नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाच्या महामारीची पहिली लाट सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली. त्या संबंधी तक्रारी राज्य प्रशासन दरबारी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रतिबंध यावे. म्हणून शासनाकडून आर्थिक लूट होऊ नये म्हणून निर्बंध लादले गेले. पण, त्या नियमांना आता तिसऱ्या लाटीच्या मुहूर्तावर धाब्यावर बसवून खासगी रुग्णालय प्रशासन रुग्णांची लूट करत आहे. यावर प्रतिबंध यावा म्हणून नागरिक आक्रमक झाले आहेत.
पहिल्या व दुसऱ्या लाटेत मनपा रुग्णालयात दाखल होण्यासाठी असणाऱ्या जागा कमी पडत होत्या.त्यामुळे सर्वच स्तरातील नागरिकांनी आपल्या आर्थिक स्थितीचा विचार जरासही न करता भीतीपोटी खासगी रुग्णालयात भरती झाले. हीच परस्थिती दुसऱ्या लाटेतही दिसून आली. पण ज्यावेळी बिलाची देयके समोर ठेवली. त्यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे डोळे पांढरे झाले होते. विशेष म्हणजे एखाद्या रुग्णांचा मृत्यू झाला तरी त्याच्या नातेवाईकांना गहाण राहून वैद्यकीय देयके द्यावी लागत होती. जर एखादा रुग्ण मृत पावला व त्याची देयके पूर्ण भरली नाहीतर पुढील शासकीय कामासाठी त्याच्या वारसांना लागणारे काहिनाकाही कागद पत्र स्वतः कडे ठेवली जात होती. त्यामुळे वारसांची अडवणूक केली जात होती.
हा प्रकार शासन दरबारी पोहचल्यावर शासनाने खासगी रुग्णालय प्रशासनावर अंकुश यावे म्हणून काही आदेश निर्गमित केले. या आदेशात पाहिले म्हणजे जे खासगी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णावर उपचार करतात त्यांनी आपल्या रुग्णालयाच्या प्रथम दर्शनी भागात दरपत्रक प्रदर्शित करावे. ही अट तर टाकलीच पण रुग्णांवर जे उपचार केले जातील त्याचे दर किती घ्यावेत, या बाबतही आदेश दिले गेले. पण आजही त्या नियमाची अमलबजावणी नवी मुंबईतील बहुतांशी खासगी रुग्णालये करताना दिसून येत नाहीत. यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईत आता तिसरी लाट सुरू आहे. अठरा हजारा पेक्षा जास्त रुग्ण मनपा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु आजही या अनेक रुग्णालयांच्या प्रथम दर्शनी भागात दरपत्रक प्रसिद्ध केलेला दिसून येत नाही. तसेच उपचार देखील आपल्या मर्जीप्रमाणे केल्याचे दिसून येत असून शासनाच्या नियांमाना तिलांजली दिली गेली असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तसेच शासनाच्या नियमांना धरून कोणतेही दर आकारले जात नाही. यामुळे या रुग्णालयांची तपासणी करून कडक कारवाईची मागणी होत आहे.
खरे पाहता जे मानवता विरोधात काम करत आहेत त्यांच्यावर कडक आर्थिक दंडाची कारवाई तर करावीच. पण या रुग्णालयांच्या मालकावर गुन्हे दाखल करून गजाआड करावे. तेव्हाच हे वठणीवर येतील. – अजय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ता, नवी मुंबई.
शासनाचे नियम पायदळी तुडवुन उपचाराचे दर घेतले असतील तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. पुढे चौकशी करून त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. तसेच मागील दोन लाटेत ज्यांनी आदेश मानले नाहीत. त्यांच्यावर अनेकदा कारवाई केली आहे. – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, पालिका