श्रीपाद कोठे
समाज !! रोज हजारो वेळा वापरला जाणारा शब्द. सगळ्यांच्या परिचयाचा शब्द. पण समाज म्हणजे काय? असा प्रश्न आलाच तर बुचकळ्यात टाकणारा शब्द. वास्तविक समाज ही अतिशय सखोल विचार करावा अशी संकल्पना आहे. समाज म्हणजे काय याविषयी विविध मतांतरेही आहेत.
स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनीदेखील याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. भारताची समाज ही संकल्पना अन्य देशातील, विशेषतः पश्चिमी देशातील समाज या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे, हे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले आहे. पश्चिमी देशात मानतात तसे समाज म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन केलेला करार नसतो, तर समाज ही स्वयंभू जिवंत निर्मिती असते; असे त्यांचे प्रतिपादन होते. व्यक्तीप्रमाणेच समाजाला त्याचे स्वतःचे व्यक्तित्व असते, असा त्यांचा सिद्धांत होता.
समाज म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाचा विचार मांडताना दीनदयाळ उपाध्याय म्हणतात, ‘समाज मानवों का समूह है। यह तो सामान्य बात है; किन्तु समाज की सृष्टी कैसे हुई? इसके संबंध में अनेक विचार तत्त्ववेत्ताओने रखे है. पश्चिम का विचार, जिस के आधार पर वहां राजनीतिक व सामाजिक जीवन की सृष्टी हुई है, यह है की – समाज व्यक्तियों का ऐसा समूह है जो व्यक्तीओंने स्वयम् मिलकर बनाया है. अर्थात व्यक्तियों के समझौते के आधार पर बना है. इसको ‘सामाजिक समझौता सिद्धांत’ नाम से जाना जाता है.
समाज म्हणजे एखादा क्लब किंवा पंजिकृत सोसायटी नाही. व्यक्तिप्रमाणेच समाजही स्वयंभू असून; समाजाचेही शरीर, मन, बुद्धी, आत्मा असतात; असे स्व. उपाध्याय यांचे प्रतिपादन आहे. सामूहिक मन, सामूहिक बुद्धी पाश्चात्य मनोवैज्ञानिकांनाही मान्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अनेक व्यक्तींनी मिळून समाज तयार केलेला नाही आणि व्यक्ती म्हणजे समाजरूपी यंत्राचा एखादा छोटासा सुटा भाग नाही. दोन्हीही स्वतंत्रपणे पूर्ण आहेत आणि दोन्ही एकाच एककाचे भाग आहेत. व्यक्तिशिवाय समाज अशक्य आणि समाजाशिवाय व्यक्ती अशक्य. व्यक्ती समाजावर अवलंबून आणि समाज व्यक्तीवर अवलंबून. व्यक्तिशिवाय समाज अपूर्ण आणि समाजाशिवाय व्यक्ती अपूर्ण. म्हणूनच व्यक्तीनेही आणि समाजानेही हे अवलंबन आणि अपूर्णत्व अधिकाधिक समजून घेतले पाहिजे. हे अवलंबन आणि अपूर्णत्व व्यक्ती जेवढे अधिक समजून घेईल तेवढं त्याचं जगणं समाजानुकूल होईल. हे अवलंबन आणि अपूर्णत्व समाज जेवढं अधिक समजून घेईल तेवढ्या समाजाच्या व्यवस्था, भूमिका आणि समाजाची वृत्ती व्यक्तीला अनुकूल होईल. व्यक्ती आणि समाजाच्या अस्तित्वाचं हे ऐक्य जोवर हृदयंगम होत नाही, तोवर व्यक्ती आणि समाज दोघेही स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याचा, परस्परांवर कुरघोडी करण्याचा, आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचा प्रयत्न करतील. यातून सुख, शांती, स्थैर्य आणि समाधान प्राप्त होणे अशक्य होईल.
स्व. उपाध्याय यांनी हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. व्यक्ती आणि समाज या एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे व्यक्ती आणि समाज अविभाज्य आहेत. त्यांना वेगळे करता येत नाही, असे प्रतिपादन करून स्व. उपाध्याय म्हणतात, ‘जब कोई यह प्रश्न करता है कि, व्यक्ती बडा या समाज बडा, तो हिसाब लगाना कठीन हो जाता है. समाज भी बडा है और व्यक्ती भी बडा है. अथवा कहीये की जितना बडा व्यक्ती है उतना बडा समाज और जितना बडा समाज है उतना बडा व्यक्ती. दोनो अभिन्न है.
हाच दृष्टिकोन अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘हम व्यक्ती और समाज को अभिन्न मानते है. व्यक्ती समाज के विरोध में कार्य करे, समाज के हित की चिंता न करे, व्यक्ती पडोसी से सदैव बैर का अनुभव करे, प्रत्येक व्यक्ती अपना सुख दुसरे के साथ प्रतिद्वंद्विता मे ही माने तो क्या काम चलेगा?
व्यक्ती आणि समाज यांचा सुटा-सुटा विचार केल्यानेच जगण्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये संघर्षाचा आणि या संघर्षात टिकून राहण्यासाठी स्पर्धेचा सिद्धांत भारतेतर विचारांनी गृहीत धरला आणि आग्रहाने मांडला.
स्व. उपाध्याय याबद्दल म्हणतात, विविधता में एकता अथवा एकता का विविध रूपों में व्यक्त होना ही भारतीय संस्कृती का केंद्रस्थ विचार है. यदी इस तथ्य को हमने हृदयंगम कर लिया तो फिर विभिन्न सत्ताओं के बीच संघर्ष नहीं रहेगा. यदी संघर्ष है तो वह प्रकृती का अथवा संस्कृती का द्योतक नहीं, विकृती का द्योतक है.
