पार्ल (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना शुक्रवारी (२१ जानेवारी) खेळवला जाणार आहे. अपयशी सलामीनंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाहुण्यांना विजय आवश्यक आहे.
हंगामी कर्णधार लोकेश राहुल लवकर बाद झाला तरी डावखुरा सलामीवीर शिखर धवनचे दमदार पुनरागमन आणि माजी कर्णधार विराट कोहलीला सूर गवसल्याने भारताचा संघ यजमानांना चुरशीची लढत देईल, असे वाटले. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
२०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा विचार करता भारताला या मालिकेकडे संघबांधणी करण्याची संधी आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दोन बदल पाहायला मिळतील. मालिका सुरू होण्याआधी लोकेश राहुलने सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश सलामीला खेळत असला तरी आगामी वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवल्यास रोहित व शिखर धवन याच जोडीला सलामीसाठी पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या लढतीत ऋतुराज गायकवाडला सलामीला संधी देऊन लोकेश पुन्हा मधल्या फळीत खेळू शकतो.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असल्याने श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी आहे आणि त्याला स्पर्धक म्हणून सूर्यकुमार यादव आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी या दोन खेळाडूंमध्ये चुरस आहे. पहिल्या वनडेत श्रेयसने निराशा केली. त्यामुळे लोकेश हा पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू वेंकटेश अय्यरचे पदार्पण सनसनाटी ठरले नाही. त्याला गोलंदाजी दिली नाही. फलंदाजीत करताना तो केवळ २ धावा जमवू शकला. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने नाबाद अर्धशतक झळकावून अष्टपैलू म्हणून स्वतःची जागा पक्की केली आहे. अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने चांगली गोलंदाजी केली. लेगस्पिनर युझवेंद्र चहलनेही त्याला चांगली साथ दिली. पण, विकेट घेण्यात ते अपयशी ठरले. तरीही दुसऱ्या वनडेत दोघंही कायम असतील. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा कायम राहू शकतो. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेतील सातत्य राखले. त्यांचा दौऱ्यातील हा सलग दुसरा विजय आहे. आश्वासक सुरुवातीमुळे त्यांना वनडे मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे. मात्र, माजी जगज्जेता भारताला त्यांना गृहीत धरून चालणार नाही. पहिल्या सामन्यात कर्णधार टेम्बा बवुमा आणि रॉसी वॅन डर ड्युसेनने शतके ठोकताना फलंदाजीची धुरा सांभाळली. मात्र, अनुभवी क्विंटन डी कॉक तसेच आयडन मर्करमचे अपयश त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. यजमान गोलंदाजांनीही चांगला मारा करताना भारताच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यांच्यासमोरही सातत्य राखण्याचे आव्हान आहे.
भारताचा संघ : लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बवुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, जुबेन हम्झा, मार्को जेन्सन, जानीमन मलान, सिसांदा मॅगाला, आयडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुन्गी एन्गिडी, वेन पार्नेल, अँडिले फेहलुवाक्वायो, ड्वायेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॉसी वॅन डर ड्युसेन, काइल व्हेरिनी.