मुंबई : मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक प्रयत्न करूनही आंदोलनावर सरकारला तोडगा काढता आलेला नाही. हे सरकारचे अपयश असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी विधानसभेत मान्य केले आहे. सोबतच संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे, असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलन संपलेले नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीवर आंदोलक ठाम आहेत. ही मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
यामुळे दिवसेंदिवस आंदोलन चिघळत गेले. शुक्रवारी विधान परिषदेत अनिल परब यांनी संपाबाबत निवेदन जाहीर केले आहे. निवेदनात संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे’ असे म्हटले आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही संप सुरूच आहे.