Saturday, June 29, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11-12 मार्च रोजी गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान, 11 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गुजरात पंचायत महासंमेलनात सहभागी होतील आणि संमेलनाला संबोधित करतील.पंतप्रधान, 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या (RRU) इमारतीचे राष्ट्रार्पण करतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आरआरयूच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला ते संबोधित करतील. पंतप्रधान संध्याकाळी 6:30 च्या सुमारास, 11 व्या ‘खेल महाकुंभाची’ घोषणा करतील आणि समारंभाला संबोधित करतील.

गुजरातमध्ये त्रिस्तरीय पंचायती राज रचना असून 33 जिल्हा पंचायती, 248 तालुका पंचायती आणि 14,500 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. ‘गुजरात पंचायत महासंमेलन: आपनू गाव, आपनू गौरव’ (आपले गाव,आपला गौरव) मध्ये राज्यातील पंचायती राज संस्थांच्या तिन्ही संस्थांमधील 1 लाखांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची (RRU) स्थापना पोलिसिंग, फौजदारी न्याय आणि सुधारात्मक प्रशासनाच्या विविध शाखांमध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. गुजरात सरकारने 2010 मध्ये स्थापन केलेल्या रक्षा शक्ती विद्यापीठाचे उन्नयन करून सरकारने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ नावाचे राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ स्थापन केले. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असलेल्या या विद्यापीठाचे कामकाज 1ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाले. उद्योग क्षेत्रातील ज्ञान आणि संसाधनांचा फायदा घेत विद्यापीठ खाजगी क्षेत्रासोबत समन्वय विकसित करेल आणि पोलीस व सुरक्षाविषयक विविध क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रेदेखील स्थापन करेल.

आरआरयूमध्ये पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षेच्या विविध क्षेत्रांमध्ये डिप्लोमा ते डॉक्टरेट स्तरापर्यंत शैक्षणिक कार्यक्रम, जसे की पोलिस विज्ञान आणि व्यवस्थापन, फौजदारी कायदा आणि न्याय, सायबर मानसशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, गुन्हे अन्वेषण, धोरणात्मक भाषा, अंतर्गत संरक्षण आणि धोरणे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, किनारपट्टी आणि सागरी सुरक्षा, असे विविध अभ्यासक्रम आहेत. सध्या 18 राज्यातील 822 विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यापीठात आहे.गुजरातमध्ये 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 16 क्रीडाप्रकार आणि 13 लाख सहभागींसह सुरू झालेल्या, ‘खेल महाकुंभ’मध्ये आज 36 सामान्य खेळ आणि दिव्यांगांसाठी 26 खेळांचा (पॅरा स्पोर्ट्स) समावेश आहे. 11व्या खेल महाकुंभसाठी 45 लाखांहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

‘खेल महाकुंभने’ गुजरातमधील क्रीडा परिसंस्थेत क्रांती घडवून आणली आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. क्रीडा संमेलनात एक महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये राज्यभरातले लोक सहभागी होतात. कबड्डी, खो-खो, रस्सीखेच , योगासन, मल्लखांब यांसारख्या पारंपारिक खेळांचा आणि कलात्मक स्केटिंग, टेनिस आणि तलवारबाजी या आधुनिक खेळांचा हा अनोखा संगम आहे. या क्रीडासंमेलनाने तळागाळातील क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभा ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे गुजरातमधील पॅरा स्पोर्ट्सलाही चालना मिळाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -