शिबानी जोशी
स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर काम करणाऱ्या भगिनी निवेदितांच्या कार्यमग्न व निरलस जीवनावरून प्रेरणा घेऊन ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, सांगली’ या नावाने सांगली येथे एक अखिल भारतीय महिला संस्था १९७० साली सुरू झाली.
डॉ. कुसुमताई घाणेकर या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या संस्थापिका. सामाजिक संवेदनांबाबत कुसुम कोमल व योजना राबवताना वज्रकठोर होत असलेल्या कुसुमताईंच्या विलक्षण, कल्पक, धाडसी वृत्तीमुळे भगिनी निवेदिताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. एड्ससारख्या महाभयंकर रोगाला बळी पडणाऱ्या महिलांसाठीची योजना अंगावर घेतली आणि अशी योजना राबवणारी ही आशिया खंडातली पहिली महिला संस्था ठरली होती. ज्या एड्सग्रस्त महिलांना मरणासन्न अवस्थेत सोडून कुणी पुढे येत नव्हतं अशा महिलांना कुसुमताईंनी शेवटपर्यंत सांभाळले.
२८ जून १९२५ साली कुसुमताईंचा जन्म झाला. कुसुमताई राष्ट्रसेविका समितीच्या संपर्कात आल्यावर वंदनीय मावशी केळकर यांच्याकडे पाहून आपणही असे काही नि:स्वार्थी, समाजोपयोगी काम केले पाहिजे, हा त्यांच्या विचार मनात रुजला. इकडे घरी मात्र विवाहाच्या चर्चा जोरात होत होत्या. कुसुमताईंनी एकदम दोन निश्चय जाहीर केले होते. एक डॉक्टर होण्याचा व दुसरा आजन्म अविवाहित राहण्याचा. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रसेविका समितीत पूर्णवेळ देऊन काम करताना महाराष्ट्राबाहेर प्रवास करून तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांत महिना महिना राहून तिथे समितीचे बस्तान बसवले होते.
सांगलीतही त्यांनी समितीला पूर्ण वेळ देतील, अशा तरुणींचा एक चांगला गट बांधला होता. १९६७ साली समितीने भगिनी निवेदितांचे जन्मशताब्दी वर्ष जोरदार साजरे केले. निव्वळ शताब्दी करून थांबू नये, तर निवेदितांप्रमाणे काहीतरी भरीव, प्रकल्पात्मक काम उभे केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे पुढे कुसुमताई काही मैत्रिणींसह समितीच्या प्रत्यक्ष कामातून बाजूला झाल्या. मावशींचे व कुसुमताईंचे एकमेकींवरील प्रेम, विश्वास कायम होताच. पण काही भरीव काम करण्यासाठी स्वतः डॉक्टर असल्यामुळे सांगलीत दवाखाना काढायचा निर्णय घेतला व भाड्याच्या खोलीत स्वतंत्र दवाखाना सुरू केला. सुरुवातीला पैशाअभावी लहान मुले लसींपासून वंचित राहू नयेत यासाठी स्वतः पैसे घालून व लोकवर्गणी जमवून मोफत लसीकरण द्यायला सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीची परवड व समाजातील दुय्यम स्थान या पाहत व अस्वस्थ होत.
अन्य गावांत असलेल्या मैत्रिणींशी संपर्क करून त्यांना एकत्र आणले, तर एक मोठे काम उभे करता येऊ शकते हा विश्वास त्यांना वाटत होता. महिला व मुले यांच्यासाठी जे काही करावे लागेल ते करणे हे ध्येय, निवेदिता ही प्रेरणा व त्यांचे ‘काम, काम व सतत काम’ ही आपली कार्यपद्धती त्यांनी ठरवली व १९७० ला संस्थेचे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान हे नाव ठरले.
पहिला उपक्रम ठरला तो महिलांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा. ‘माहेर’ नावाने राजवाड्यातील भाड्याच्या जागेतील एका खोलीत हे हक्काचे माहेर सुरू झाले. पुढे त्याचे रूपांतर काम करणाऱ्या महिलांसाठीच्या वसतिगृहात झाले आहे. सुरक्षित जागा, उत्तम जेवण, घरगुती वातावरण यामुळे वसतिगृहामध्ये संख्या वाढत गेली आहे.
कुसुमताईंच्या समितीतील सहकारी कमलताई जोग, याही अविवाहित, बँकेत नोकरी करणाऱ्या होत्या. त्या प्रथमपासून कुसुमताईंसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. दोघींनीही तन मन धन अर्पून संस्थेमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं.
संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी यासाठी कुसुमताईंनी कॅण्टिन चालवायची कल्पना मांडली. मग गावात एक दुकान घेऊन तिथे खाद्यपदार्थ, वह्या पुस्तके इ. चे विक्री केंद्र सुरू झाले.
महाराष्ट्राच्या समाजकल्याण खात्याशी संपर्क आला त्यातूनच सरकारची प्रौढ शिक्षणाची योजना मिळाली. त्या प्रौढ शिक्षण केंद्रांना सरकारकडून उत्तम केंद्रांची पारितोषिकेही मिळाली. संस्थेने ग्रामीण भागात घेतलेल्या सात जनसहभाग शिबिरांच्या यशामुळे देशभर अशी शंभर शिबिरे घेण्याचे काम संस्थेला मिळाले व यानिमित्ताने गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत संस्थेचे पाऊल पडले. महिलांना योजनांचे लाभ घ्यायला घरातून पाय मोकळा व्हायला हवा, यातून पाळणाघरे सुरू झाली. देशभरात तीनशेच्या वर पाळणाघरे चोख शिस्तीने चालू केली होती.
