धरमशाला (वृत्तसंस्था) : भारताचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे.
या झटपट मालिकेतील अंतिम संघा ऋतुराजचा समावेश नक्की होता. मात्र, मनगटाच्या दुखापत झाल्याने तो सलामीला खेळू शकला नाही. दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नसल्याचे संघ बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
उजव्या मनगटात वेदना होत असल्याचे ऋतुराजने लखनऊ येथील पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्याच्या मनगटाचा एमआरआय स्कॅनही काढण्यात आला. स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून त्याच्याबाबत सल्ला घेण्यात आल्यावर तो टी-ट्वेन्टी मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. या दुखापतीनंतर आता ऋतुराज काही दिवसांसाठी बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होणार आहे. त्याच्या दुखापतीवर पुढील उपचार तेथेच केले जाणार असून त्या दृष्टीने त्याचे तिथेच काही दिवस वास्तव्य असेल.
ऋतुराज गायकवाडच्या जागी भारतीय संघाच्या निवड समितीने मयंक अग्रवाल याचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मयंकचा समावेश आहे. त्यामुळे तो टीम इंडियाच्या बायो-बबलमध्येच होता. ऋतुराज उपलब्ध असल्याने मयंक हा धरमशाला येथे जाऊन भारताच्या टी-ट्वेन्टी संघात दाखल झाला.
भारताने विजयी सलामीसह श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पाहुण्यांचे दोन क्रिकेटपटूही दुखापतग्रस्त
भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठा दुहेरी धक्का बसला. फिरकी गोलंदाज महिष तिक्ष्णा आणि वेगवान गोलंदाज शिरन फर्नांडो हे दोन स्टार खेळाडू दुखापतींमुळे उर्वरित दोन्ही टी-ट्वेन्टी सामन्यांना मुकले आहेत. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याआधीच मालिकेबाहेर झाला होता. त्याबरोबरच फलंदाज कुशल मेंडिस याचाही सामन्यातील सहभाग संशयास्पद आहे. तिक्ष्णा आणि मेंडिस हे सध्याच्या श्रीलंकेच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जातात. शिरन फर्नांडोनेही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.