प्रियानी पाटील
आर्म फोर्स असो किंवा नेव्ही, विमानतळ अथवा एखादा हेरिटेज एरिया या क्षेत्रांत कार्यरत तसेच सतर्क राहण्यासाठी धाडस लागते. हे क्षेत्रच असे आहे की, जेथे मुली जाण्यास धजावत नाहीत. मात्र, भावना यादव याला अपवाद आहे.
देशसेवेचे व्रत हाती घेतल्यानंतर आयुष्यात पहिले आले ते अपयश आणि नंतर मिळाले ते अफलातून यश जे की, केवळ कुटुंबीयांच्याच नव्हे, तर साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटविणारे ठरले. असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेत मीरा-भाईंदरची भावना यादव देशामध्ये चौदावी, तर देशात मुलींमध्ये पहिली आली आिण कौतुकाचा वर्षाव सुरू झाला जो साऱ्यांच्याच अभिमानाचा मानबिंदू ठरला.
व्हीआयपींच्या हस्ते सत्कार, अभिनंदनाचे फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी आिण भावनाचे झालेले कौतुक हे आज समाजासमोर आदर्शवत ठरले आहे. तिच्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे आहे, कारण हे भविष्यातील तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक अाहे.
आर्म फोर्स असो किंवा असो नेव्ही, विमानतळ, अथवा एखादा हेरिटेज एरिया या क्षेत्रांत कार्यरत, सतर्क राहण्यासाठी अफाट धाडस लागते आणि हे क्षेत्रच असे आहे की, जेथे मुली जाण्यास धजावत नाहीत. करिअरची ही संधी घरापासून कोसो दूर नेणारी असली तरी देशप्रेमाने पुलकित करणारी आहे. हेच देशप्रेम जागृत होऊन भावनाने या क्षेत्रात येण्यासाठी एकदा आलेले अपयश पचवून जी काही भरारी घेतली आहे, त्याला तोड नाही.
विशेषत: आर्म फोर्स डायरेक्ट बॉर्डरवर असतात. मिलेट्री, नेव्ही, विमानतळ, हेरिटेज एरिया, व्हीआयपी प्लेस, राष्ट्रपती भवन, अशी जी महत्त्वाची ठिकाणे आहेत, येथे डोळ्यांत तेल घालून कार्यरत, सतर्क राहावे लागते. हे क्षेत्रच असे अाहे की, या क्षेत्राकडे मुली जास्त वळत नाहीत. आपसूकच पाठ वळवली जाते. भावना सांगते, या क्षेत्राकडे मुलींनी वळावं, करिअर करावं, येथे चांगला स्कोप आहे. देशाची सेवा करण्याची उत्तम संधी यातून प्राप्त होणार आहे. असिस्टंट कमांडंटची ऑल इंडियामध्ये पोस्टिंग होते.
खरं तर या अगोदर दिलेल्या परीक्षेत भावनाला अपयश आले होते. ती रडली, इमाेशनल झाली होती. पण आता मिळालेले यश हे अफलातून असल्याचे भावनाचे वडील सुभाष यादव सांगतात. भावनाला देशसेवेचा वारसा तिच्या घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील स्वत: बोरिवली येथे गेली ३५ वर्षे सहाय्यक इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. घरातून मिळालेले प्रोत्साहन आिण मिळालेले यश हे देशसेवेच्या ध्यासापोटीच असल्याचे भावना सांगते. भावनाने देशसेवेचे स्वप्न बाळगून या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. न डगमगता, धाडसाने असिस्टंट कमांडंट या पदापर्यंत पाेहोचण्यासाठी अाज भावना यादव इथपर्यंत पाेहोचली आहे. तिचे हे यश कौतुकास्पद आहे. तिच्यावर कौतुकाचा झालेला वर्षावही डोळ्यांचे पारणे फिटविणारा असाच आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे केलेले अभिनंदन. गोपिचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड यांनी फोनद्वारे दिलेल्या शुभेच्छा. पोलीस क्षेत्रातील अधिकारी, सेवादलातील निवृत्त अधिकारी यांनी भावना हिला शुभेच्छा देऊन तिचे केलेले कौतुक, त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले तसेच त्यांच्या पत्नी अॅडिशनल कमिशनर यांनीही भावनाचा सत्कार केला. स्थानिक आमदार माजीवडा मतदारसंघाचे प्रताप सरनाईक यांनी यादव यांच्या घरी येऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका, विविध सामाजिक संस्था आिण आजूबाजूच्या सोसायटींमार्फत भावनाचा सत्कार सोहळा पार पडला आहे.
महाराष्ट्रातील मुलींनी पुढे यावे, देशसेवेत रुजू व्हावे यासाठी यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन शासकीय सेवेत योगदान द्यावे व देशाची सेवा करावी, असा संदेश भावना देते. या क्षेत्रात मुली येण्यास धजावत नाहीत. पण संधी खूप आहे. धाडस लागते, आयुष्यात अपयश येत असते. पण अपयशावर मात करायला तरुण पिढीने शिकले पाहिजे. अपयशालाही नक्कीच यश येते, हे आज भावनाने दाखवून दिले आहे.
असिस्टंट कमांडंट पोस्टमध्येे पुढे प्रमोशन्स होतात, यशस्वितेचा मार्ग नक्कीच सापडतो. भावनाच्या निर्णयाचे, यशाचे आणि धाडसाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भावनाने करिअरपोटी नव्हे, तर देशप्रेमापोटी उचललेले धाडसी पाऊल महाराष्ट्रातील आजच्या आिण भविष्यातील तरुण पिढीसाठी गवसलेला सूरच म्हणावा लागेल.
[email protected]