मग त्यांना मुलांच्या आरोग्याचे प्रश्न दिसले. त्यातून पोषक आहार देणे हे सुरू झाले. कुसुमताई स्वतः उत्तम सुगरण होत्या. सोयाबीन तेव्हा इतके प्रचलित नव्हते. पण कुसुमताईंनी सोयाबीनची जोड देऊन अनेक पदार्थ कल्पकतेने बनवले होते. त्याकाळी ते सांगलीत मथुताई करमरकरांच्या देखरेखीखाली ‘सेंट्रल किचन’मध्ये तयार होऊन देशभरातील संस्थेच्या पाळणाघरांत वितरित केले जात.
कुसुमताईंच्या या प्रयोगांचे कौतुक ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांनी ‘मी मांडत असलेले विषय प्रत्यक्ष आचरणात आणणारी अन्नपूर्णा’ या शब्दांत केले होते. त्यानंतर छोट्या जागेतून सुरू झालेल्या संस्थेची राजवाडा भागात स्वतःची वास्तू झाली. त्या जागेत व पुढे पोलीस स्टेशनच्या आवारात अशी दोन कुटुंब सल्ला केंद्रे सुरू झाली. महिलांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्रेही चालवली. नागपूरलाही भव्य वर्किंग वुमन्स होस्टेल सुरू झाले. संस्थेचे अनाथाश्रम सुरू झाल्यावर पूर्ण अनाथ मुलींचे शिक्षण व विवाहापर्यंतची जबाबदारी संस्थेने सहजपणे घेतली. त्यांचे विवाह, माहेरपण, बाळंतपण संस्थेने मायेने केलेय.
सांगलीच्या जिल्हाधिकारी लीनाताई मेहेंदळे यांच्याशी चर्चा होऊन सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्मूलनसाठी काही ठोस प्रकल्प उभारावा, असे ठरले. त्यांच्यामुळे संस्थेला जत येथे जागा मिळाली. तेथे देवदासी पुनर्वसन केंद्राची स्थापना झाली. पण हे चक्र थांबण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारने देवदासींच्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे चालवावीत, हा विचार कुसुमताईंनी सरकार दरबारी रेटून योजना मंजूर करून घेतली व जत येथे वसतिगृह सुरू झाले.
एचआयव्ही एड्स हा भयंकर आजार त्या काळात वेगाने जगभर पसरला. त्यावर उपाय माहिती नव्हते. देहविक्रय करणाऱ्या महिला याची दुर्दैवी शिकार बनत. सरकारी यंत्रणेला या विषयात काहीतरी पावले उचलणे भागच होते. मुंबईत आरोग्य मंत्रालयाने अनेक संस्थांना बोलावून चर्चा झाल्या. या कामाला कुणीच हात घालू धजत नव्हते. कुसुमताईंनी हा विडा उचलला आणि म्हणूनच एचआयव्हीविषयात महिलांच्या उपचार व पुनर्वसनाचा निवासी प्रकल्प चालवणारी निवेदिता ही आशिया खंडातली पहिली एनजीओ ठरली होती. पुढे मग यशवंतनगरलाच एचआयव्हीबाधित स्त्रीयांच्या मुलींसाठी निवासी योजना सुरू झाली. नियमित एआरटी व आश्रमातील मोकळे आवार, शुद्ध हवा, चांगला आहार यांमुळे मृत्यूदर जवळजवळ शून्यावर आला होता.
कुसुमताई व कमल ताईंच्या पश्चात कुसुमताईंच्या नावाने त्यांच्या प्रतिमेला साजेशी रुग्णसेविका प्रशिक्षण केंद्र व कमलताईंच्या नावाने विद्यार्थिनी वसतिगृहही उभे राहिले आहे.
सरकारने एचआयव्ही महिलांची योजना बंद केली. पण संस्थेने स्वखर्चाने त्यांना अखेरपर्यंत सांभाळले. त्यातील तीन-चार जणी सुधारल्यावर संस्थेतच कामाला लागल्या.
समितीत आत्मसात केलेली शिस्त व संस्कार सतत कुसुमताईंच्या कामातून दिसत असत. एका तरुण महिलेने इतकी मोठी स्वप्ने पाहावीत व आपल्या हाताने एक एक वीट रचत हे निवेदिता मंदिर उभे करावे हे अद्भुत आहे. आता सध्या वसतिगृह, तिन्ही आश्रम, २ सल्ला केंद्र, जतला कॅण्टिन, महिलांना तात्पुरतं राहण्यासाठी स्वाधारगृह, वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, कर्नाटकमध्ये पाळणा घरे सुरू आहेत. यानंतर वसतिगृहाच्या भागात पाळणाघर, निराधार महिलांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची योजना आहे. त्याशिवाय जपानला केयर गिव्हर्स हवेत, हे कळल्यावर जपानी भाषेचं शिक्षण तसेच आरोग्यसेवेचे शिक्षण गरीब मुलांना देऊन जपानमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न संस्थेचे सुरू आहेत.
संस्थेच्या ५१ वर्षांच्या वाटचालीला कुसुमताईंचे प्रेरक व्यक्तिमत्त्व व निवेदितांनी दिलेला विचारांचा वारसा मिळालाय व त्या बळावरच पुढील वाटचाल संस्थेला सुरू ठेवायची आहे.