आज काय स्थिती आहे? स्वार्थ, स्पर्धा, अविश्वास यांचेच साम्राज्य पाहायला मिळते. व्यक्तीच्या संबंधात आणि समाजाच्या संबंधातही या तिन्ही बाबी लागू होतात. स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास हेच माणसाच्या जगण्याचे आधार झाले आहेत. या आधारांना लोकमान्यता, राजमान्यता आणि न्यायमान्यता मिळालेली आहे. कोणालाही यात वावगे काही वाटत नाही. उलट दिवसाचे चोवीसही तास स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास यांचेच अवधान ठेवत जगायला हवे; तसे जगणे हेच खरे कौशल्यपूर्वक जगणे; हीच जीवनाची खरी समज; असाच आज व्यवहाराचा, विचारांचा आणि भावनांचा प्रवाह झाला आहे. हीच जीवनाची दिशा झाली आहे.
लोकांमध्ये व्यक्तिवाद वाढलेला आहे. शिक्षण, करिअर, सुखसाधने, गरजा, इच्छा-आकांक्षा या साऱ्यात व्यक्तीच्या मनात उठणारे तरंग यांना अपार महत्त्व आलेले आहे. शिवाय मच पाहिजे वा मिळालीच पाहिजे; मनातील इच्छा पूर्ण करणे म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता; अशी भावना दृढमूल झालेली आहे. स्वतःची क्षमता, गरजा, परिस्थिती, जबाबदारी, भान या गोष्टींचा सारासार विचार करणे आजच्या मानवाला मान्य नाही. दुसरीकडे आई-वडिलांपासून तर शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहपाठी आणि सहकारी, असे सारेच इच्छापूर्तीच्या या प्रवाहाला कळत नकळत वेग आणि शक्ती पुरवत असतात. अन् समाज या प्रवाहाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अधिकाधिक बंधने, अधिकाधिक नियम, अधिकाधिक कायदे, अन् या साऱ्यांची अधिकाधिक कडक अंमलबजावणी; हाच सामाजिक, सरकारी आणि प्रशासकीय सूर दिसून येतो. व्यक्तिवाद आणि परिणामी व्यक्तिस्वातंत्र्य याला स्वीकृत सिद्धांत म्हणून सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे; परंतु त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, अव्यवस्था, अराजक आणि संघर्ष मान्यही करता येत नाही, स्वीकारताही येत नाही. मग त्यासाठी व्यवस्थेचा दंडुका उग्रपणे उगारण्याला पर्याय राहत नाही.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा याबाबत दृष्टिकोन काय होता? ते म्हणतात, ‘जो व्यक्तिवाद का अवलंबन करते है वे अध:पतन को प्राप्त होते है; परंतु जो समष्टीवाद में रहते है वे उससे भी अधिक नीचे गिरते है.
व्यक्तिवाद आणि समष्टीवाद यांच्या मर्यादा, त्यांचे दुष्परिणाम आणि अपुरेपण मान्य करून, समजून घेऊन; त्यांचा समन्वय हवा या निष्कर्षावर आल्यावर स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की, हा समन्वय होईल कसा? अशा समन्वयासाठी सर्वसाधारण आधार कोणता? समन्वय करताना कोणाची मर्यादा कोणती हे कसे ठरवायचे? कोणी माघार घ्यायची, कोणी पुढाकार घ्यायचा, कोणाला स्वातंत्र्य द्यायचं, कोणी बंधन स्वीकारायचं, त्या त्या वेळेचा आणि परिस्थितीचा विचार कसा करायचा? या सगळ्या प्रश्नांवर स्व. उपाध्याय यांचे उत्तर आहे – ‘धर्म’. धर्म हीच निर्णयात्मक बाब असायला हवी, असे त्यांचे मत होते.
अर्थात स्वतःसोबत अन्य व्यक्तींचा आणि घटकांचा विचार ही पहिली पायरी म्हणावी लागेल. जीवन ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की, सहज एखाद्या सुभाषितवजा वाक्यातून सगळं काही सांगणं शक्य नसतं. त्यातील आशय लक्षात घेऊन त्या त्या वेळी, त्या त्या प्रसंगी मार्ग काढावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात, व्यवहार करावा लागतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची सर्वसाधारण समज परिपक्व असावी लागते, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सद्भाव असावा लागतो, मोठ्या प्रमाणावर नि:स्वार्थता आणि स्वार्थाचे नियमन लागते, मोठ्या प्रमाणावर संयमाची वृत्ती लागते, मोठ्या प्रमाणात विश्वास लागतो; माणसाच्या सद्गुणांना-सद्भावांना-सद्विचारांना उचलून धरणारे, पोषण देणारे वातावरण लागते. हे सारे जादूची कांडी फिरवून होत नाही. ऐहिक मूल्यांचा आधार असणारी माणसे चांगली आणि कळकळीची असली तरीही जीवनाचे योग्य मापदंड आणि मानदंड स्थापित करू शकत नाहीत. जीवनाचा आधार ऐहिक असेल तर पैसा, नावलौकिक, पदप्रतिष्ठा, लोकप्रियता, साधने, यश, सत्ता, वर्चस्व; यातूनच जीवनाची सफलता मोजली आणि जोखली जाणे अपरिहार्य ठरते. या ऐहिक गोष्टी कधीच कोणालाही व्यक्तीश: किंवा समूहश: पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. या सगळ्या ऐहिक मापदंडांच्या मर्यादा आणि त्या मर्यादांपाशी थांबण्याची प्रेरणा आणि समज आध्यात्मिक मूल्यव्यवस्थाच देऊ शकते. ही आध्यात्मिक मूल्यव्यवस्था प्रस्थापित करणे, ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या सामाजिक चिंतनाची पूर्वअट म्हणता येईल.