अरुण बेतकेकर
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
फुगा, छोटेसे रंगीत, रंगीबेरंगी खेळणे. संपूर्ण विश्वाची शेकडो वर्षांपासून करमणूक करणारी वस्तू. असंख्य खेळणी आली आणि गेली, कालबाह्य झाली. फुग्याने मात्र आपले स्थान, आकारही न बदलता आबादित राखले आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या करमणुकीस कोणत्याही सीमा नाहीत. वयाच्या दोन वर्षांपासून शंभरीपर्यंत, कफल्लकापासून कुबेरापर्यंत फुगा सर्वव्यापी. मग हे संजय राऊत नाव कशासाठी? फुग्यात हवा भरण्यासाठी छोटेसे छिद्र, तेथून हवा भरल्यानंतर तो आपल्या मूळ आकारापेक्षा कैकपटीने फुगतो. तशा स्थितीत त्यास बोटातून सोडला, तर अतिवेगाने अवाक्यापलीकडे बेलगाम, वेडा वाकडा हवेत उडतो, सूर सूर आवाजही करतो. हवा संपल्यानंतर अडगळीत कोसळतो, चिपाडाप्रमाणे दिसतो अन् तो ना त्याचा मूळ आकार राखतो, ना हवा भरल्यानंतरचा. सद्यपरिस्थितीत हे उदाहरण चपखलपणे संजय राऊत यांना लागू पडते. प्रत्येक वेळी त्यांच्या बेलगाम वर्तणुकीचा बळी कोण ठरतो? ते आपणच ठरवा…
उदाहरण – १
रामनाथ गोएंका, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे संस्थापक. १९७५-७७ दरम्यान बलाढ्य पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्यांच्यासमोर ‘टाइम्स ऑफ इंडिया’सह देशभरातील सर्वच छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांनी नांगी टाकली. एकमेव रामनाथ गोएंका, जे विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले. त्यांना समज दिला गेला. ते म्हणाले, “मी बिहारहून उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली ती केवळ हातात एक लोटा घेऊन, वेळ आल्यास आजचे वैभव त्यागून आलो तसाच परत जाईन, पण विरोध सोडणार नाही.” म्हणूनच ते वृत्तपत्रकारिकेतील सर्वमान्य महामेरू. १९९१-९२ दरम्यान त्यांच्याच अखत्यारितील लोकप्रभा अंकात त्यावेळचे पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याविरोधात लेख छापला गेला. इनामदारांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तो ग्राह्य ठरला, अन् रामनाथ गोएंका यांच्यासारख्या महान संपादकास कोर्टात नाक रगडून इनामदारांची माफी मागावी लागली. तो लेख ज्याने लिहिला होता, त्या पत्रकाराचे नाव “संजय राऊत”.
उदाहरण- २
बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या. त्या दंगलीच्या तपासासाठी जस्टिस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली गेली. त्याच आयोगास “श्रीकृष्ण आयोग” म्हटले जाते. आयोगाच्या शिफारशीनुसार दैनिक सामना वर्तमानपत्रातील त्या काळातील बातम्या व अग्रलेख हे दंगलखोरीस चिथावणी देणारे, भडकवणारे होते, असे निश्चित करत या प्रकरणावरून सामनाचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या बलाढ्य शिवसेनाप्रमुखास अटक करण्यात आली होती. यास कारणीभूत सामना वृत्तपत्रातील ते लेख ज्याने लिहिले होते, त्या कार्यकारी संपादकाचे नाव “संजय राऊत”.
उदाहरण- ३
बाळासाहेबांनी एका उद्दिष्टाने भाजपसोबत युती केली. त्याचे सकारात्मक परिणामही प्रत्यक्षात आले. दरम्यान कलगीतुरा होत होता. पण युती जवळ-जवळ पाव शतक अभेद्य राहिली. बाळासाहेब पडद्याआड जाताच संजय राऊत यांनी उसळी घेतली. शकुनीमामाची भूमिका अदा करत अभेद्य युती दुभंगण्याचे पाप केले. महाविकास युतीचा शिल्पकार असे स्वयंघोषित केले. भाजपद्वेषाने आंधळे झालेले राऊत आज अतिरेक्यांचेही समर्थन करताना आढळतात. संजय राऊत स्वतः जरी अतिरेकी नसले, तरी अराजक निश्चितच आहेत. दोनच वर्षांत अपरिपक्वतेचे दर्शन घडवत स्वतःच्या कारनाम्यामुळे व लिखाणामुळे स्वतःसह ठाकरे कुटुंबास कायद्याच्या कचाट्यात आणणाऱ्या याच कार्यकारी संपादकाचे नाव “संजय राऊत”.
उदाहरण- ४
संजय राऊत आजच्या घडीला दैनिक सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. मोकाट सुटले आहेत. तारतम्य सोडून वृत्तपत्रिकेला काळिमा फासणारी भाषा वापरत आहेत. सूडबुद्धीने वागत आहेत. सामन्यावर मालकी हक्क गाजवत आहेत. बातम्यांपेक्षा स्वतःच्या व अन्यायाच्या भानगडीवर भर देत आहेत. अलीकडेच नारायण राणे यांना, “कानफटात मारली असती” या वाक्प्रचारावरून सूडबुद्धीने अटक करण्यात आली. पण हेच संजय राऊत विरोधकांना ‘दलाल, भडवे, गांडू, तुम्हाला जोड्याने मारेन’ अशी भाषा वापरत आहेत. त्यातील एखाद्याने तक्रार केल्यास संपादक म्हणून कोणाला नाक रगडून माफी मागावी लागेल? बाळासाहेबांचे निधन झाले, त्यानंतर उद्धवजी संपादक झाले. ते मुख्यमंत्री झाले आणि आजच्या घडीला सामनाच्या संपादिका आहेत
सौ. रश्मी उद्धव ठाकरे. ज्या लेखामुळे असे अभद्र घडेल, तसे लेखन करणाऱ्या त्या कार्यकारी संपादकाचे नाव “संजय राऊत”.
अशी असंख्य उदाहरणे देता येतील. “करून गेलो गाव नि संपादकाचे नाव” प्रत्येक वेळी संजय राऊत मात्र नामानिराळे. हे जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर तरी होत नसेल ना? घटनाक्रम पाहता अशी शंका घेण्यास वाव आहे. या संजय राऊत यांचे पाय बाळासाहेबांना पाळण्यातच दिसले होते. पण देव जाणे हे संजय राऊत बाळासाहेबांच्याच नशिबी कसे आले. सद्यपरिस्थिती अशी आहे, “उद्धव ठाकरे हे सत्तानामक मादक सौंदर्याच्या अॅटमबॉम्बमध्ये मश्गूल अन् संजय राऊत मोकाट.”
मैदानात खेळ सुरू असतो, क्रिकेट-फुटबॉल वैगेरे. मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. सनसनाटी-उत्कंठतेने परिसीमा गाठलेली, माजलेला हल्लकल्लोळ. अशात प्रेक्षकांतून एखादा चावट, वात्रट कंपू निरोधाचा फुग्यासारखा वापर करतात. हवा भरून सोडून देतात. तो उडत राहतो, जरासा खाली येतो त्याला दुसरा त्यानंतर तिसरा, चौथा मैदानाच्या दिशेने ढकलत असतो अन् मैदानात वेगळीच करमणूक सुरू होते. शेवटी तो खेळाच्या मैदानावर स्थिरावतो, खेळात व्यत्यय आणतो. संपूर्ण प्रेक्षक वर्ग व कॅमेरे त्यावर रोखले जातात. अंततः अंपायर-रेफ्री वा एखादा खेळाडू धावत येतो, त्यास पायाखाली चिरडतो अन् त्याचे चिपाड होते. ही घटना अल्पशी करमणूक घडवून, लागलीच विस्मृतीत जाते आणि खेळ पूर्ववत सुरू होतो.