रशिया-युक्रेन यांच्यात सीमेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता युद्धात झाले आहे. दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यात रशियाने युक्रेनवर अचानक हल्ला चढविल्याने भीषण स्थिती निर्माण झाली असून रशियाच्या फौजा थेट युक्रेनची राजधानी कीव्ह शहरापर्यंत पोहोचल्या आहेत. युक्रेनमधील अनेक शहरांत तुंबळ युद्ध सुरू असून हा संघर्ष शांततामय आणि चर्चेच्या माध्यमातून शमविला नाही, तर त्यातून फार मोठा अनर्थ घडून तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रशियाने आगळीक करत युक्रेनवर हल्ला केला असून राजधानी कीव्हसह अनेक शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. त्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून दोन्ही बाजूंकडे जीवितहानी झाली आहे. या दोन देशांत युद्ध भडकले असतानाच त्याचे पडसाद अवघ्या जगभरात उमटलेले दिसत आहेत. नाटो देशांनी रशियाच्या कृतीचा कठोर शब्दांत निषेध केला असून युक्रेनमधून तत्काळ सैन्य माघारी घ्यावे, असे म्हटले आहे. या संकटात ‘नाटो’ युक्रेनसोबत आहे, तर दुसरीकडे युक्रेन-रशिया संघर्षावर भारताची भूमिका काय असणार, याकडेही अनेक देशांचे लक्ष लागले आहे.
हे युद्ध थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि पुतीन यांच्याशी चर्चा करावी, अशी इच्छा युक्रेनकडून प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यातच या घटनाक्रमावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारीक लक्ष असून उत्तर प्रदेशातून प्रचार उरकून दिल्लीत दाखल होताच मोदी यांनी उच्चस्तरिय बैठक घेतली. बैठकीत युक्रेनमधील स्थितीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. या बैठकीनंतर महत्त्वाचे अपडेट्स हाती आल्यानंतर मोदी यांनी लगोलग रात्री उशिरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली. युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, असे आवाहन मोदी यांनी यावेळी पुतीन यांना केले. मोदी आणि पुतीन या जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटांची चर्चा झाली. मुख्य म्हणजे मोदी-पुतीन यांच्यातील ही चर्चा सकारात्मक झाली असून युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असे नमूद करत युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, अशी ठोस भूमिका या वेळी मोदी यांनी घेतली आहे. रशियाचा नाटो देशांशी वाद असेल, तर त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले.
युक्रेनमध्ये भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांना तिथून सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचेही आव्हान आहे, यावर मोदी यांनी पुतीन यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्याला पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुतीन यांनी एकंदर स्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केले तसेच ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर पुढे अधिक विचारमंथन करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. भारत आणि रशिया या दोन देशांत गेली अनेक वर्षे मैत्रीचे संबंध आहेत. त्या आधारावर दोन्ही नेत्यांमधील चर्चा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय नागरिक अडकले आहेत, तर ४ हजार नागरिक तेथून निघाले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड आणि हंगेरीमार्गे माघारी आणण्याची योजना आहे. युक्रेनचे हवाईक्षेत्र बंद असल्याने या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे. दुसरीकडे, भारतीय दूतावासही अलर्ट मोडवर असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेगवान पावले तेथे टाकली जात आहेत. विशेष म्हणजे युक्रेनला युद्धात हरएक प्रकारे मदत उपलब्ध करून देण्याच्या वल्गना करणाऱ्या अमेरिकेने मात्र रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होण्याचा निर्णय घेतला व रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली. व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची निवड केली असली तरी रशियन जनतेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. तसेच पुतीन यांच्याशी संवाद साधण्याची कोणतीही योजना नाही, असे ‘व्हाइट हाऊस’मधून बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेचा तेथील नागरिकांकडूनही निषेध करण्यात येत आहे. मात्र या वादात भारतही आता महत्त्वाच्या भूमिकेत येतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन संकटाबाबत भारत आणि अमेरिकेची भूमिका समान नसल्याचे पुढे आले आहे.
भारताची रशियाशी जुनी आणि सुदृढ मैत्री आहे. सोबतच गेल्या दीड दशकांत विशेषत: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अवलंबिलेल्या मैत्रीपूर्ण परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेसोबतही भारताची धोरणात्मक भागीदारी अभूतपूर्व वेगाने वाढली आहे. भारतीय सैन्यदलांकडे आज जी काही शस्त्रसामग्री, लष्करी उपकरणे आहेत, त्यांत रशियन बनावटीच्या साधनांचा सर्वाधिक हिस्सा आहे. प्रदीर्घ काळापासून उभय देशांतील घनिष्ठ मैत्रीचा हा परिपाक होय. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या १९७१च्या युद्धात अमेरिकन व ब्रिटिश युद्धनौका पाकिस्तानच्या मदतीला येण्याच्या तयारीत असताना रशियन युद्धनौका भारताच्या मदतीला आल्या होत्या. संयुक्त राष्ट्र संघात रशिया अनेकदा भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. भारत-रशिया यांच्यात प्रदीर्घ काळापासून लष्करी साहित्याचे संयुक्तपणे उत्पादन केले जात आहे.
रशियन बनावटीच्या सुखोई एमकेआय-३० या लढाऊ विमानांची हिंदुस्थान अॅरोनॉटिक्सने बांधणी केली. आजवर २००हून अधिक सुखोईंची बांधणी झाली आहे. ‘ब्राह्मोस’ क्रूझ क्षेपणास्त्र हेदेखील उभय देशांतील मैत्रीचे फलित आहे. या युद्धस्थितीत जग दोन बाजूंना विभागले गेले आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश असे अनेक देश युक्रेनला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तान मात्र रशियाला पाठिंबा देत अप्रत्यक्षपणे युद्धाचेच समर्थन करत आहेत. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत भारताला अतिशय सावधपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. तसेच हे करताना रशिया आणि भारत यांच्यातील प्रदीर्घ मैत्रीचा जणू कसच लागणार आहे. म्हणूनच मोदींनी रशियाला दिलेला शांततेचा सल्ला हा जगासाठी हिताचा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.