अॅड. रिया करंजकर- क्राईम
माजामध्ये एक असा घटक असतो ज्यावर सतत किंवा केव्हा ना केव्हा अत्याचार, अन्याय होतच असतो. एखाद्या घटनेत न्याय न मिळणे, हे त्यांच्या कायम नशिबीच असतं.
आजच्या घटनेतील न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे दयनीय आई-वडील व मला न्याय मिळेल, या अपेक्षेत मृत झालेली शीला (नाव बदललेलं) यांच्यापर्यंत माध्यमे पोहोचू शकली नाही की, तिच्या माहेरचे आपल्या मुलीला न्याय देण्यात कमी पडले. कदाचित ते त्यांच्या अशिक्षितपणामुळे व गरिबीमुळे न्यायापासून वंचित राहिले. शीलाचे लग्न आई-वडिलांनी आपल्या ऐपतीनुसार, गणेशशी लावून दिले. शीलाचे आई-वडील अशिक्षित, भाऊ व ती जेमतेम शिकलेली. आई-वडील मोलमजुरी करून गुजराण करणारे म्हणून मुलीला लग्नाची मागणी आली तसे लावून दिले.
गणेशची जुजबी चौकशी करून त्यांनी आपली मुलगी कमी शिकलेली आहे, कोण करणार? असे ठरवून जी मागणी आली, त्या मागणीनुसार त्यांनी तिचं लग्न म्हणजेच कन्यादान करून आपलं कर्तव्य पार पाडून ते मोकळे झाले. सासू-सासरे, पती व बाहेरगावी असलेला दीर अशीच माणसे शीलाला सासरी लाभली. वाशी नाक्याला सासर व माहेर चेंबूरला. सासर व माहेर यांच्यात अंतर फक्त वीस-पंचवीस मिनिटांचे. माहेर जवळ असल्यामुळे माहेरी येणे-जाणे चालू होते. लग्नाचे दिवस आनंदात चालले होते. शीला आपल्या संसारात रममाण होऊ लागली होती आणि त्याचबरोबर गणेशचे दारूचे व्यसन वाढत चालले होते. गणेश एका नोकरीवर कायम कधीच टिकत नव्हता. नोकरी केली तर केली, नाहीतर नाही. दोन वेळचं खायला मिळत ना, असा त्याचा हिशोब चालू होता.
गणेशच्या दारूच्या व्यसनासाठी सासू-सासरे शीलाला दोषी मानत होते. या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. काही दिवस माहेरी राहिले, तर गणेश सुधारेल, अशी अपेक्षा करत होती. माहेरी येऊनही गणेश तिला शिवीगाळ व त्रास देऊ लागला. गणेशने तिच्या माहेरी येऊन तमाशा केला, त्या वेळी माहेरच्या लोकांना सर्व समजलं.
माहेरच्या लोकांनी गणेश आणि सासरच्या मंडळींची समजूत काढली व शीलाला नांदायला सासरी पाठवले. काही दिवस गणेश आणि सासरची मंडळी व्यवस्थित वागली. परत गणेशचे दारू पिणे सुरू झालं. आता ती आपल्यासाठी नाही, तर मुलीसाठी दिवस काढू लागली. मुलीसाठी सासरी राहू लागली. गणेश काही कमी होत नव्हता. मुलीचं पुढे कसं होईल? या विचाराने ती चिंतित असायची आणि त्याच्यातून तिने मार्ग काढला की, मुलीचे भविष्य घडवायचे असेल, तर मला काहीतरी काम-धंदा केला पाहिजे आणि त्यासाठी ती काम करू लागली. त्या कामाच्या ठिकाणी जाऊन गणेश तिला त्रास देऊ लागला आणि तिच्यावर संशय घेऊन तिला घरी मारझोड करू लागला होता.
शीला या त्रासाला कंटाळून, वैतागून कायमची आपल्या लहान मुलीला घेऊन आपल्या आई-वडिलांकडे माहेरी चेंबूरला आली व तिथेच राहू लागली. धुणी-भांडी करून मुलीला शिकवून मोठं करावं, असं स्वप्न तिने मनाशी बाळगले. आपली जी परिस्थिती झाली, ती आपल्या मुलीच्या वाट्याला नको म्हणून कष्ट करण्याचे तिने ठरवले. माहेरी येताना तिने गणेशविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे सासरची मंडळी आणि गणेश शांत होते. पण सहा महिन्यांनंतर गणेश चेंबूरमध्ये शीलाच्या माहेरी येऊन पुन्हा त्रास देऊ लागला. शीलाच्या माहेरच्यांनी अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला.
सततच्या त्रासाला कंटाळून आपल्या आईला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन शीला गणेशविरुद्ध व त्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार करायला गेली. त्या वेळी पोलिसांनी कौटुंबिक वाद आहे, मिटून जाईल, अशी समजूत घालून तिला परत पाठवले. पण दुसऱ्याच दिवशी गणेश तिथे येऊन शिवीगाळ करू लागला आणि तमाशा करू लागला म्हणून ती आपली आई व काकूला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. आठ वाजता गेली ती नऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होती. पण त्यावेळी कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी होता. तिची तक्रार नोंदवून न घेता तिला सांगण्यात आले की, जेव्हा असा काही प्रसंग घडेल तेव्हा १०० नंबरवर कॉल कर आणि एक तास बसवून तिला घरी पाठवले.
सव्वानऊला ती घरी आली, तेव्हा गणेश कुठे शिवीगाळ देत बसलेला आहे हे पाहण्यासाठी ती साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडली. आईला सांगितलं, “हा कुठे गेलाय, शिव्या घालत होता ते बघून येते.” ते सांगून गेली ती परत आलीच नाही. बरोबर नऊ पंचेचाळीसला तिची सासू धावत आली आणि मोठ्या-मोठ्याने बोंबलून रडून म्हणाली, “तुमच्या मुलीने आत्महत्या केली. तुमची मुलगी मेली.” हे शब्द ऐकताच तिच्या आई-वडिलांना धक्का बसला, कारण साडेनऊ वाजता त्यांची मुलगी मी येते म्हणून सांगून गेली आणि पंधरा मिनिटांत असे काय झाले की, त्यांची मुलगी गेली? त्यांचा विश्वासच बसेना! घरातील सर्व मंडळी त्या ठिकाणी धावत गेली. बघतात तो शीला निपचित पडलेली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्या वेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आपली मुलगी आत्महत्या करणं शक्य नाही, हा विश्वास माहेरच्या लोकांना होता, कारण, एवढी वर्षं तिने सासरच्या मंडळींचा त्रास सहन केला.
यात चूक होती, ती आधी वेळेवर तक्रार नोंदवून न घेतलेल्या पोलीस स्टेशनची! कोरोना काळात अचानक मृत झालेल्या शीलाला कोरोना पॉझिटिव्ह ठरवणाऱ्या हॉस्पिटलची आणि शीला मृत होऊनही वेळेवर तक्रार न घेतलेल्या पोलीस स्टेशनची! या सर्वांच्या चुकीमुळे अपराधी लोकांनी त्याचा फायदा उचलला व अटकपूर्व जामीन घेऊन पसारसुद्धा झाले आणि शीलाचे गरीब आई-बाप मात्र पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत बसले.
अशा किती तरी शीला आहेत, ज्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात आणि न्याय मिळण्यापासून उपेक्षित राहतात आणि त्याचा फायदा सासरची मंडळी उचलून अटकपूर्व जामीन घेऊन पसार होतात…