Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनव्या मार्गिकेमुळे रेल्वे प्रवास होणार सुखकर

नव्या मार्गिकेमुळे रेल्वे प्रवास होणार सुखकर

मुंबईतील लोकलसेवा ही समस्त मुंबईकरांची जीवनवाहिनी (लाइफलाइन) आहे. दोन कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आर्थिक राजधानीमध्ये जवळपास ७५ ते ८० लाख रोज लोकलने प्रवास करतात. बेस्टसोबत रिक्षा, टॅक्सी आणि आता मेट्रो ट्रेन आली तरी सर्वांना परवडणारी अशी एकमेव सेवा म्हणजे लोकल. मात्र मुंबईचा विस्तार झाल्यानंतर आणि लोकसंख्या वाढत गेल्यानंतर लोकलसेवेवर ताण जाणवू लागला आहे. मुंबईच्या लोकलसेवेतील मुख्य कणा मध्य रेल्वे आहे. मार्गिकांची कमी संख्या पाहता मध्य रेल्वेची सेवा कायम विस्कळीत होत आहे. एकाच मार्गिकेवरून लोकल आणि एक्स्प्रेस सेवा सुरू असल्याने लोकल प्रवास वेळेवर होण्यास अनंत अडचणी येत होत्या. मात्र मुंबईवासीयांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय कायम प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू करण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. या रेल्वे मार्गिका आणि अधिकच्या रेल्वे गाड्या मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल आणतील. रेल्वेप्रवास सुपरफास्ट होईल. मुंबईच्या कधी न थांबणाऱ्या जीवनाला अधिक वेग येईल. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस यांचा एकमेकांच्या मार्गातील खोळंबा या नव्या मार्गिंकामुळे दूर होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल ट्रेन सुरू होत असल्याची घोषणा केली. यामध्ये एसी लोकलचाही समावेश आहे. उपनगरीय गाड्या लोकलसेवा आधुनिक व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी होती. नव्या मार्गिकांचा हा प्रकल्प रखडला होता. काही आव्हाने होती. त्यावर मार्ग काढत आपल्या मजुरांनी आणि अभियंत्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. अनेक पूल, बोगदे आणि फ्लायओव्हर उभे केले, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका ही २००८मध्ये मंजूर झाली आहे. मात्र तिच्या लोकार्पणासाठी २०२२ वर्ष उजाडले. भाजप सरकारच्या काळात या आणि अशाच सर्वच प्रमुख प्रकल्पांना वेग मिळाला आहेत. कोरोनाच्या काळातही रेल्वेचे सक्षमीकरणाचे काम थांबले नाही. रेल्वेने या काळात मालवाहतुकीतही विक्रम केला. हजारो किलोमीटर्सच्या मार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करण्यात आले. किसान रेल्वे सुरू करण्यात आली. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील प्रकल्पांना मार्गांना गती देण्यासाठी पीएम गतीशक्ती नॅशनल प्लॅन अंतर्गत विविध यंत्रणांना एकाच प्रणालीत गुंफण्यात आले. मुंबईतील प्रकल्पांनाही याच गतीशक्तीद्वारे चालना दिली जात आहे. गरीब आणि सर्वसामान्यांच्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्येही गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधांपासून ते वंदे भारत रेल्वे अशा सेवांचा सुविधा यात समावेश आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे, असेही मोदी म्हणाले. मुंबईने स्वतंत्र भारताच्या निर्मितीतही मोठे योगदान दिले आहे. आता २१ व्या शतकातही आत्मनिर्भर भारतच्या उभारणीतही मुंबईचे योगदान राहील. यासाठी मुंबईत अनेकविध सुविधांच्या आधुनिकतेवर, तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. यासाठी मेट्रोचे जाळेही विस्तारण्यात येत आहे. आधुनिक सिग्नल यंत्रणा, अत्याधुनिक रेल्वेस्थानक उभारण्यात येत आहे. मुंबईतल्याच नव्हे तर मुंबईच्या बाहेर अन्य राज्यांना जोडणाऱ्या रेल्वेसेवांमध्येही सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे. यात मुंबई-अहमदाबाद या हायस्पीड ट्रेनचे उदाहरण उत्तम ठरेल. अशा प्रकल्पांतून मुंबईची ओळख आणखी सशक्त करण्यावर भर असेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

मध्य रेल्वेवरील दोन नव्या मार्गिकांमुळे लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनसाठी आता वेगळे मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल प्रवाशांना आता ताटकळत उभे राहावे लागणार नाही. तसेच मेगाब्लॉकमुळे होणारे प्रवाशांचे हालही आता थांबणार आहेत. राज्यातील ठाकरे सरकारला आता आगामी मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांचे वेध लागलेत. त्यामुळे ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान सुरू झालेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करेल. मात्र त्यांनी फुकाचे क्रेडिट घेऊ नये, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी विरोधकांना दिला. २००८ला हे काम मंजूर झाले असले तरी मोदी सरकार आल्यानंतर त्यास गती मिळाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मार्गिका कामाचे श्रेय जाते, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकलसेवा लोकाभिमुख करण्याचे काम रेल्वे मंत्रालय करत आहे. ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान सुरू झालेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका हा केवळ ट्रेलर आहे. राज्य सरकारची सक्षम साथ मिळाल्यास मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर करू, हे यानिमित्ताने पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारला सूचित करायचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -