क्राइम : अॅड. रिया करंजकर
आज-काल पैशाच्या बाबतीत माणसं माणसांना सर्रास फसवतात. जेव्हा एखाद्याला पैशांची गरज असते, तेव्हा ते देणाऱ्याकडे हात जोडून, पाया पडून विनवणी करतात. पण हेच पैसे परत करायची वेळ येते तेव्हा देणाऱ्याला सतत घराच्या फेऱ्या मारायला लावतात. देणारा जेव्हा पैशांची मागणी करतो, तेव्हा त्याची व्यवस्था भिकाऱ्यागत करतात. पैसे परत करताना मात्र घेणाऱ्याकडे वेळ नसतो. घेताना जेवढ्या फेऱ्या मारल्या नसतील, तेवढ्या पैसे परत मागण्यासाठी माराव्या लागतात, ही आजच्या घडीची परिस्थिती आहे.
समर्थ रोड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा अंतर्गत रस्ते बनवण्याचा व्यवहार चालत होता. कामगारांमुळे कंपनी काही कालावधीमध्ये भरभराटीस आली होती. त्यामुळे कंपनीतील व्यवस्थापक मंडळाने कंपनीची इतर गुंतवणूक करावी, असे ठरवले. त्यानुसार काही दुकानांचे गाळे विकत घेण्यात आले व काही फ्लॅट विकत घेण्यात आले, जेणेकरून दुकानांचे गाळे व फ्लॅट भाड्याने देऊन कंपनीचा फायदा करून घेण्याचा हेतू व्यवस्थापक मंडळाचा होता. म्हणून कंपनीने दुकाने व फ्लॅटमध्ये कंपनीच्या पैशांची गुंतवणूक केली. व्यवस्थापक मंडळाने ठरवल्याप्रमाणे वाशीमधील फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्याचं ठरलं आणि त्यानुसार मिस्टर कुशवाहा यांनी कंपनीकडून लिव्ह लायसन्सवर फ्लॅट घेतला. त्यांच्यामध्ये तीन वर्षांचा भाडेकरार झाला.
कंपनीमार्फत हा व्यवहार मिस्टर बाफना बघत होते. भाडे करारानुसार कंपनीला एक लाख रुपये डिपॉझिट आणि महिन्याला फ्लॅटचे २० हजार भाडे ठरवण्यात आले होते.
मिस्टर कुशवा यांनी एक वर्ष व्यवस्थित भाडं दिलं. त्यानंतर मात्र मिस्टर कुशवाह कंपनीला फ्लॅटचा व्यवस्थित भाडं देताना टाळाटाळ करून लागले. त्यामुळे कंपनीमार्फत मिस्टर बाफना यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी मिस्टर कुशवाह यांनी माझी आर्थिक परिस्थिती कठीण आहे, असे सांगत मी तुमचं भाडं पूर्ण करीन, असे सांगितले. अशी टाळाटाळ करता करता दोन वर्षे होत आली. त्यावेळी कंपनीने एक लाख रुपये डिपॉझिटमधून भाडे कट केलं व बाकीचे उरलेले तीन लाख ८० हजार रुपये भाडे त्यांनी भरावे, अशी नोटीस पाठवली. त्यावेळी कुशवाह यानी नोटिशीला उत्तर दिले नाही. पोस्टडेटेड चेक कंपनीला दिले. त्याची रक्कम ३ लाख ८० हजार अशी होती. कंपनीला वाटलं की, आता आपल्या भाड्याचे पैसे मिळाले. त्याच्यामुळे ते काही काळ शांत बसले. पण ज्यावेळी चेक बँकेमध्ये टाकण्यात आला, त्यावेळी तो बाऊन्स झाला. या वेळी मिस्टर कुशवाह यांना फोन करण्यात आला. त्यांनी फोन उचलला नाही म्हणून कंपनीने वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवली. त्या नोटीसलाही मिस्टर कुशवाह यांनी उत्तर दिलं नाही.
या दोन वर्षांच्या काळात कंपनी त्यांना फ्लॅट खाली करायला सांगत होती. त्यावेळी फ्लॅट खाली करण्यासाठी ते सतत टाळाटाळ करत होते आणि अचानक नोटीस गेल्यानंतर शेजाऱ्यांचा त्यांच्या फोन कंपनीला आला की, तुम्ही ठेवलेल्या भाडोत्रीने खोली खाली केलेली आहे. तेव्हा कंपनीमार्फत मिस्टर बाफना त्या ठिकाणी गेले असता त्यांना पूर्ण फ्लॅट रिकामा केलेला दिसला. म्हणजेच मिस्टर कुशवाह यांनी फ्लॅट खाली करत आहे, याची कल्पना समर्थ रोड कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली नाही. मिस्टर कुशवाह यांनी परस्पर रूम खाली केली. कंपनीचे पूर्ण भाडे न देता, चेक देऊन ते बाऊन्स झालेत याची कल्पना असूनही त्यांनी न सांगता तो फ्लॅट खाली केला.
कंपनीच्या कामगाराने मिस्टर कुशवाहा नवीन कोणत्या ठिकाणी राहायला गेले त्याचा शोध घेऊन वकिलांच्या मार्फत नोटीस गेल्यानंतर एक महिन्याच्या आत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एस/१३८प्रमाणे बेलापूर कोर्टामध्ये चेक बाऊन्सअंतर्गत मिस्टर कुशवाह यांच्याविरुद्ध समर्थ रोड कन्स्ट्रक्शन कंपनीने केस दाखल केली. केस दाखल केल्यानंतर पहिली नोटीस मिस्टर कुशवाह राहत असलेल्या नवीन फ्लॅटवर गेली. पण तिथे ते इथे राहत नाही, अशी खोटी माहिती दिली. याचाच अर्थ मिस्टर कुशवाह यांनी तेथील वाॅचमनला, “माझ्या नावाने कुठली पत्रे येतील त्यांना मी इथे नाही असं सांग”, असे बजावून सांगितले होते. कंपनीच्या कामगाराने चौकशी केली असता मिस्टर कुशवाह त्याच बिल्डिंगमध्ये राहायला आहेत. पण कोर्टाकडून आलेल्या नोटिशी ते स्वीकारत नाहीत. त्याच्यामुळे आता बेलापूर कोर्टामध्ये पुढील कारवाईसाठी केस चालू झालेली आहे.
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एस/१३८ हा कायदा लागू करूनही संशयित वृत्तीची लोकं सामान्य माणसांना चेक देऊन पळवाटा काढत असतात आणि सामान्य माणसांच्या हे लक्षात येत नाही. त्यांना वाटतं चेक मिळाला म्हणजे आपले पैसे मिळाले. पण तो चेक बँकेत जाईपर्यंत व पैसे मिळेपर्यंत तो फक्त एक कागद असतो, हे मात्र या लोकांच्या लक्षात येत नाही आणि हे संशयित वृत्तीचे लोक सामान्य माणसांना त्रास देतात आणि चेक देणारे मात्र पळवाटा शोधत असतात. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगायला हवी, कारण यात घेणाऱ्यापेक्षा देणाराच फसला जातो.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)