महाराष्ट्रात जनमत डावलून तीन भिन्न मतप्रवाहांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता मिळवली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले हे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या कारणांनी सतत अडचणीत येताना दिसत आहे. सत्ताधारी आघाडीतील काही प्रमुख मंत्र्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली तुरुंगात जावे लागले आहे, तर आणखी काही मंत्री ईडी, सीबीआय, आयकर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकण्याच्या शक्यता दिसत आहेत. कारण त्यांच्यावर आरोपच तसे केले जात आहेत. विशेष म्हणजे हे केवळ आरोप होत नसून त्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसल्यानंतर सखोल चौकशीअंती या मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. सत्ताधारी पक्षांचे आणखी किमान डझनभर मंत्री या केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या रडारवर असून एकामागोमाग त्यांचा नंबर लागणार आणि ते गोत्यात येणार हे निश्चित. राज्याचे मंत्रीच जर घोटाळ्यांमध्ये अडकत असतील, तर अशा आघाडीला सत्तेवर राहण्याचा तसा अधिकार उरत नाही. पण सत्तेच्या गुळाला चिकटलेले हे मुंगळे सत्तेपासून स्वत: दूर होतील, अशी शक्यता दुरान्वयानेही दिसत नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुसंवाद नसल्याचे चित्रही वारंवार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाआघाडीतील मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी निधी वाटपावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच सत्तेची फळे चाखता येत आहेत. शिवसेनेला लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांत आपला केवळ अपमानच होत आहे, अशी भावना शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये दिसत आहे व तशी जाहीर वाच्यता ते अधूनमधून करताना दिसत आहेत. अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच व्यक्त केली. त्यानंतर आता शिवसेना सत्तेचा मोह सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीला अवघे काही दिवस उलटले असताना आता काँग्रेसमध्येही धुसफूस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तीन पक्षांचे सरकार असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदारांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. आता हे सर्व आमदार थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे आपल्या तक्रारींचा पाढा वाचणार आहेत. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सत्तेत असूनही आमची गेली अडीच वर्षं आपल्याच मंत्र्यांमुळे वाया गेली असल्याची व्यथा ते दिल्लीत मांडणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सर्व काँग्रेस आमदारांची नाराजी ही काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्यांविरोधात आहे. नाराज काँग्रेस आमदारांचा आकडा हा २५च्या वर असल्याचे सांगितले जात आहे. येत्या तीन तारखेला एका विशेष ट्रेनिंगसाठी ही सर्व मंडळी दिल्लीला पोहोचणार आहेत. त्यामुळे तिथे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना भेटायची वेळ मागितली आहे. देशात अलीकडे झालेल्या विविध राज्यांतील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसला वारंवार पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकंदरीत काही प्रमाणात काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. तरी काँग्रेसने गेली अनेक दशके सत्ता चाखली आहे, चालवली आहे. त्यामुळेच, सत्ता म्हणजे नक्की काय? ती कशी चालवली जाते? हे अगदी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला माहिती आहे. पण राज्यात सत्तेत असूनही आपले मंत्री काहीही साध्य करण्यात व कार्यकर्त्यांचे आमदारांचे भले करण्यात किंवा त्यांची कामे करण्यात सतत अपयशी ठरले आहेत, असा उघड आरोप आणि राग या सर्व आमदारांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे व्यक्त केला आहे.
काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत राहिली आहे. पण यावेळी सत्तेत असूनही पक्षाचे मंत्री काँग्रेसच्या आमदारांची कामे वेगाने करताना दिसत नाहीत. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. जिल्हा समित्यांवरील विविध नियुक्त्या, नेमणुका अशा अनेक गोष्टी प्रलंबित आहेत, अशा तक्रारी या आमदारांच्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. काही आमदारांनी तर महाविकास आघाडीमधील मंत्री हे त्यांच्याच मतदारसंघात कामांची अंमलबजावणी करण्याच्या आमदारांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत, तर निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली कशी होईल? व पक्षाचा विस्तार तरी कसा होईल? असे प्रश्न या आमदारांना सतावत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकच्या निधी वाटपानंतर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमितपणे राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटतात, निधीचे वाटप करतात आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात म्हणून राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस पक्ष मागे पडल्याचे काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता तरी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे, असा आरोप सत्ताधारी करत असले तरी त्यात काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे. कारण ही आघाडी सत्तेसाठीच बनली असली तरी नाराजांची संख्या सतत वाढत असल्याने ती नाराजीच आता या आघाडी सरकारचा घात करेल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.