Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणरत्नागिरी, सिंधुदुर्गला वादळाचा तडाखा

रत्नागिरी, सिंधुदुर्गला वादळाचा तडाखा

घरे, गोठ्यांसह आंबा, काजू, नारळाच्या झाडांचे नुकसान

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याने खळबळ उडाली. दुर्देवाने पुन्हा एकदा तळकोकणाला जवळ असलेल्या या परिसराला वादळाने गाठले. राजापूर तालुक्याच्या पूर्व परीसराला जोरदार चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीचा दणका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचल मध्ये जोरदार पडझड झाली आहे. ऐन आंबा काजू हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच या वादळाने पुन्हा आंबा,काजू बागांना मोठा दणका दिला असून काही बागा या वादळात उध्वस्त झाल्यात. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली. छपरांवरील कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासुन मोबाईल, दुरध्वनी सेवा व वीज पुरवठा खंडीत झाली आहे.

हवामान खात्याचा अंदाजे व त्या हवाल्याने मत्स्य विभागाकडून देण्यात आलेला चक्रीवादळचा इशारा दुसऱ्या दिवशी रद्द समजावा असे सांगण्यात आले. कोकणात चक्री वादळाचा इशारा नाही असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले गेले. जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांचीच माहिती अधिकृत समजावी असेही प्रशासनाने सांगितले. पण हा दिलासा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

वादळाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये राजापूर तालुक्यातील रायपाटण, पाचल आदी गावांचा सामावेश आहे. सायंकाळी वादळी वारे वाहू लागले. काही क्षणातच वादळी वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीत झाले व क्षणार्धात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. या वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यांमध्ये घरांचे आतोनात नुकसान झाले. वादळात घरांवरील कौले पत्रे उडाली. तर, पाचलमधील होळीच्या मांडावर देखील पडझड झाल्याची घटना घडली. रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एक वृक्ष उन्मळून पडला. तर गावातील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडीमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने गावासह लगतच्या परीसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. परिसरातील मोबाईल सेवाही खंडीत झाली होती. रायपाटण मधील श्री. रेवणसिध्द मठामध्ये देखील वादळात पडझड झाल्याची घटना घडली.

तसेच ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे दिसून येत होती. तर सध्या होळीचा सण सुरू असून वादळी पावसामुळे ठिकठिकाणच्या होळीच्या मांडाना त्याची झळ पोहचल्याने मांडावरील विराजमान देवतांच्या पालख्या आजुबाजूच्या घरांमध्ये बसवाव्या लागल्या. वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा, काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागा उध्वस्त झाल्या. कलमे वाकून मोडून पडली. बागांचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तात्काळ दखल घेतली असून या परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -