तरुण गुन्हेगारीकडे का वळताहेत?

Share

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

समाजातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता, यामध्ये युवकांची संख्या जास्त असल्याचे दिसते. घरफोड्या, सोनसाखळी चोरणे, सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, दुचाकी, चारचाकी वाहनांची चोरी, तोडफोड, जाळपोळ करणे, सायबर गुन्हे, एटीएम, ई-मेल, फसवे फोन कॉल, फसवे मेसेज, ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री याद्वारे केली जाणारी सर्वसामान्य जनतेची आर्थिक फसवणूक, खंडणी मागणे, सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरपणा करून शांतता भंग करणे, मुलींची छेडछाड, बलात्कार, अॅसिड हल्ले या सर्व गुन्ह्यांमध्ये तरुण पिढी पुढे असल्याचे दिसते. कुठल्याही किरकोळ कारणावरून वाद-विवाद, भांडण उकरून काढून एकमेकांवर प्राणघातक हल्ले करणे, जो भांडण सोडवायचा प्रयत्न करेल त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गटबाजी करणे, टोळ्या बनवणे, गुन्हेगारी कारवाया करण्याचे आपले परिसर ठरवून घेणे आणि जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना दमबाजी करणे, त्यांचे मोबाईल, पाकीट, घड्याळ हिसकावून पलायन करणे अशा घटनांमध्येही युवकांची संख्या लक्षणीय आहे.

छोट्या-छोट्या गल्लीबोळांमध्ये स्वतःचे विविध चित्रविचित्र अवतारातले फोटो बॅनर, होर्डिंग आणि पोस्टरवर लावण्यात पण युवा पिढी सक्रिय आहे. कोणत्याही ऐतिहासिक, थोर, महान, विद्वान, युगपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, श्रद्धांजलीच्या बॅनरमध्ये त्यांच्या फोटोसोबत आपला फोटो लावायला, आपण एक टक्का तरी त्यांच्या तुलनेत पात्र आहोत का, याचा सारासार विचार कोणीही करत नाही. या पोस्टरबाजीला राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याकारणाने, भाई, अण्णा, अप्पा, तात्या, काळीज, वाघ, सिंह, भाऊ, वादळ, जाण, शान असे सर्व त्यांना फुकटचे कार्यकर्ते म्हणून वापरायला मिळतात. त्याचा एक फोटो बॅनरवर टाकून त्याला कायमस्वरूपी आपला हक्काचा कार्यकर्ता बनवून घेणे हेच राजकीय मंडळींचे उद्दिष्ट असते. पण या पोरांना हे सांगणार कोण?

ज्या वयात शैक्षणिक, वैचारिक, व्यावसायिक, सामाजिक कर्तृत्व दाखवून. आपली तसेच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित असते, त्या वयात अतिशय तरणीताठी मुलं आपले आयुष्य स्वतःच्या हाताने बरबाद करून घेताना दिसतात. मुळात आई-वडिलांची हालाखीची परिस्थिती, घरातून लहानपणापासून मिळू न शकलेले चांगले संस्कार अथवा कुटुंबात लहानपणापासून पाहात आलेले व्यसनाधीन व्यक्ती, नातेसंबंधातील ताणतणाव, नात्यांमधील हिंसाचार यामुळे या मुलांची नजर मेलेली असते. ही मुले ज्या परिसरात अथवा ज्या घरात जन्माला येतात तिथे आयुष्याबाबत कोणीही सकारात्मक, चांगले, योग्य मार्गदर्शन करणारे त्यांना भेटलेले नसते. आर्थिक परिस्थिती सातत्याने दुर्बल असल्यामुळे लहानपणापासून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी होत असलेल्या हाल अपेष्टा सोसून त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय वेदनादायी झालेला असतो. त्यामुळे आता मिळेल तसा, मिळेल तिथून पैसा मिळवणे, आपल्या गरजा भागवणे हेच ध्येय अशा तरुणांसमोर असते.

दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी, उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी लागणार अमाप पैसा, तेवढी बुद्धिमत्ता याचा कायमस्वरूपी आभाव, उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी जाणवणारा भांडवलाची कमतरता, आई-वडील दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी सतत घराबाहेर मोलमजुरी करण्यात व्यस्त या सर्व पार्श्वभूमीवर मिळालेले त्याच स्वरूपाचे, त्याच परिस्थितीमधील समदुःखी मित्र आणि संगत यातून रोज रडतखडत दारिद्र्यात जगण्यापेक्षा एकदाच काय ते मोठं कांड करून पैसा कसा मिळेल, या शोधात ही मंडळी असतात.

कायदा सुव्यवस्था बाबतीत अतिशय अनादर आणि अज्ञान, कोणाचीही भीती नसणे, कसलीही तमा न बाळगणे, बेरडपणा अंगीकारणे यातून स्वतःबद्दल वाढलेला फाजील आत्मविश्वास या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करीत आहे. ही सर्व परिस्थिती आणि त्यामागील कारणे सर्वांनाच परिचित आहेत. परंतु या सर्व बिघडलेल्या मानसिकतेमधील युवा पिढीला यातून बाहेर कस काढायचं, पुढील युवा पिढी अशीच सैरभैर होणार नाही यासाठी काय उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे यावर आपण पुढील लेखात विचारमंथन करणार आहोत. समाजाला, सर्वसामान्य माणसाला अशा युवा पिढीमुळे वाढलेला त्रास कसा कमी करता येईल, यावर देखील एक दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे.

जन्मजात कोणीच गुन्हेगार नसतो, पण त्याच्या भोवतालचे वातावरण आणि त्याला लहानपणापासून आजूबाजूला दिसलेल्या चांगल्या-वाईट घटना, संस्कार, संगत यातून तो घडतो किंवा बिघडतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा गुन्हेगारी वृत्तीचा बालवर्ग अथवा तरुणवर्ग लहानाचा मोठा होतोय, त्या त्या ठिकाणी समुपदेशनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवणे आवश्यक आहे. गुन्हेगारांचा अड्डा बनलेला परिसर, तेथील रहिवाशी परिसर, त्या त्या ठिकाणच्या शाळा, कॉलेज, क्लास त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांना देखील सावध करणे, त्यांच्यात प्रबोधन आणि जागृती करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडण्याआधीच त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न करुन पाहायला नक्कीच हरकत नाही. छोट्या, मोठ्या, किरकोळ गुन्ह्यातून कायदेशीर प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर सुटल्यावर हे युवक जास्तच निर्ढावलेले दिसतात. पोलीस प्रशासन, कायदा, झालेली शिक्षा भोगणे अथवा या संदर्भात झालेल्या कोणत्याही कारवाईबद्दल त्यांना काहीच वाटेनासे होते. स्वतः त्याचा अनुभव घेतल्याने कायदा, त्यातील पळवाटा, जास्तीतजास्त काय होऊ शकत आणि कशाप्रकारे आपण सहजासहजी यातून मार्ग काढू शकतो, याच वरवरचं पोकळ ज्ञान घेऊन या मुलांची हिम्मत अधिक वाढते. त्यामुळे अशा युवकांना प्रबोधन करणे देखील अत्यावश्यक आहे.

meenonline@gmail.com

Recent Posts

Prakash Bhende : कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…

7 minutes ago

‘पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार’

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…

27 minutes ago

पॉवरफुल कलाकारांची लवकरच ‘आतली बातमी फुटणार’

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…

35 minutes ago

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…

51 minutes ago

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारा पाकिस्तानच्या लष्करात होता SSG कमांडो

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…

58 minutes ago

Blouse Bow-Note Designs : ब्लाऊजसाठी ‘या’ बॅक बो-नॉट डिझाइन्स नक्की ट्राय करा!

महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…

59 minutes ago