधीनता, रोगराई आणि भरीस भर राजकारण या सगळ्यांशी भरडला जातो तो युवक. यात समाजातील युवाशक्तीला केवळ झेंडे खांद्यावर घेण्याशिवाय आणि सतरंज्या उचलण्याशिवाय पर्यायच उरला नाही का? एका मातेने मला विचारलेला हा प्रश्न मी निरुत्तर.
सध्या नेमके काय सुरू आहे. साऱ्या गावाची मुले झेडपी, बीएमसी शासकीय शाळेत शिकतात. पण, आपली मुले मात्र आपण परदेशात पाठवून मायदेशी परत आल्यावर त्यांना राजकीय वारसा कसा मिळेल, याकडे राजकारणी लोकांचा कल दिसत आहे. त्यामुळे त्यांना काय जाणीव होणार की नोकऱ्या, रोजगारांचे हाल कधी ऐकलेत काय. यांची मुले सीमेवर लढताना कधी ऐकले का? यांची मुले शेतात राबताना कधी ऐकले का? त्यांची मुले संघर्ष करताना पाहिली आहेत का? दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणे, कुठे गेल्या नोकऱ्या? तोंडाला पाने पुसली जातात. निवडणूक आली की मात्र युवा पिढीचा वापर केला जातो. भारताने तशी शिक्षणपद्धती का अवलंबू नये? दर्जेदार शिक्षण द्यावे. भविष्यात करिअरच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’! खऱ्या अर्थाने प्रचलित होण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या युवाशक्तीला कोलमडून जाताना पाहावत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे. जन्माच्या दाखल्यापासून शाळेचा प्रवेश ते नोकरीसाठी फॉर्म विकत घेतानासुद्धा वर्गीकरण १००/४०० रु. हेच ना.
देशाचे भविष्य, भवितव्य आज अत्यंत नाजूक परिस्थितीत आहे. आज प्रत्येक राजकीय प्रतिनिधींनी आपापल्या शैक्षणिक संस्थांमधून अशा तरुणाईला गुणवत्तेवर निकड म्हणून जर नोकऱ्या दिल्या. नि:पक्षपातीपणे जात-पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून तरुणांच्या भविष्य, पुढील भवितव्याचा विचार केला, तर निश्चितच आपल्या भारत देशामध्ये आमूलाग्र परिवर्तन जे होईल ते जनहिताचे सार्वभौमत्वाचे ठरेल. हीच वेळ आली आहे, ऊठ तरुणा जागा हो सतर्क, संघर्ष आणि सक्षम हो. तुझी लढाई आता तुलाच लढायची आहे. फसव्या मृगजळाला फेकून दे. तू चाल रं गड्या तुला भीती कशाची? सक्षम हो तू सक्षम हो. तू आहेस झुंजार मानू नकोस हार. तुझी लढाई आता तुलाच जिंकायची आहे.
(लेखिका आकाशवाणी मुंबईवर निवेदिका आहेत.)