अहमदाबाद (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या माध्यमातून फॉर्मात असलेल्या भारताला प्रतिस्पर्ध्यांवर निर्भेळ यश मिळवण्याची संधी आहे.
एकतर्फी मालिकेत भारताने पहिली वनडे ६ विकेट आणि तब्बल २२ षटके राखून जिंकली. त्यानंतर बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ४४ धावांनी मात करताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. गोलंदाजांनी गाजवलेल्या सीरिजमध्ये वेगवान गोलंदाज एम. प्रसिध कृष्णासह लेगस्पिनर युझवेंद्र चहल, ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रभावी मारा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. या त्रिकुटाच्या तुलनेत मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या मध्यमगती जोडगोळीला प्रभाव पाडता आला नाही.
भारताच्या फलंदाजांपैकी कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव यांनाच अर्धशतकी मजल मारता आली नाही. उपकर्णधार लोकेश राहुल हा दुसऱ्या लढतीत संघात परतला. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले तरी छाप पाडली. मात्र, माजी कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतने निराशा केली आहे. नवोदित दीपक हुडाही प्रभाव पाडू शकलेला नाही. ईशान किशनला पहिल्याच लढतीत संधी मिळाली. डावखुरा सलामीवीर शिखर धवन हा तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अंतिम लढतीसाठी फायनल संघ निवडण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान असेल.
अपयशी सलामीनंतर वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या सामन्यात मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दुखापतीमुळे नियोजित कर्णधार कीरॉन पोलार्ड खेळू शकला नाही. पाहुण्या संघाला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. दोन सामन्यांनंतर अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरलाच केवळ अर्धशतकी मजल मारता आली आहे. शाई होप, ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो तसेच पोलार्ड आणि निकोलस पुरन या आघाडी फळीतील बॅटर्सना अपेक्षित खेळ करता आलेला नाही. गोलंदाजीतही केवळ अल्झरी जोसेफने थोडा फार प्रभाव पाडला आहे. अन्य बॉलर्सनी निराशा केली.
०-२ अशा पिछाडीमुळे मालिका गमावली तरी भारताला सलग तिसऱ्या विजयापासून रोखण्याचे आव्हान पाहुण्यांसमोर आहे. वनडेनंतर टी-ट्वेन्टी मालिका खेळायची असल्याने भारताच्या झटपट दौऱ्यात पुनरागमन करण्याची वेस्ट इंडिजला शेवटची संधी आहे.
वेळ : दु. १.३० वा.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अवेश खान
वेस्ट इंडिज : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अॅलन, एन. बॉनर, डॅरेन ब्राव्हो, शेमराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, कीमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ऑडियन स्मिथ, हेडन वॉल्श (ज्युनियर).