Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमृत्यूचा सापळा कोणी रचला?

मृत्यूचा सापळा कोणी रचला?

स्टेटलाइन, सुकृत खांडेकर

“सवाल जहर का नहीं था, वो तो तू पी गया,
तकलीफ लोगों को तब हुई, जब तू जी गया…!”

नववर्षाच्या सुरुवातीलाच ५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले, ही संपूर्ण देशावर नामुष्की आली. पंतप्रधानांबरोबर स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे मजबूत कवच असतानाही मोटारीने फिरोजपूरकडे जात असताना त्यांचा ताफा आंदोलकांनी रोखला. देशाच्या सर्वोच्च अधिकारपदावर बसलेल्या व्यक्तीला वीस मिनिटे उड्डाणपुलावर एकाच जागी थांबावे लागले. तेथून अवघ्या वीस किमी अंतरावर पाकिस्तानची सरहद्द होती. पाचशे मीटर अंतरावर काठ्या व झेंडे फडकवत शेकडो आंदोलक पंतप्रधानांचा निषेध करीत होते. पंजाब सरकार आणि पंजाब पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा दिसून आला. देशाच्या पंतप्रधानाला पंजाबमध्ये रोखल्याचा अासुरी आनंद खलिस्तानवाद्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे तर काही घडलेलेच नाही, अशा आविर्भावात होते. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी तर “मोदी जी हाऊज द जोश”, असे ट्वीट करून मोदींची कशी आम्ही जिरवली, असे जगाला दाखवले. शेतकरी नेते राकेश टिक्केत यांनी, तर रॅलीतील रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदी माघारी फिरले. त्यांनी तिथे जायलाच नको होते, असे सांगणे म्हणजे केवळ मोदीद्वेष आहे.
सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घेऊन या घटनेची निवृत्त न्यायमू्र्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. मृत्यूच्या सापळ्यातून पंतप्रधान वाचले. पण कोणाही उच्चपदस्थाची रवानगी तत्काळ जेलमध्ये झाली नाही, याचेच मोठे आश्चर्य वाटते. खलिस्तानवादी समर्थक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन डझन बड्या वकिलांना फोन करून मोदी सरकारला मदत करू नका म्हणून धमकावले. भाषण न करताच मोदींना परत फिरावे लागले म्हणून शीख फाॅर जस्टिसच्या प्रमुखाने संतोष व्यक्त केला. पंतप्रधानांना मृत्यूच्या सापळ्यात अडकविण्याचे कारस्थान खलिस्तानवाद्यांनी आखले होते, हे त्यातून स्पष्ट झाले. खलिस्तानवाद्यांशी मिली-जुली असल्यासारखे पंजाबमधील चन्नी सरकार त्या कटात कसे फरफटत गेले हेच देशाला दिसून आले. शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू हे मोदींविरोधी कटाचे सूत्रधार म्हणून आता संशयाची सुई त्यांच्याकडे रोखली जात आहे. हा पन्नू म्हणतो, तिरंगावाल्या पीएमला पंजाबमधून परत पाठवले, आता पंजाबमध्ये खलिस्तानी मोहीम पुन्हा सुरू झाली आहे.
शीख फाॅर जस्टिस या दहशतवादी संघटनेवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे. पण त्यांच्या कारवाया ब्रिटन व अमेरिकेतून चालू असतात. खलिस्तानवाद्यांनी प्रसारित केलेले व्हीडिओ मोदींच्या पंजाब भेटीच्या तीन दिवस अगोदरपासून सोशल मीडियावर फिरत होते. ‘मोदींना रोखा’ असे त्यात आवाहन करण्यात आले होते. खलिस्तानवाद्यांनी प्रसारित केलेले व्हीडिओ व सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना दिलेली धमकी बघता मोदींसमोर पंजाबात मृत्यूचा सापळा उभारण्याचे कारस्थान खलिस्तानवाद्यांनी शिजवले आणि त्यात पंजाब सरकारने साथ दिल्यामुळेच मोदींना माघारी परतावे लागले हेच स्पष्ट होते.
एसपीजीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत, त्यांचे प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. पंतप्रधानांची संपूर्ण सुरक्षा हेच त्यांचे एकमेव अहोरात्र काम आहे. त्यांनी रस्ता अडविणाऱ्या आंदोलकांवर स्वयंचलित शस्त्रातून गोळीबाराचा वर्षाव सुरू केला असता, तर मोठा रक्तपात झाला असता. पण त्या आंदोलकांवर गोळीबार करण्यास स्वत: पंतप्रधानांनी मनाई केली. “मर जाऊंगा पर गोली नहीं…”, असे त्यांनी उद्गार काढले.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर आंदोलक घुसले व तेथे तिरंग्याचा अवमान केला. दिल्लीत अनेक ठिकाणी रस्ता रोको व हिंसाचार केला. पण पोलिसांनी हिंसक आंदोलकांवर एकही गोळी चालवली नाही. मोदी-शहा यांच्या आदेशानेच फार मोठा रक्तपात टळला. मोदी घाबरून पळाले, असाही प्रचार विरोधकांनी केला. त्यांना मोदी ही काय चीज आहे, याची कल्पना नसावी. २६ जानेवारी १९९२ रोजी मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली भाजपची एकता यात्रा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. तेथे मोदींनीच तिरंगा फडकवला होता. ही यात्रा ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी येथून निघाली होती. “जिसने माँ का दूध पिया है, वो श्रीनगर आयेगा”, अशी धमकी तेव्हा दहशतवाद्यांनी दिली होती.
२७ आॅक्टोबर २०१३. बिहारची राजधानी पाटणा. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव जाहीर केले होते. भाजपने पाटण्यात हुंकार रॅली योजली होती. तुफान गर्दीत सभा चालू असताना १० बाॅम्बस्फोट झाले. इंडियन मुजाहिद्दीन व सिमीने ते घडवले. नंतर आणखी दहा जिवंत बाॅम्ब सापडले. पण मोदींनी न घाबरता भाषण पूर्ण केले.
दि. ५ जानेवारी २०२२ पंजाब-फिरोजपूर, मोदींना अडवले जाईल, घेराव होईल, रस्ता रोको होईल, असे आयबीने पंजाब पोलिसांना अगोदर लेखी अहवालात कळवले होते. पंतप्रधानांच्या पावणेदोन तासांच्या मोटारीच्या प्रवासात एसपीजीचे अधिकारी पोलीस महासंचालकांबरोबर बारा वेळा फोनवर बोलले. पण आंदोलकांनी रस्ता बंद केल्याचे पोलीस महासंचालकांनी चुकूनही सांगितले नाही. याचा अर्थ काय असू शकतो? शत्रूला मोदींवर समोरून हल्ला करण्याऐवजी रिमोटचे बटन दाबूनही मोठा अग्निकल्लोळ पेटवता आला असता. पंतप्रधानांना रोखून त्यांना जोडे दाखवा, असे खलिस्तानवाद्यांनी व्हीडिओवरून आवाहन केले होतेच, तरीही चन्नी सरकारला जाग आली नाही, असे कसे म्हणता येईल?
मोदी माघारी फिरल्यावर मुख्यमंत्री चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबत उपमुख्यमंत्री रंधवा व गृहमंत्री हजर होते. चन्नी म्हणाले, “चुकीचे काही घडलेले नाही, कोणावर कारवाई होणार नाही.”, गृहमंत्री म्हणाले, “मला काहीच माहिती नाही.” पंजाब दौऱ्यात मोदींचे काही बरे-वाईट झाले असते, तर देशभर आगीचे लोळ उठले असते, हिंदू-शीख दंगली उसळल्या असत्या, शिखांची जगभर बदनामी झाली असती. हुसेनीवाला येथील शहिदांच्या स्मारकापर्यंत मोदींना पोहोचू दिले नाही, हा चन्नी सरकारला पुरुषार्थ वाटतो काय?
पंतप्रधानांच्या दौऱ्याचा राजशिष्टाचार चन्नींना ठाऊक नाही काय? पीएम सुरक्षिततेची नियमावली सांगणाऱ्या ब्लू बुकची चन्नी सरकारने पंजाबमध्ये कबर बांधली. पंजाबच्या डोक्यावर असलेले ४ लाख कोटींचे कर्ज कमी करण्यासाठी आणि ४० हजार कोटींच्या विकासप्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान पंजाबला गेले होते. पण चन्नी सरकारने त्यांना परत पाठवले, हा अक्षम्य फौजदारी अपराध आहे. भटिंडा विमानतळावर पोहोचल्यावर मोदी तेथील अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “मै एअरपोर्ट तक जिंदा पहुँच पाया, इसलिए अपने सीएम को थँक्स कहना…”
मोदींची हत्या करण्याचे कारस्थान पंजाबमध्ये रचले गेले, हे सर्व देशाला कळून चुकले. देशातील सोळा माजी डीजीपी व २७ आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून पीएम सुरक्षिततेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“तुमने वो किया, जिसका हमें अंदाजा था,
अब हम वो करेंगे
जिसके बारे में तुमने सोचा नहीं होगा…!”
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -