मंजिरी ढेरे
संगीताला अथांग सागराची उपमा दिली जाते. ते अथांग, अवीट आणि बहुआयामी आहे. संगीतक्षेत्रात प्रत्येकाची अभिरुची वेगळी असते. प्रत्येक संगीतकाराच्या गाण्याचा पोत वेगळा असतो. पण, असं बहुपेड असलं तरी सुश्राव्य, ताल-लयीचं भान असलेलं, कालसुसंगत असं संगीत कानसेनांना नक्कीच भावतं. या धर्तीवर बघायचं झाल्यास बप्पी लाहिरींनी एक काळ गाजवला हे नाकारून चालणार नाही. ‘याद आ रहा है तेरा प्यार’, ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘प्यार बीना चैन कहा रे’, ‘बंबई से आया मेरा दोस्त’ यासारखी त्यांची उडत्या चालीची आणि तरुणाईला ठोक्यावर नाचायला लावणारी, डान्स फ्लोअर दणाणून सोडणारी गाणी याची साक्ष देतात. ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’, ‘शराबी’ यासारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या गाण्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली हे एका पिढीला आठवत असेल. आपल्या धडाकेबाज गाण्यांबरोबरच सोन्याच्या वेडानं वेगळी ओळख निर्माण करणारं एक रंगतदार व्यक्तिमत्त्व म्हणजे बप्पी लाहिरी अर्थात आलोकेश लाहिरी! प्रदीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली आणि भारतीय संगीतविश्वाला रॉक तसंच डिस्को संगीताची खाशी ओळख करून देणारं हे नाव काळाच्या पडद्याआड गेलं. आता संगीतविश्व त्या जमान्यापासून बरंच पुढे निघून आलं आहे. मात्र, बप्पीदांचं वेगळेपण कायमच स्मरणात राहील.
त्यांची आणि पॉप गायिका उशा उत्त्थुपची जोडी चांगली जमली. ‘वन, टू चा चा चा’, ‘कोई यहाँ नाचे, नाचे’, ‘नाका बंदी’, ‘लॉकेट’, ‘मैं आ गई, सुपरस्टार…’ अशी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी या दोघांनी दिली. उशाजींसोबत हरी ओम हरी, रांबा हो आणि कोई यहां नाचे नाचेसारखी सुपरहिट गाणी केल्याचा त्यांना अभिमान वाटायचा. बप्पीदा खऱ्या अर्थाने भारताचे डिस्को किंग होते. त्यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून डिस्को हा प्रकार भारतात प्रचलित केला. बप्पीदांनी सुमधुर गाणी दिली. चलते-चलते, माना हो तुम बेहद हसीं… ही त्यांची गाणी मैलाचा दगड ठरली. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात बरंच काम करून ठेवलं आहे. त्यांचं संगीतक्षेत्रातलं योगदान कधीही विसरता येणारं नाही. बप्पीदांनी मोठ्या नायकांसाठी गाणी केली. त्यांच्या संगीताने सजलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तरी त्यातली गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि यातच बप्पीदांचं मोठेपण सामावलं आहे. बप्पीदा प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी उडत्या चालीच्या गाण्यांसोबतच सुमधूर गाणीही दिली. बप्पीदांनी ‘रांबा हो’च्या वेळी पहिल्यांदा सिंथ ड्रम्सचा वापर केला होता. गाणं सुरू होण्याआधी या ड्रम्सचा एक वेगळाच आवाज कानी पडतो. बप्पीदांनी केलेला हा प्रयोग तुफान गाजला. हा अनोखा आवाज प्रत्येकाला आवडला. त्यानंतरच्या काळात प्रत्येक दिग्दर्शकाला, गायकाला आणि नायकाला आपल्या गाण्यांमध्ये हा आवाज असावा, असं मनापासून वाटायचं आणि अशा आवाजाची मागणी केली जायची.
