हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. गुढीपाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. या दिवशी नवे संकल्प, योजना आखल्या जातात. नवीन वस्तू खरेदी, वििवध व्यवसाय, नवे उपक्रम यांचा शुभारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टी यावेळी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस. पण यंदाचा ‘गुढीपाडवा’ हा अनोखा असून संपूर्ण जग महाभीषण अशा कोरोनानामक अदृश्य विषाणूच्या विळख्यातून हळूहळू मुक्त होत असताना तो आलेला आहे व तोही या कोरोना निर्बंधांच्या जोखडातून मुक्त होत साजरा करता येणार आहे, हे विशेष.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मात्र मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मास्कचा वापर अनिवार्य नसला, तरी ऐच्छिक केला आहे, तरी लोकांनी गर्दीच्या ठिकाणांवर व जमेल तिथे मास्क वापरायलाच हवा. अमेरिका, इंग्लंड, युरोप यांसारख्या देशांनी लोकांना मास्कमुक्त केले. पण त्यानंतर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा सुरू झालेला दिसत आहे. याचा अर्थ प्रत्येकाला आता काळजी घेऊनच काम करावे लागणार आहे.
केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम कायम असतील. मात्र हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थांमधील उपस्थितीवर मर्यादा नसणार आहे. लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर मर्यादा नसेल. सार्वजनिक ठिकाणे, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचे प्रमाणपत्र दाखविण्याची गरज भासणार नाही. राज्यभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील. त्यामुळे आता यात्रा-जत्रा धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. तसेच गुढीपाडवा, मुंबईतल्या शोभायात्रा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यांसारखे सण-उत्सव आता सर्वांना पूर्वीसारखेच उत्साहात साजरे करता येणार आहेत. मुंबई लोकमधून प्रवास करण्यासाठी पूर्वी दोन डोस घेणे अनिवार्य होते व त्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा होती; परंतु राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी पूर्वीसारखे दोन डोस घेतलेले लसीचे प्रमाणपत्र आवश्यक नसणार आहे. याचाच अर्थ लसीचा एक डोस घेतलेला असेल तरी मुंबईकर लोकलने प्रवास करू शकणार आहेत.
राज्य सरकारने दोन डोसची अट जरी रद्द केलेली असली तरी गाफील नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे, त्यांनी आपापले लसीकरण पूर्ण करून घ्यायला हवे. निर्बंध मागे घेण्यात आलेले असले तरी प्रत्येकाला काळजी ही घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यात सरकारने १ ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश काढल्यानंतर त्यावरून विरोधकांनी रान उठवले होते. निर्बंध चुलीत घालण्याची भाषा देखील विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण हिंदूंनी कसे साजरे करायचे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला होता. विरोधकांनी तर यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. तसेच हिंदू सणांवरच निर्बंधांचे गंडांतर का? अशा आशयाचे प्रश्न सातत्याने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशीष शेलार, निताश राणे, प्रदेश भाजपचे सचिव नितेश राणे हे उपस्थित करीत होते. त्यामुळेच निर्माण झालेल्या दबावापुढे अखेर सरकार नमले असून सर्व कोरोना निर्बंध हटविण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधने हटणार असल्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. नवे आर्थिक वर्ष आणि गुढी पाडवा यांच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची मास्क व इतर निर्बंधांपासून मुक्तता झाली आहे. आपण सर्वजण गेली दोन वर्षे कोरोनाच्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलो होतो. त्यातील कोरोनाचे कारण आज तरी दूर झाले आहे. मात्र आता सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात महागाई, घटते व्याजदर, बेरोजगारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या वाढत्या अडचणी यांच्यापासून सुटका मिळू शकते की, नाही हे प्रश्न पुढे उभे आहेतच. त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी नव्या दमाने कार्यरत होणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला ‘निर्बंधमुक्त गुढी’ उभारण्याची भेट मिळाल्याने ‘ध्वज गुढीचा उंच धरा रे…’ असे आर्जव करणे गैर ठरणार नाही.
चला गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची…
समाधानाची अन् उत्तुंग यशाची…
दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उराशी बाळगलेली
नववर्षात करू पूर्तता त्यांची…