मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी तसेच आदिवासी पट्ट्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, कारण आता सर्वांनी सावधानता बाळगायला हवी. येत्या दहा ते बारा दिवसांत कोरोनाचे १११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, तसेच नियमित सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीवर जास्त भर देणे, आताच्या घडीला काळाची गरज आहे.
दरम्यान सध्या मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुरबाड आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती पाहता मुरबाड व शिवले येथे कोविड सेंटर सुरू केले असल्याची माहिती मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे यांनी दिली आहे.
सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या-८३, तसेच घरी विलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या-८६ व आतापर्यंत शॉब सॅम्पल घेतलेल्या रुग्णांची संख्या-८३७आहे. तर मुरबाड नगरपंचायतच्या क्षेत्रात बाधिक रुग्णांची संख्या-२८वर गेली आहे. तर मुरबाड ग्रामीण क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या ६१ वर पोहोचली आहे. मुरबाड तालुक्यात सध्याच्या घडीला १११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून विनामास्क न फिरता मास्कचा नियमित वापर करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दररोज जास्तीत जास्त रुग्णांची टेस्टिंग करत आहोत. तसेच सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सब सेंटर येथे लसीकरण यावर जास्त भर दिला जात आहे. – डॉ. भारती बोटे, मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी.