डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजारात मागील आठवडा हा मोठ्या प्रमाणात चढ-उतारांचा ठरला. आपण आपल्या मागील लेखातच सांगितल्याप्रमाणे निर्देशांक निफ्टीची दिशा तेजीची असून १६८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर
आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील, असे सांगितले होते.
मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या चढ- उतारानंतर देखील १६८०० ही पातळी कायम राहिली, निफ्टीने मागील आठवड्यात १६८०९ हा नीच्चांक नोंदविला आणि त्यानंतर निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुढील काळाचा विचार करता आंतरराष्ट्रीय घडामोडी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रशिया आणि युक्रेन यामध्ये चालू असलेला तणाव, युद्धजन्य परिस्थिती, इतर बाबतीत चालू असलेला तणाव या सर्वांचा विचार करता शेअर बाजारात सावधानतापूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील काळात जर युद्ध किंवा त्या प्रकारची शक्यता निर्माण झाल्यास शेअर बाजारात फार मोठे चढ-उतार पाहावयास मिळतील.
ज्या ज्या वेळी आंतरराष्ट्रीय तणावजन्य परिस्थिती निर्माण होते त्या वेळी आजपर्यंतचा इतिहास बघता जास्तीत जास्त गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये येते. मागील आठवड्याच्या चार्टचा विचार करता पुढील काळात देखील सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक येऊ शकते. मागील आठवड्यात झालेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावजन्य परिस्थितीनंतर सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारे संकेत दिलेले आहेत.
सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५६४०० आणि निफ्टीची १६८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्या तेलाने या पूर्वीच तेजीचे संकेत दिलेले असून, जोपर्यंत कच्चे तेल ६४०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्या तेलात आणखी मोठी वाढ होणे अपेक्षित आहे.
अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची झालेली असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार सोन्याने ४९७०० ही पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत. आता सोन्याची ४८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित
आहे.
अल्पमुदतीसाठी चांदीची दिशा ही देखील तेजीची झालेली आहे. मात्र मध्यम मुदतीच्या चार्टनुसार चांदी अजूनही रेंज बाऊंड आहे. सध्या चांदी ६२००० ते ६५५०० या पातळीत अडकलेली असून जोपर्यंत या रेंज बाऊंड अवस्थेतून चांदी बाहेर पडत नाही तोपर्यंत चांदीत फार मोठी वाढ होणार नाही. शेअर बाजार हा अत्यंत भावनाप्रधान असतो. थोड्या फार
नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देत असतो. मूलभूत विश्लेषणानुसार निर्देशांक उच्चांकाला असून गेल्या काही महिन्यांत निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे. सोन्याने दिलेले तेजीचे संकेत लक्षात घेता पुढील काळात निर्देशांकात मोठे करेक्शन होऊ शकते.
जर निर्देशांक निफ्टीने १६८०० ही पातळी तोडली, तर निर्देशांकांची दिशा मंदीची होईल. त्यामुळे ही पातळी लक्षात ठेवून त्यानुसार व्यवहार करावेत. पुढील काळात शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यास दीर्घमुदतीसाठी गुंतवणुकीचा विचार करता येईल. त्यामुळे मूलभूत बाबतीत उत्तम असणाऱ्या आणि सातत्याने उत्तम परतावा देणाऱ्या कंपन्याकडे लक्ष हवेच.