Sunday, January 19, 2025
Homeमहत्वाची बातमीखेळ मुख्यमंत्री पदाचा...

खेळ मुख्यमंत्री पदाचा…

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. लोकसभेतील ८० खासदार या एका राज्यातून निवडले जातात. सर्वाधिक म्हणजे ४०३ आमदार असलेली विधानसभा या राज्यात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी असे दिग्गज पंतप्रधान याच राज्याने देशाला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही वाराणसी मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. पंधरा कोटींपेक्षा जास्त मतदार या राज्यात आहेत. विधानसभेच्या ४०३ जागांसाठी निवडणुका होत आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर उत्तर प्रदेशमध्ये पहिली विधानसभा निवडणूक १९५१ साली झाली. तेव्हा सदनात ३४६ जागा होत्या. पंडित गोविंद वल्लभ पंत हे अगोदर मुख्यमंत्री होतेच व तेच पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जागेवर नंतर डॉ. संपूर्णानंद व चंद्रभानू गुप्ता मुख्यमंत्री झाले. १९६३ मध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी यांना मान मिळाला. १९६७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १९९ जागा मिळाल्या. भारतीय जनसंघाने ९८ जागा जिंकल्या. जाट नेता चौधरी चरणसिंग यांनी काँग्रेसमधील अनेक आमदार भारतीय क्रांती दलात आणले व समाजवादी नेता राम मनोहर लोहिया, राजनारायण आणि भारतीय जनसंघाचे नानाजी देशमुख यांचा पाठिंबा घेऊन संयुक्त विधायक दलाचे सरकार स्थापन केले. संयुक्त विधायक दलाचे मुख्यमंत्री म्हणून चरणसिंग यांनी एप्रिल १९६७ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डाव्या विचारसरणीचे सीपीएम आणि उजव्या विचाराच्या भाजपचा पाठिंबा घेऊन सरकार चालवण्यासाठी चरणसिंग यांना बरीच कसरत करावी लागली. १९६८ मध्ये चरणसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपती राजवटीच्या काळानंतर पुन्हा १९६९ मध्ये काँग्रेसचे सरकार आले व चंद्रभानू गुप्ता मुख्यमंत्री झाले.

वर्षभरातच काँग्रेसमध्ये फूट पडली. फेब्रुवारी १९७० मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस (आर)चा पाठिंबा घेऊन पुन्हा चरणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही महिन्यांतच सरकारला अडचणींनी घेरले. चरणसिंग यांनी कमलापती त्रिपाठी गटाच्या चौदा काँग्रेस मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले, पण त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बरखास्तीची शिफारस करायला चरणसिंग राजभवनवर गेले, तेव्हा राज्यपाल बी. गोपाल रेड्डी यांनी त्यांनाच राजीनामा द्यायला सांगितले. राष्ट्रपती राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत त्रिभुवनदास नारायण सिंग यांच्या नेतृत्वाखाली संघटना काँग्रेसला बरोबर घेऊन संयुक्त विधायक दलाचे सरकार स्थापन केले. महिनाभरातच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत ते पराभूत झाले व त्यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर कमलापती त्रिपाठी मुख्यमंत्री झाले. १९७३ मध्ये पोलीस दलात झालेल्या बंडानंतर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यांच्या जागी हेमवती नंदन बहुगुणा मुख्यमंत्री झाले.

आणीबाणीच्या काळात संजय गांधींबरोबर त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. डी. तिवारी मुख्यमंत्री झाले. आणीबाणीनंतर काँग्रेसच्या विरोधात जनता पक्षाच्या झेंड्याखाली डावे-उजवे अनेक पक्ष एकत्र आले. १९७७ ची लोकसभा निवडणूक जनता पक्षाने जिंकली व मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मोरारजींनी देशातील उत्तर प्रदेशमधील एन. डी. तिवारींसह विविध राज्यांतील काँग्रेसची सरकारे बरखास्त केली. जून १९७७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यूपीमध्ये ४२५ पैकी ३५२ जागांवर जनता पक्षाने विजय मिळवला व राम नरेश यादव मुख्यमंत्री झाले. देवरियामधील नारायणपूरमधील पोलीस अत्याचाराच्या घटनेचा डोंब उसळताच यादव यांना फेब्रुवारी १९७९ मध्ये राजीनामा द्यावा लागला व बनारसी दास मुख्यमंत्री झाले.