या गाण्याच्या वेळी त्यांनी रिपिट मशीनही वापरलं होतं. म्हणजे प्रत्यक्षात मी ‘रांबा हो’ एवढंच म्हटलं होतं. त्यानंतरचे ‘हो हो हो’ हे शब्द या मशीनमधून बाहेर पडायचे. ‘रिपिट मशीन’ हा प्रकार पहिल्यांदा बप्पीदांनीच हिंदी चित्रपट संगीतात आणला. त्यांच्या या कल्पकतेचं खूप कौतुक झालं. बप्पीदा अशा पद्धतीचे नवनवे प्रयोग करायला कधीही कचरले नाहीत. ‘रांबा हो’ च्या यशानंतर प्रत्येकालाच अशा पद्धतीने गाणं करावंसं वाटू लागलं. रिपिट मशीनचा वापर करावासा वाटू लागला. त्यामुळे बप्पीदा हे चित्रपटसृष्टीतले ‘ट्रेंड सेटर’ होते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बप्पीदा अत्यंत हसतमुख आणि साधे होते. त्यांचं संगीतावर खूप प्रेम होतं. गाणं आतून अनुभवायचं आणि मग गायचं, असं त्यांचं म्हणणं असायचं. गाणं आधी आत्म्यापर्यंत पोहोचू द्यायचं आणि मग सादर करायचं. अशा पद्धतीने समरसून गाणं म्हटलं की, लोकप्रिय होणारच, असं ते म्हणायचे. त्यांचे हे शब्द मनावर अक्षरश: कोरले गेले. बप्पीदा थोर संगीतकार होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. बप्पीदा म्हणजे गुणवत्तेची खाण होते. त्यांना अजून बरंच काही मिळायला हवं होतं. बप्पीदांच्या क्षमतेचा पूर्ण वापर झालाच नाही. त्यांना फक्त डिस्को गाण्यांपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं. बप्पीदा नेहमीच सोन्याने मढलेले असायचे. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता. यावरून काही वेळा त्यांची खिल्लीही उडवली जायची. पण बप्पीदांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. ते मनस्वी आयुष्य जगले. बप्पीदांना रॉकस्टार व्हायचं होतं. आपलं हे स्वप्न त्यांनी पूर्णही केलं. बप्पीदा आयुष्यभर रॉकस्टारप्रमाणे वावरले.
हिंदी चित्रपटसृष्टीने त्यांना पुरतं ओळखलं नाही, याची खंत राहील. एवढी सुरेल गाणी देऊनही हिंदीतल्या संगीतकारांमध्ये बप्पीदांचं स्थान दुय्यमच राहिलं. खरं तर असं व्हायला नको होतं. बप्पीदांसारखा एवढा प्रतिभावान संगीतकार काहीसा उपेक्षितच राहिला, याचं खरंच खूप वाईट वाटतं. बप्पीदांनी गाण्यांची नक्कल केली, असंही म्हटलं गेलं. प्रत्यक्षात नक्कल हा शब्द चुकीचा वाटतो. त्याऐवजी एखाद्या गाण्यातून किंवा संगीतातून प्रेरणा घेऊन रचना साकारली असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरतं. आज अनेक संगीतकारांनी अशा पद्धतीने अन्य रचनांमधून प्रेरणा घेतल्याचं दिसून येतं. ‘हरी ओम हरी’ आणि ‘वन वे तिकिट’ या दोन गाण्यांमध्ये साम्य असलं तरी आज ‘वन वे तिकीट’ विस्मृतीत गेलं आहे आणि ‘हरी ओम हरी’ आजही लोकप्रिय असून श्रोत्यांकडून नेहमीच या गाण्याची मागणी होत असते, हे विसरून चालणार नाही. बप्पीदांची गाणी सदाबहार आहेत आणि हीच त्यांच्या संगीताची जादू आहे. हाच बप्पीदांचा करिश्मा आहे. कोणत्याही संगीताची किंवा गाण्यांची कधीही तुलना होऊ नये, असं मला वाटतं. कारण, शेवटी गाणं हे गाणं असतं. बोनी एम., अब्बा तसंच अन्य आंतरराष्ट्रीय कलाकारांनी संगीत सादर केलं आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं संगीत सादर केलं. आज जगभरात या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. बप्पीदांबाबतही असंच म्हणता येईल. बप्पीदांनी संगीत तयार केलं आणि ते जगभरात पोहोचलं. संगीताच्या माध्यमातून बप्पीदा जगभरातल्या चाहत्यांशी जोडले गेले. त्यांच्या रचना कालातीत आहेत, यात अजिबात शंका नाही.
बप्पीदा होते असं म्हणणं, त्यांचा उल्लेख भूतकाळात करणं क्लेशकारक आहे. बप्पीदांचं जाणं हे संगीतसृष्टीचं नुकसान आहे. ते आपल्यातून खूप लवकर निघून गेले. बप्पीदा या जगात नाहीत, यावर विश्वास ठेवणं खरंच खूप अवघड आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. बप्पीदा शरीराने आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांचं संगीत अमर आहे. गाण्यांच्या माध्यमातून ते आपल्यात राहणार आहेत. त्यांचा आवाज कायम आपल्या कानांमध्ये घुमत राहणार आहे.
—————