होळी रे होळी… पुरणाची पोळी… साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. हिंदू धर्मात दिवाळीनंतर सर्वात मोठ्या स्वरूपात साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी आहे. होळीच्या रूपात मनात वाईट अविचार सारे अनिष्ट जळून खाक व्हावे अशी कामना केली जाते. होळी सणाच्या निमित्ताने वसंत ऋतूची चाहूल लागते. हळूहळू वातावरणामध्ये बदल दिसायला लागतात. निसर्ग मुक्तपणे रंगांची उधळण करत असते. त्याप्रमाणे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने देखील रंगांची उधळण केली जाते. भारतातील कोरोनाचा विळखा सैल होत असताना अनेक भागांत कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमधून मुक्तता मिळत आहे. मागील दोन वर्षे होळीचा सण साधेपणाने साजरा झाला. यंदा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.
कोकणात होळीचा सण हा शिमगा म्हणून प्रचलित आहे. शिमगा साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून कोकणात अनेक ठिकाणी वार्षिक, त्रैवार्षिक उत्सवांना सुरुवात झाली आहे. घरोघरी पालखी जात आहे. आपापल्या ग्रामदैवतेची मनोभावे पूजा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात आपापल्या गावी पोहोचलेत. त्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या मंगलमय, भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाचा थाट मोठा असतो. यानिमित्त देशाच्या विविध प्रांतांमध्ये निरनिराळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. होळीच्या निमित्ताने पुरणपोळी, गुज्जिया, थंडाई बनवली जाते. आपल्या प्रियजनांना रंग लावून मैत्रीचा, स्नेहाचा आनंद द्विगुणित केला जातो.
मात्र गेल्या काही वर्षांत अन्य सणांप्रमाणे होळीचे महत्त्व मागे पडत चालले आहे. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवण देतो. जगण्याची नवी दिशा देतो. होळी आणि रंगपंचमीवेळी रंगाचा बेरंग होण्याची घटना कुठे ना कुठे घडतेच. मुली आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. दारू पिऊन गोंधळ घालणारेही रस्तोरस्ती पाहायला मिळतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे आणि असे प्रकार टाळायला हवेत. तसेच रोखायला हवेत. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. रंग उडवताना रासायनिक रंगाच्या वापरामुळे कुणाचा डोळा निकामी होतो, तर कुणाच्या त्वचेला अपाय होतो. त्यामुळे हल्ली इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण अनुकूल रंग वापरण्याकडे सर्वांचा कल आहे. उत्साहाच्या भरात स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला विसरू नका, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
यंदा राजयोगात होळी साजरी करता येणार आहे. प्रथमच असा योग जुळून आला आहे. जो देश आणि लोकांसाठी खूप शुभ आहे. होळीच्या रंगांसह नवीन पीक पिकवण्याचा देखील हा सण आहे. यावेळी धूलिवंदन शुक्रवारी म्हणजेच १८ मार्च रोजी आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदासोबतच होळी सर्वसामान्यांच्या जीवनातही आनंदाचे अनेक रंग घेऊन येते. यादरम्यान ग्रहयोगही तयार होत आहेत. धूलिवंदनच्या एक दिवस आधी १७ मार्च रोजी होळी पेटवली जाईल. यावेळी भाद्र दोष असल्याने संध्याकाळऐवजी रात्री पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होलिका दहनाचे आयोजन केले जाईल. त्याचबरोबर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गजकेसरी, ज्येष्ठ आणि केदार असे ३ राजयोग असतील. आजपर्यंत होळीच्या दिवशी इतका मोठा योग घडला नाही. मोठ्या शुभ योगांमधील होलिका दहन देखील देशासाठी शुभ असेल. या ग्रहयोगांमुळे मान-सन्मान, कौटुंबिक सुख-समृद्धी वाढते.
होलिका दहन गुरुवारी आहे. म्हणजेच हा देव गुरू बृहस्पती यांचा दिवस आहे. ते स्वतःच शुभ आहेत. दुसरीकडे, गुरू चंद्राशी संबंधित असेल तेव्हा गजकेसरी योग तयार होईल. या उत्सवावर ज्येष्ठ आणि केदार योगही तयार होत आहेत. काही ज्योतिषांचे म्हणणे आहे की, होलिका दहनाच्या दिवशी हे तीन राजयोग तयार होत असताना हे प्रथमच घडत आहे. इतकेच नाही तर सहचर राशीत सूर्याचे असणेही हा सण शुभ बनवत आहे. होलिका दहनाच्या विशेष ग्रहयोगामुळे रोग, दु:ख आणि दोषांचा नाश तर होईलच, पण शत्रूंवर विजयही मिळेल.
नक्षत्राचा स्वामी, महिना आणि ऋतू स्वामी एकाच राशीत असतील. १४ मार्चला आमलकी एकादशी आणि नंतर १७ ला होळी, १८ ला धुळवळ साजरी होऊन १९ मार्चपासून वसंत ऋतू सुरू होत आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. होलिका दहन शुक्राच्याच पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होईल. हा ग्रह सुख, सुविधा, समृद्धी, उत्सव, आनंद आणि ऐश्वर्य यांचाही कारक आहे. त्याचबरोबर फाल्गुन महिन्याचा स्वामी शनी आहे. शुक्र-शनी हे एकमेकांचे मित्र आहेत आणि दोघांचाही मकर राशीत संयोग होत आहे. नक्षत्रांची ही स्थिती या सणाचे शुभ परिणाम वाढवत आहे. या राजयोगांमध्ये होळीचा सण लोकांना आनंद देईल. तसेच देशासाठीही शुभ संकेत असल्याचे ग्रहयोग दर्शवितात. होळीपासून दीपावलीपर्यंत जल्लोषाचे वातावरण असेल, असे जाणकारांनी सांगितले आहे.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक येथे एकत्रित नांदतात. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न प्रत्येक सणादरम्यान केला जातो. मागील दोन-तीन वर्षे संपूर्ण देशासह आपल्या सर्वांसाठी कठीण काळ ठरला. मात्र कोरोनानामक जागतिक महामारीला दूर लोटण्यात आपण यशस्वी ठरलो. संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही; परंतु घाबरून चालणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिबंधक नियम पाळून कोरोनारूपी राक्षसाला यंदाच्या होळीमध्ये जाळून टाकताना भयमुक्त काळाच्या दिशेने वाटचाल करूया.