मुंबई : राज्यभरातून संतापलेल्या जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त डिसले गुरुजींना परदेशवारीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.
अमेरिकेत पीएचडी मिळविण्यासाठी गुरूवारी डिसले गुरूजी जिल्हा परिषदेत आले होते. रजेसाठी अर्ज समोर ठेवल्यानंतर शिक्षणाधिकारी लोहार यांनी त्यांना शाळेसाठी काय केले, असा सवाल केला. पीएचडीसाठी विहित नमुन्यात मुख्याध्यापकांकडे अर्ज सादर करा, असे सांगून परत पाठविले होते. त्यानंतर, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींना परदेशवारीसाठी सोलापूरच्या सीईओंना निर्देश दिले आहेत.
डिसले गुरुजींना परदेशवारीसाठी शिक्षणाधिका-यांनी नकार दिल्याने सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा झाला. काही जणांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला तर काही जणांनी यामागे नेमके कारण आहे तरी काय असे प्रश्न उपस्थित केले होते. आता, याप्रकरणी स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातले आहे. तसेच, वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन डिसले गुरुजींच्या विदेशवारी शिष्यवृत्तीसाठीच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.