Monday, April 28, 2025
Homeमहत्वाची बातमीयोग्य शेअर्सची निवड आवश्यक

योग्य शेअर्सची निवड आवश्यक

गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात देखील तेजी दिसून आली. पुढील आठवड्यात ही तेजी कायम राहिली, तर निफ्टी १८४००पर्यंत मजल मारू शकते. गेल्या काही महिन्यांत निर्देशांकात झालेली विक्रमी वाढ लक्षात घेता गुंतवणूक करीत असताना योग्य शेअर्सची निवड करणे आवश्यक आहे.

गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्प मुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेचसे गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे, म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर बाजार हा आज टेक्निकल बाबतीत नक्कीच तेजीत आहे. मात्र फंडामेंटल बाबतीत पी. ई. गुणोत्तरासह अनेक मूलभूत गुणोत्तरे ही अत्यंत धोकादायक पातळीजवळ आलेली आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे फंडामेंटलनुसार मूल्यांकन जोपर्यंत स्वस्त होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करीत असताना योग्य शेअर्सची निवड आवश्यक आहे.

सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्प मुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. अल्प मुदतीसाठी कोठारी पेट्रो, एशियन पेंट्स, इन्फोसिस, दीपक फर्टिलायझर, लार्सेन टुब्रो यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. आपण आपल्या मागील १० जानेवारी २०२२च्या लेखात मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ‘इंडोरामा’ या शेअरने ६३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज ६९ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होऊ शकते, असे सांगितलेले होते.

केवळ एकाच आठवड्यात या शेअरने ८७.८० हा उच्चांक नोंदविला. टक्केवारीत पाहायचे झाल्यास २७ टक्क्यांची घसघशीत वाढ या शेअरने केवळ पाच दिवसांत दिलेली आहे. मध्यम मुदतीसाठी जोपर्यंत ‘इंडोरामा’ हा शेअर ७० रुपये किमतीच्या वर आहे, तोपर्यंत या शेअरमधील तेजी कायम राहील.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ‘शालीमार पेंट्स’ या शेअरने १२६ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १३२.६५ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होऊ शकते. या शेअरमध्ये मागील एका आठवड्यातच १६ टक्क्यांची वाढ झालेली असल्याने हा शेअर खाली १२३ ते १२५ रुपये किमतीपर्यंत पूलबॅक देऊ शकतो. योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच यात तेजीचा व्यवहार करता येईल.

आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर बाजारात नफाखोरी अर्थात प्रॉफिट बुकिंगची शक्यता लक्षात घेता ऑप्शन मार्केटमध्ये जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या महिन्याच्या ‘पुट ऑप्शन’मध्ये व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. ऑप्शन खरेदी ही नेहमीच अत्यंत जोखमेची असते. त्यामुळे त्यामध्ये आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ६०००० आणि निफ्टीची १७८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहेत, तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील.

कमोडिटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार अल्प मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा रेंज बाऊंड असून सोने ४८५०० ते ४६५०० या पातळीत अडकलेली आहे. अल्प मुदतीचा विचार करता जर सोन्याने पुढील काळात ४८२०० ही पातळी तोडली, तर सोन्यात अल्प मुदतीत चांगली वाढ होईल.

चांदीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास चांदी अल्प मुदतीसाठी चांदीची दिशा हे देखील अजूनही मंदीची आहे. जोपर्यंत चांदी ६२५०० या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत चांदीमधील मंदी कायम राहील. चांदीची ६०००० ही महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत चांदी या किमतीच्या वर आहे, तोपर्यंत चांदीत मोठी घसरण होणार नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -