आहार, निद्रा, ब्रह्मचर्या तिन्ही खांबाविषयी शास्त्रीय माहिती घेण्याचा प्रयत्न पुढील तीन लेखांत करूया.
आहार हा खांब मजबूत असायला हवा. याचा अर्थ ज्या गोष्टी खायच्या त्या पोषक हव्यातच. पण त्याचबरोबर ते बनवताना योग्य नियम पाळून बनवले पाहिजेत. इतकेच नव्हे तर अन्न खातानाही नियम पाळून खावे, असे शास्त्र सांगते. ‘आहारविधिविशेषायतन’ असे याला शास्त्रीय भाषेत म्हणतात.
काही महत्त्वाचे नियम
खाताना अन्न गरम स्नेहयुक्त असावे.
स्वच्छ, भांड्यात खावे.
खूप भरभर किंवा खूप सावकाश, खूप बडबड करत जेवू नये.
जेवताना खाण्याच्या पदार्थांकडे लक्ष देऊन जेवावे.
या खाल्लेल्या गोष्टी अंगी लागाव्यात, यासाठी सांगितलेल्या आहेत.
वरील नियमांबरोबर वय, जन्म ज्या देशात होतो तो देश, ऋतू यानुसार देखील कोणता आहार त्या व्यक्तीला आरोग्यदायी स्वास्थ्यदायी असतो हेदेखील सांगितले आहे. आहार हा प्रत्येक माणसाच्या वयाच्या विभागणीनुसार वेगळा असतो.
जन्मलेल्या तान्ह्या बाळाचा आहार क्षीरप (०-६ महिने) फक्त आईचे दूध, गाईचे दूध, पातळ सूप असा असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण यामागे दोन शास्त्रीय गोष्टींचा विचार आहे. पहिला महत्त्वाचा विचार एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून अन्नातून मिळणारी गोष्ट पचवणे, याची सुरुवात असते. त्यामुळे पचायला सहज, शरीराच्या वाढीला योग्य असा आहार बाळाच्या स्वास्थ्यासाठी योग्य असतो.
पुढचा टप्पा क्षीरान्नाद : (४-८ महिने) यात हळूहळू दात येण्याची सुरुवात असल्याने, हिरड्या घट्ट होऊ लागतात. त्यामुळे चाटून खाता येणारे भाज्या उकडून, मऊ करून, थोडे घट्ट मऊ भात, वरण अशा गोष्टी बाळाच्या स्वास्थ्याला उपयोगी असतात. या टप्प्यावर आणखी एक गोष्ट बदलायला लागते, बाळाच्या शरीराची हालचाल.
पुढचा शेवटचा टप्पा अन्नाद : (१ वर्ष) हळूहळू दात येऊ लागले की, मूल साधारण एक वर्षाचे होते. चावून, तोडून, चाखून आणि पेय चारही प्रकारचे अन्न पदार्थ, म्हणजे उदाहरणार्थ पोळी-भाजी असे पूर्ण जेवण मूल खाऊ लागते.
यानंतर वयाच्या १६ वर्षांपर्यंत, तरुणपणी आणि प्रायः ६० वर्षे वयानंतर म्हातारपणी माणूस सगळे जेवण जेवतो.
या गोष्टी इतक्या विस्तृत सांगण्याचा उद्देश आहारातून होणारे पोषण, शरीराची होणारी वाढ, अन्नपचन शरीराच्या हालचाली यानुसार घडते. केवळ त्या अन्नात काय पोषक घटक आहेत या एकाच गोष्टीने नाही.
आहारात धान्ये, डाळी, कडधान्ये, मांस, मसाल्याचे पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ दही, ताक, लोणी, तूप, पाणी असे आहार गट देखील शास्त्रात सांगितले आहेत. त्याविषयीही अधिक माहिती नंतर देण्याचा प्रयत्न करूया.
प्रत्येक गटातील काहीही खाल्ले तरी पोषण करणारे पदार्थ योग्य प्रमाणातच खाल्ले तसेच आपली शरीराची होणारी हालचाल, व्यायाम आणि भूक या सर्व गोष्टी सारासार विवेक ठेवून केल्यास उत्तम आरोग्यासाठी, मजबूत करायला नक्कीच उपयोगी ठरू शकेल.
थोडक्यात,
मात्राशी स्यात्। आहारमात्रापुन: अग्निबलापेक्षिणी।
(प्रमाणात खावे. आपल्याला खरी भूक लागली आहे का हे ओळखून खावे.) तसेच
शरीर चेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी
देहव्यायामसंख्याता मात्रया तं समाचरेत्
(योग्य व्यायाम किंवा शरीराचे चलनवलन योग्य झाले की, भूक चांगली लागते. अन्नपचन चांगले होते. अन्नातील पोषक घटक शरीराची ताकद वाढवायलाही मदत करतात.)
आजची गुरुकिल्ली :
आत्मानं अभिसमीक्ष्य तन्मना भुञ्जीत
(स्वत:ला हितकारक काय आहे, हे ओळखून आनंदाने अन्न खावे.)
सर्वांना सुख लाभावे,
जशी आरोग्यसंपदा!