प्रा. अशोक ढगे
प्रगतीच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभ्या असणाऱ्या आपल्या देशाला त्याची खरी ओळख देण्यात अनेकांनी आपले प्राण वेचले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यातलं एक अग्रणी नाव. २३ जानेवारी रोजी देशभर नेताजींची १२५वी जयंती साजरी होत असताना त्यांचं स्मरण, प्रत्येकाच्या मनात त्यांच्या विचारांची नव्यानं रुजवात करून देणारं ठरेल यात शंका नाही. हिंदुस्थानवर ब्रिटिशांचं साम्राज्य आल्यावर त्यांची शस्त्रं, शिस्त, आधुनिक शोध, रेल्वे, पोस्ट यांमुळे इथल्या अडाणी प्रजेप्रमाणे सुशिक्षितही दिपून गेले होते. इंग्रजांच्या आधुनिकतेपुढे त्यांना भारत मागासलेला, बुरसटलेल्या विचारांचा वाटू लागला. काही सुशिक्षित व्यक्तींना मात्र आधी स्वातंत्र्य मिळवणं जरुरीचं आहे, असं वाटत होतं. या सर्व मंडळीचं ध्येय मात्र एकच होतं, ते म्हणजे ‘स्वराज्य’ प्राप्त करणं. त्यांचे मार्ग भिन्न असल्यानं मतभेदांचं चित्र दिसत होतं. महात्मा गांधींनी शांततेचा मार्ग पत्करला. लोकांमध्ये जागृती निर्माण करून, अहिंसेच्या मार्गानं स्वराज्य प्राप्त करण्यासाठी असहकाराची चळवळ, सत्याग्रह इत्यादी मार्ग त्यांनी अवलंबले. क्रांतिकारकांना मात्र सशस्त्र क्रांती केल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं वाटत होतं. त्या दृष्टीनं ते प्रयत्नशील होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं आहे की, युद्धाशिवाय स्वातंत्र्य मिळालं, असं झालं नाही. स्वातंत्र्य फुकट मिळत नाही. त्यासाठी शस्त्रांचा वापर केला पाहिजे, असा क्रांतिकारकांचा विचार होता. नेताजी सुभाषचंद्र बोस हेही या प्रकारच्या क्रांतिकारक विचाराचेच नेते होते. त्या दृष्टीनं त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतिकारी मनोवृत्तीचे होते. त्यांनी भारताच्या अंतिम स्वातंत्र्यसंग्रामात सरसेनापतीचं पद स्वीकारलं. अशा या थोर देशभक्त सेनानीचा जन्म ओडिसा प्रांतातल्या कटक या गावी झाला. बालवयापासूनच सुभाषबाबूंना ईश्वरी साक्षात्कार, अध्यात्म आणि योग या शास्त्रांची ओढ होती. त्यामुळे कॉलेजमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय अभ्यासायला सुरुवात केली. तथापि, तेवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही, म्हणून ते गुरूंच्या शोधार्थ काही दिवस हिमालयातही जाऊन आले. पण त्यामुळेही त्यांच्या मनाला समाधान, शांती मिळाली नाही. मग ते कलकत्त्याला परतले. हिमालयातल्या प्रवासात ते विषमज्वरानं आजारी पडले. त्यातून बाहेर पडल्यावर त्यांनी व्यायाम आणि लष्करी शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. त्याच काळात त्यांनी बी.ए.च्या अभ्यासाला सुरुवात केली आणि वक्तृत्व कलाही अवगत केली.
१९१९मध्ये बीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते वडिलांच्या आग्रहावरून आयसीएस होण्यासाठी इंग्लंडला गेले. आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी करावी, अशी वडिलांची इच्छा होती. तथापि त्यांचं न ऐकता सुभाषबाबूंनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. या कामी थोरले बंधू शरदबाबू यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राजकीय लढ्याची सूत्रं महात्मा गांधींकडे आली. १९२१मध्ये सुभाषबाबू मुंबईत आले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी महात्मा गांधींची भेट घेतली. संधी मिळताच सशस्त्र संग्राम करून स्वातंत्र्य हस्तगत केलं पाहिजे, अशा विचाराचे असूनही प्राप्त परिस्थितीत गांधीप्रणीत चळवळीशी विरोध न पत्करता त्यात सामील व्हायचं आणि आपल्या विचाराला अनुकूल वातावरण निर्माण करायचं, असं ठरवून सुभाषबाबू कलकत्त्याला परत आले. तिथे त्यांनी देशबंधू चित्तरंजनदास यांच्याशी चर्चा केली. पुढे देशबंधूंच्या आज्ञेवरून कलकत्त्याला राष्ट्रीय महाविद्यालयाचं प्राचार्यप्रद स्वीकारलं. त्याच काळात ते काँग्रेस सेवा दलाचं काम पाहू लागले. दरम्यान, बंगालमध्ये मोठा पूर आला. सुभाषबाबूंनी पूरग्रस्तांसाठी तळमळीनं मदतकार्य केलं. कार्यकुशलता पाहून त्यांना बंगाल काँग्रेसचे प्रांतिक प्रचारक म्हणून नेमण्यात आलं.
१९२४मध्ये बंगाल प्रांतात क्रांतिकारकांच्या आंदोलनानं जोर धरला. त्यांच्याशी संबंध असावेत, या संशयानं सुभाषबाबूंना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं गेलं. मात्र त्यांना हा एकांतवास फायदेशीर ठरला. त्या काळात त्यांनी इतिहास, वाङ्मय, धर्मशास्त्र आदींवरील ग्रंथांचं अध्ययन केलं. त्यामुळे त्यांच्या मनाला स्थिरता आणि शांती प्राप्त होऊन बौद्धिक प्रगल्भता आली. मंडालेहून परतल्यावर त्यांची प्रांतिक राजकारणाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. १९३०च्या प्रारंभापासून देशात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. त्यातही सुभाषबाबूंना अटक करण्यात आली. पुढे सरकारविरोधी निदर्शनं केल्यानं त्यांना पुन्हा तुरुंगवास पत्करावा लागला. तिथे प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी देशात न ठेवता त्यांना युरोपमध्ये पाठवलं गेलं.
सुभाषबाबूंना सरकारी बंधनातून फायदाच झाला. त्यांना युरोपमधल्या विविध राष्ट्रांना भेट देण्याची संधी मिळाली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याची भूमिका काय आहे, हे तिथल्या राज्यकर्त्यांना सांगण्याची संधी प्राप्त झाली. १९३८मध्ये हरिपुरा इथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि अध्यक्षपदी सुभाषबाबूंची नेमणूक झाली, तथापि आजारी पडल्यानं ते अधिवेशनाचं काम करू शकले नाहीत. शिवाय, महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांना सुभाषबाबूंची विचारसरणी पसंत नसल्यानं अध्यक्षपदी राहून काँग्रेसमध्ये फूट पाडण्यापेक्षा सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर त्यांनी काँग्रेसबाहेरील अखिल भारतीय कीर्तीच्या नेत्यांना भेटून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्याचं ठरवलं. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरही होते. त्यांनी सुभाषबाबूंची तळमळ बघितली आणि त्यांना जपानहून आलेलं रासबिहारी बसूंचं पत्र दाखवलं. त्यात जपान वर्षअखेरीस युद्ध पुकारेल, असं लिहिलं होतं.
स्वा. सावरकरांनी सुभाषबाबूंना सांगितलं की, तुम्ही रासबिहारी बाबूंप्रमाणे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन हिंदुस्थानबाहेर पडा आणि जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्त्रावधी भारतीय सैन्याचं नेतृत्व करून, हिंदुस्थानमधल्या ब्रिटिश सत्तेवर बाहेरून प्रहार करा. सावरकरांच्या या उपदेशानं सुभाषबाबूंच्या विचारांना योग्य दिशा मिळाली आणि पुढील कारवाईसाठी ते कलकत्त्याला परतले.
कलकत्त्यात आल्यावर ठपका ठेवून तुरुगांत डांबलं असता सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण केलं. मुक्त केल्यावर अध्यात्म साधनेच्या निमित्तानं एकांतवास पत्करून त्यांनी भारतातून काबूलमार्गे पलायन केलं. युरोपमध्ये जर्मनी, इटली इथे जाऊन त्यांनी हिटलर, मुसोलिनी यांची भेट घेतली. मातृभूमीच्या मुक्ततेसाठी मदत मागितली. प्रत्यक्ष मदत मिळाली नाही, पण त्यांच्या ताब्यातल्या भारतीय सैनिकांशी गाठभेट झाली. त्यांनी हिटलर, मुसोलिनी यांच्या संमतीनं सैन्याची छावणी उभारली. याच काळात जपानने ब्रिटिश आणि अमेरिकन नौदलावर हल्ले सुरू केले, तेव्हा त्यांनी जपानशी मैत्री केली आणि युरोपमध्ये स्वतंत्र नभोवाणी केंद्र उभारलं. सुभाषबाबूंनी ८ ऑगस्ट १९४३ रोजी लष्करी पद्धतीनुसार आझाद हिंद सेनेचं ‘सरसेनापतीपद’ स्वीकारलं.
२१ ऑक्टोबर रोजी सिंगापूरला ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना झाली. या नव्या सरकारच्या स्वतंत्र नोटा टोकियोतल्या टांकसाळीत छापल्या गेल्या. २३ ऑक्टोबर १९४३च्या मध्यरात्री आझाद हिंद सरकारने ब्रिटिश आणि अमेरिकेविरुद्ध युद्धाचं रणशिंग फुंकलं. मोहिमेच्या पहिल्या फेरीत खूप यश मिळालं. १९ मार्च १९४४ रोजी जपानी सेना आणि आझाद हिंद सेनेची पथकं हिंदुस्थानच्या सीमेत येऊन ठाकली. पुढे लवकरच जपानी सेनेची विलक्षण पिछेहाट होऊन त्यांनी शरणागती पत्करली. त्यामुळे आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मनोरथही धुळीस मिळाले. पुढे टोकियोला येताना विमान अपघातात सुभाषबाबूंचं निधन झालं. सुभाषबाबूंच्या निधनानं एक श्रेष्ठ श्रेणीचा देशभक्त आणि धाडसी स्वातंत्र्यवीर अस्त पावला.