बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा
वॉशिंग्टन : संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारीचा समूळ नायनाट होत नसल्याने जगाची चिंता वाढली आहे. त्यात आता कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोकेदुखी वाढवत आहेत. आतापर्यंत ३५ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढतच आहे. त्यात आता उद्योगपती बिल गेट्स यांनी भविष्यातही कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते, असा धोका जगाला सांगितला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.
भविष्यात कोरोनापेक्षा भीषण महामारी येऊ शकते, असा धोक्याचा इशारा गेट्स यांनी दिला. बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशनने कोएलिशन फॉर एपेडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशनला (सीईपीआय) १५० मिलियन डॉलरची रक्कम दान केली. यावेळी त्यांनी भविष्यातील रोगांबद्दल चिंता व्यक्त केली. जग वेगाने विकसित होत असलेल्या विषाणूंशी मुकाबला करत असल्याचे गेट्स म्हणाले.
संशोधन आणि विकास यांच्यावर केली जाणारी गुंतवणूक आपले आयुष्य वाचवू शकते हे आपण गेल्या २० वर्षांत पाहिले आहे. यामुळे आपण सर्वात कठीण काळ टाळू शकतो. भविष्यात येणारी रोगराई, महामारी पाहता सरकारांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे. काही संभाव्य महामारीत मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा अधिक असू शकते, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.