Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीशहीद जवान रोमित चव्हाण यांना साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

शहीद जवान रोमित चव्हाण यांना साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

सांगली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सांगलीचे जवान रोमित चव्हाण अवघ्या २३ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचे मूळ गाव शिगाव येथे सोमवारी सकाळी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित ग्रामस्थांनी रोमित चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे.

जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन कारवाईच्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये सांगलीचे सुपुत्र जवान रोमित दहशतवाद्यांशी लढताना शनिवारी शहीद झाल्याचे वृत्त समजले. त्यानंतर कुटुंबियांवर आणि अवघ्या गावात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी इस्लामपूर आणि त्यानंतर शिगाव येथे आणण्यात आले. गावातून अंत्ययात्रा वारणा नदीकाठी आली. तेथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेआठच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघा जनसागर उसळला होता. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

रोमित यांचे फोटो असलेले बॅनर गावात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. रोम्या भावा, तुझी नेहमी आठवण येईल, असे संदेश त्यांच्या मित्रांनी पोस्टरवर लिहिले होते.

अतिशय कर्तबगार असा जवान शहीद झाला – जयंत पाटील

पालकमंत्री जयंत पाटील यावेळी दु:ख व्यक्त करत म्हटले की, पाच वर्षांपूर्वी रोमित सैन्यात सामिल झाला. रोमित अत्यंत धाडसी असा होता. आतंकवाद्यांना प्रत्युत्तर देताना रोमितला वीरमरण आले आहे. एक अतिशय कर्तबगार असा जवान शहीद झाला. शिगाव गावचा तो बहुमान होता. आम्हा सर्वांना रोमितचा सदैव अभिमान राहिल, त्याचं योगदान आम्ही कधी विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.

लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण

रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. रोमित पाच वर्षांपूर्वी मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण झाले. तिथून त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली होती. १७ मार्च २०१७ रोजी लष्करात दाखल झालेले राष्ट्रीय रायफल्स बटालियन अंतर्गत ४ महार रेजिमेंटशी संबंधित होते. रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे सांगलीतील राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी, तर धाकटी बहीण शिक्षण घेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -