नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआय सज्ज आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे १० फ्रँचायझी मालक उपलब्ध ५९० क्रिकेटपटूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल आयोजकांनी ऑक्शनच्या वेळेत बदल केला असून आता सकाळी ११ वाजता बोली सुरू होईल.
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि अहमदाबाद हे दहा फ्रँचायझींचा समावेश आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून लिलाव प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती द्यायला हवी आणि सर्व सदस्यांनी माक्स घालणे अनिवार्य आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये राइट टू मॅच (आरटीएम) हा पर्याय नसणार आहे. मुदत संपल्यानंतर कोणताही संघ त्यांच्या जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या मोठ्या संघाना बसला आहे.
५९० खेळाडूंवर बोली लागणार
लिलावासाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, वनिंदू हसरंगा, आदी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. भारताच्या श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश ऱैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, आदी खेळाडूंसाठी चढाओढ आहे. प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटी बजेट दिले गेले आहेत आणि त्यापैकी ८० कोटी हे खेळाडूंवर खर्च करायला हवेत.
अर्जुन तेंडुलकर पात्र, परंतु, युवा वर्ल्डकप जिंकून देणार ८ खेळाडू अपात्र
विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन हा लिलावासाठी पात्र ठरला आहे. मात्र, वेस्ट इंडिजमध्ये झालेला युवा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघातील आठ खेळाडू अपात्र ठरले आहेत. या खेळाडूंमध्ये जेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शेख राशीद, दिनेश बाना, रवी कुमार यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या पात्रता निकषानुसार, हे क्रिकेटपटू लिलावासाठी पात्र नाहीत. बीसीसीआयच्या नियमानुसार अनकॅप ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू) खेळाडूला ऑक्शनसाठी पात्र होण्यासाठी दोन नियमांची पुर्तता करणे गरजेचे आहे.यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला. अंतिम सामन्यात राज बावा विजयाचा शिल्पकार ठरला. शेख राशीद, यश धुल, रवी कुमार यांनीही ही स्पर्धा गाजवली.