Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशेन वॉर्न : एक ‘कलरफूल’ क्रिकेटर

शेन वॉर्न : एक ‘कलरफूल’ क्रिकेटर

जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मात्र एखाद्याचा अकाली मृत्यू पचवणे जड जाते. ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नबाबत तसेच घडले. विश्वविक्रमी लेगस्पिनर आणि प्रत्येक फलंदाजाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या या क्रिकेटपटूचे अवघ्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि केवळ ऑस्ट्रेलिया नव्हे, तर संपूर्ण क्रीडा विश्व हळहळले. वॉर्न हा एक खमका क्रिकेटपटू होताच. मात्र एक व्यक्ती म्हणूनही तो अनेकांना भावला. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ (जंटलमन्स गेम) असल्याचे म्हटले जाते. वॉर्न हा सभ्य गृहस्थ नव्हता; परंतु मृतप्राय लेगस्पिनमध्ये त्याने रंग भरले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटने एक ‘कलरफूल क्रिकेटर’ गमावला, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

जास्तीचं वजन, अनियंत्रित खाणे, व्यायाम करण्याचा कंटाळा, हातामधील मोबाइलचा बॉल इतकाच केलेला धोकादायक वापर, मैदानातील स्लेजिंग, अंपायरशी, खेळाडूंशी वाद, बुकिंशी संबंध, ड्रग्जचं सेवन आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या कित्येक वास्तविक आणि काल्पनिक स्त्रिया या पलीकडे जाऊन शेन वॉर्न हा जगातील महान लेगस्पिनर गोलंदाज नाही, तर महान क्रिकेटपटू बनला. नव्वदीच्या दशकात फिरकी म्हणजे स्पिन गोलंदाजी लोप पावत असताना वॉर्नच्या रूपाने ऑस्ट्रेलियासह जागतिक क्रिकेटमध्ये एका जादूई फिरकी गोलंदाजाचे आगमन झाले. त्यानंतरच्या म्हणजे १९९२-२००७ या १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. वॉर्नने १४५ कसोटी सामने खेळताना २५.४१च्या सरासरीने ७९८ विकेट घेतल्या. ७१ धावांत आठ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. वॉर्नने एका कसोटी डावात ३७ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. तसेच दहा वेळा त्याने कसोटी सामन्यात १० किंवा त्याहून अधिक विकेट टिपल्या. श्रीलंकेचा माजी महान ऑफस्पिनर मुरलीधरनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नपेक्षा जास्त विकेट आहेत. पण मुरलीधरनच्या ८०० पैकी १७६ विकेट या झिम्बाब्वे आणि बांगलादेश या कमकुवत संघांविरुद्ध आहेत. वॉर्न या दोन दुबळ्या देशांविरुद्ध फक्त ती टेस्ट खेळला. यामध्ये त्याने १७ विकेट घेतल्या. हेच वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर वॉर्नने टेस्ट क्रिकेटमधील अव्वल देशांच्या संघांविरुद्ध तब्बल ६९१ विकेट घेतल्या. मुरलीधरनच्या या देशांविरुद्ध ६२४ विकेट आहेत. या दोन फिरकीपटूंमध्ये भारताचे माजी प्रशिक्षक आणि महान लेगस्पिनर अनिल कुंबळे यांचाही उल्लेख करावा लागेल. त्यांनी १३२ कसोटी सामन्यांत ६१९ विकेट घेतल्या. वार्न, मुरलीधरन आणि कुंबळे या त्रिकुटाने जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आणि फिरकी गोलंदाजांची दहशत निर्माण केली.

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि भारताचे एक अनोखे नाते आहे. शेन वॉर्नचे कसोटी पदार्पण भारताविरुद्ध सिडनी कसोटीमध्ये झाले. अपयशी सुरुवात झाली तरी तो खचला नाही. पुढे महान फलंदाज, विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि वॉर्नमध्येही चकमक पाहायला मिळाली. त्यात सचिन सरस ठरला. वॉर्न हा आक्रमक बॉलर होता. तो प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनला नामोहरम करण्यासाठी चिक्कार स्लेजिंग करायचा. पण तो सचिन तेंडुलकरच्या वाट्याला कधीही गेला नाही. सचिनने वॉर्नविरुद्ध १२ कसोटी सामन्यांमध्ये ६०.४५ च्या सरासरीने ५ सेंच्युरीसह १२०९ धावा चोपल्या. १९९६ वर्ल्डकपमध्ये सचिनने वॉर्नची धुलाई केली. १९९८ शारजामध्ये त्याचे पार वस्त्रहरण केले. एकूणच वॉर्नचा माईंडगेम सचिनवर कधी चाललाच नाही. मात्र तेंडुलकरसह सर्वच भारतीय क्रिकेटपटूंसोबत त्यांचे चांगले संबंध होते. शेन वॉर्नने आपल्या दीड दशकांच्या सुवर्ण कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चेंडू टाकले. पण १९९३ मधील अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या माईक गॅटिंगला टाकलेला चेंडू खूप खास होता. वॉर्नचा चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर चांगला वळला होता आणि चेंडू वाइड असेल असे वाटत होते. गॅटिंगने तो खेळण्याचा प्रयत्न केला नाही. यादरम्यान, चेंडू वेगाने वळला आणि गॅटिंगला फसवत त्याच्या ऑफ स्टंपवर आदळला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असे म्हटले जात होते.

पुढे बीसीसीआयच्या आयपीएल टी-ट्वेन्टी लीगमुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एकाच संघात खेळण्याची करामत पाहायला मिळाली. आयपीएलमधील एक सुरुवातीपासूनचा संघ असलेल्या राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नला करारबद्ध केले. वॉर्नने त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन्स बनवले. २००८ हंगामाच्या पहिल्या सत्रातील अंतिम सामन्यात वॉर्नच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. वॉर्नने २९ आयपीएल सामने खेळताना २५.३९च्या सरासरीने ५७ विकेट घेतल्या. वॉर्न हा मैदानाबाहेरही चर्चेत राहिला. १९९४मध्ये श्रीलंकेत सिंगर कप स्पर्धेसाठी खेळत असताना शेन वॉर्न आणि मार्क वॉ यांनी बुकी मुकेश गुप्ताच्या एजंटकडून मॅचपूर्वी पिच आणि हवामानाची माहिती सांगण्यासाठी लाच घेतली होती. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार सलीम मलिकनं शेन वॉर्न आणि टीम मे या ऑस्ट्रेलियन टीममधील दोन स्पिनर्सना ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्यासाठी लाच देऊ केली होती. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानं वॉर्नचा कायम पाठलाग केला. या सर्व वादग्रस्त प्रकरणानंतरही वॉर्नने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही. त्यानं त्याच्या खेळानं क्रिकेटला श्रीमंत बनवले. क्रिकेटच्या इतिहासात एक न टाळता येणारा इतिहास वॉर्नने घडवला. त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेला तरी वॉर्न कायम सर्वांच्या स्मरणात राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -