रमेश तांबे-किलबिल
एक ना होतं घोड्याचं पिल्लू. त्याचं नाव होतं शिंगरू. एकदा काय झालं, ते गेलं आईबरोबर रानात चरायला. रान खूप मोठ्ठं होतं. तिथे उंच उंच झाडे, हिरवे हिरवे गवत, खळखळणारे ओढे आणि मोठमोठे डोंगर होते. त्याला खूप मजा वाटली. त्यानं आनंदानं उड्या मारल्या. तो गवतात लोळला, पायाने माती उकरली अन् जोरजोरात खिंकाळला! हिरवं हिरवं रान बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मग काय हे खा, ते खा, झाडांची पानं खा, वेलींची पानं खा, हिरवं गवत खा, नाही तर पोपटी गवत खा!
खाता-खाता खूप वेळ गेला. चरता चरता ते खूप लांब गेलं. त्यानं मान उंच करून इकडे तिकडे पाहिलं. पण त्याची आई त्याला दिसेना. ते खूप घाबरलं, जोरजोरात ओरडू लागलं, रडू लागलं. मग शिंगरू लागलं इकडे तिकडे पळू!
ते सुटलं पळत. पळता पळता त्याला भेटलं एक हरिण! हरिण म्हणालं, “अरे वेड्या असा रडतोस काय! चल माझ्याबरोबर जंगलात. तिथं राहा माझ्या मुलांबरोबर!” शिंगरू म्हणालं, “नको रे बाबा, तिथं वाघ असतो… तो खाईल मला!”
मग हरणाला सोडून शिंगरू लागलं पळू. पुढं त्याला भेटलं एक माकड. माकड म्हणालं, “अरे शिंगरू बाळा, थांब जरा, घाबरू नकोस. ये माझ्याबरोबर… खेळ माझ्या पोरांबरोबर.” शिंगरू म्हणालं, “नको रे बाबा, तू त्या उंच झाडावर राहतोस. मी पडलो तर झाडावरून?”
माकडाला टाटा करून शिंगरू लागलं पळू. पळता पळता लागली नदी. शिंगरू घटाघटा पाणी प्यायलं. तेवढ्यात नदीच्या पाण्यात त्याला भेटला एक मासा. मासा म्हणाला, “शिंगरू शिंगरू, तू घोड्याचं पिल्लू! वाट चुकलास वाटतं? चल माझ्या घरी…. या भल्यामोठ्या नदीत… तिथं माझे आई-बाबा आहेत.”
शिंगरू म्हणालं, “नको नको… मी बुडून जाईन पाण्यात!”
मग माशाला सोडून शिंगरू पुन्हा पळू लागलं जोरात. पळता पळता त्याला भेटली एक मुंगी! मुंगी म्हणाली, “अरे ए शिंगऱ्या… घोड्यासारखा घोडा झालास अन् असं घाबरून पळतोस काय? चल माझ्या घरी… बघ माझी मुलं कशी डेअरिंगबाज आहेत!” शिंगरू म्हणालं, “मुंगीताई, मुंगीताई तुझं घर इवलंसं! त्यात मी कसा राहणार? माझ्या शेपटीनेच तुझं घर जाईल पडून!”
मग शिंगरू आणखी वेगानं पळू लागलं. आता हळूहळू अंधार पडू लागला होता. त्याला खूपच भीती वाटू लागली होती. तेवढ्यात त्याला भेटला गणू. गणू त्याला म्हणाला, “शिंगरू भाऊ, अरे शिंगरू भाऊ, असा पळत काय सुटलाय? पुढे मोठं जंगल आहे. तिथं वाघ, सिंह राहतात. तिथल्या तलावात मोठमोठ्या मगरी असतात, त्या खाऊन टाकतील तुला! तू जाऊ नकोस पुढे… चल माझ्याबरोबर!” मग शिंगरूने विचार केला, इथल्या जंगली प्राण्यांपेक्षा हा दोन पायाचा माणूस बरा!
मग शिंगरू झाले तयार. गणू शिंगरूच्या पाठीवर बसला. तिथेच शिंगरू कायमचा फसला. कारण, शिंगरूच्या गळ्यात गणूने बांधली दोरी आणि घेऊन गेला त्याला कायमचा घरी!
[email protected]