फेब्रुवारी १९८० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात इंदिरा गांधींचे सरकार पुन्हा आले व त्यांनी यूपीमधील जनता पक्षाचे सरकार बरखास्त केले.

१९८० मध्ये यूपीमध्ये व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आले. बनावट एन्काऊन्टर व हत्या अशा घटनांमुळे त्यांना १९८२ मध्ये राजीनामा देणे भाग पडले. त्यांच्या जागी प्रथम श्रीपती मिश्र व नंतर ऑगस्ट १९८४ मध्ये एन. डी. तिवारी मुख्यमंत्री झाले. तिवारींच्या नेतृत्वाखाली १९८५ची निवडणूक काँग्रेसने जिंकली, पण राजीव गांधींनी मुख्यमंत्रीपदावर वीर बहादूर सिंग यांना बसवले. नंतर पुन्हा १९८८ मध्ये तिवारी मुख्यमंत्री झाले. १९८९च्या निवडणुकीत मुलायम सिंग यादव हे सर्वात शक्तिमान नेता ठरले. जनता दलाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. भाजपचे बाहेरून समर्थन घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. दरम्यान ऑक्टोबर १९९० मध्ये बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांची राम रथयात्रा रोखली व त्यांना अटक केली, त्याचा परिणाम भाजपने केंद्रात चंद्रशेखर व राज्यात मुलायम सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. पण काँग्रेसने समर्थन दिल्यामुळे मुलायम यांचे सरकार बचावले.

मंडल राजकारण रोखण्यासाठी भाजपने लोध समाजाच्या कल्याण सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रकाशात ठेवले. १९९१च्या निवडणुकीत भाजपने ४२५ पैकी २२१ जागा जिंकल्या. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली व कल्याण सिंग बरखास्त झाले. १९९७ मध्ये कल्याण सिंग पुन्हा मुख्यमंत्री झाले, पण पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी मतभेद झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. १९९३ मध्ये भाजपचे समर्थन घेऊन मायावतींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीत सपाचे १०९, तर बसपचे ६७ आमदार निवडून आले होते. मायावती या यूपीच्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री त्या ठरल्या. १९९६च्या निवडणुकीत भाजपचे १७४ आमदार निवडून आले, बहुमताला संख्या कमी पडली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट जारी झाली. एप्रिल १९९७ मध्ये भाजप व बसपमध्ये सहा-सहा महिने मुख्यमंत्री वाटपाचा समझोता झाला व प्रथम मुख्यमंत्रीपद मायावतींनी व नंतर कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्री व्हावे असे ठरले. पण, मायावतींनी आपले सहा महिने पूर्ण होताच सरकारचा पाठिंबा काढून घेतला. भाजपचे समर्थन घेऊन चौधरी नरेंद्र सिंग व नरेश आगरवाल (बसप फुटीर व काँग्रेस) यांचे सरकार आले. फेब्रुवारी १९९८ मध्ये राज्यपाल रोमेश भंडारी यांनी ते बरखास्त केले व काँग्रेसच्या जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. कल्याण सिंग यांनी त्याला आव्हान दिले व उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले.

१९९९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे अपयश आल्याने कल्याण सिंग यांची गच्छंती झाली. ऑक्टोबर २०००मध्ये राजनाथ सिंग मुख्यमंत्री झाले. २००२च्या निवडणुकीत भाजपचे केवळ ८८ आमदार निवडून आले, त्यानंतर राजनाथ सिंग हे दिल्लीला परतले. २००७च्या निवडणुकीत मायावतींना सोशल इंजिनीअरिंगमुळे विधानसभेत बहुमत मिळाले. बसपचे २०६ आमदार निवडून आले. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या. २०१२मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. सपाने २२४ जागा जिंकल्या. वयाच्या ३८व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१७ ला भाजपने ३१२ जागा जिंकल्या व योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून योगी प्रकाशझोतात आहेत. भाजपला यावेळी विजय मिळाला, तर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान योगींना मिळेल.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -