अमृता वाडीकर
नाट्यदर्पण म्हटलं की, आधीच्या पिढीच्या नाट्यरसिकांना सुधीर दामले आठवतील. मराठी माणसाचं नाट्यवेड सुधीर दामले यांच्या अंगी पुरेपूर भिनलं होतं. ते कायम मराठी नाट्यक्षेत्राशी जोडलेले राहिले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाट्यदर्पण रजनीने लोकप्रियतेचा कळस गाठला. रंगकर्मी आणि नाट्यरसिक यांना जोडणारा दुवा होता. ८२व्या वर्षी सुधीर दामले यांचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने सुधीरजींच्या कार्याची ही ओळख…
सुधीर दामले… मराठी नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नाट्यदर्पण पुरस्कार सोहळ्याचे प्रणेते आणि नाट्यदर्पण प्रतिष्ठानचे संस्थापक. नाट्य क्षेत्रातले कलाकार आणि रसिक प्रेक्षकांना जोडणारा हा दुवा नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. सुधीर दामले यांच्या जाण्याने एक हाडाचा नाट्यरसिक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. सर्वसाधारपणे पुरस्कार सोहळ्याचा एक ढाचा असतो. सूत्रसंचालन, मान्यवरांची उपस्थिती, पुरस्कार प्रदान कार्यक्रम आणि मधल्या वेळेत सादर होणारे मनोरंजनपर कार्यक्रम… पण ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी वेगळा ठरला
. या पुरस्कार सोहळ्याची संकल्पनाच भन्नाट होती. गणेश सोळंकी यांच्या सल्ल्याने सुधीर दामले यांनी या पुरस्कार सोहळ्याचा पाया रचला आणि त्यांची ही संकल्पना अल्पावधीतच रसिकप्रिय ठरली. आजघडीला मनोरंजन क्षेत्रात पुरस्कार सोहळ्यांचा सुकाळ आहे. हिंदीतच अनेक चित्रपट पुरस्कार सोहळे आयोजित होतात. मराठी चित्रपटांचा तसंच त्यातल्या कलाकारांचा गौरव करणारे बहुविध पुरस्कार सोहळे आहेत. या सोहळ्यांमध्ये नावाजलेल्या कलाकारांची नृत्य, विनोदी कार्यक्रम सादर होत असतात. मात्र नाट्यदर्पण पुरस्कार सोहळा सर्वार्थाने वेगळा होता. १९७५मध्ये पहिला नाट्यदर्पण पुरस्कार सोहळा पार पडला. हा उपक्रम सलग २५ वर्षं सुरू राहिला. १९९९ मध्ये रौप्य महोत्सवी नाट्यदर्पण पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि तिथेच या उपक्रमाची सांगता झाली. नाट्यदर्पण पुरस्कार सोहळ्याची सांगता होऊन आज बावीस वर्षं लोटली असली तरी या सोहळ्याची मोहिनी नाट्यरसिकांवर आजही कायम आहे आणि याचं श्रेय अर्थातच सुधीर दामले यांना जातं.
सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण पुरस्कार सोहळ्यासोबतच नाट्यदर्पण विशेषांक आणि ‘कल्पना एक-आविष्कार अनेक’ ही एकांकिका स्पर्धा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राबाहेरही गाजवली. त्यांनी जवळपास २० वर्षं हे उपक्रम राबवले. ते वेगवेगळ्या मार्गांनी मराठी नाटकांसाठी कार्यरत राहिले. त्यांनी मराठी नाट्यक्षेत्रासाठी फार मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी माणूस नाट्यवेडा आहे. नाटकांचं हे वेड सुधीर दामले यांच्यात पुरेपूर उतरलं होतं. यातूनच त्यांनी अनेकविध उपक्रम राबवून मराठी नाट्यक्षेत्राला समृद्ध केलं.
सुधीर दामले यांचं मराठी भाषेवर खूप प्रेम होतं. त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलं होतं. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची ओढ होती. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात असताना त्यांनी महाविद्यालयाच्या नाट्य विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. काही काळानंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून नाट्यसमीक्षा लिहायला सुरुवात केली. त्यांनी नाट्य परिषदेचं सदस्यत्वही घेतलं होतं. नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यभूमी’ हे मासिक काढलं जात होतं. लिखाणाची आवड सुधीर दामले यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्यांनी पुढाकार घेऊन नाट्यभूमीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली. ते ‘मार्मिक’ या मासिकात ‘पिटातल्या शिट्ट्या’ हे नाट्यविषयक सदरही चालवत असत. अशा प्रकारे ते विविध पद्धतींनी नाट्यक्षेत्राशी जोडलेले होते. काही काळानंतर ‘नाट्यदर्पण’ मासिक बंद झालं. दामले यांचे नाट्यक्षेत्रातल्या दिग्गजांशी अगदी जवळचे संबंध होते. त्यावेळी नाट्यसंमेलन होत असे. मात्र मराठी नाटकांचा हक्काचा पुरस्कार सोहळा तेव्हा नव्हता. असा एखादा पुरस्कार सोहळा असावा, असं दामले यांना वाटत होतं.
रंगकर्मी गणेश सोळंकी, दाजी भाटवडेकर, डॉ. मो. ग. रांगणेकर आदी मान्यवरांशी झालेल्या चर्चेतून असा पुरस्कार सोहळा सुरू करण्याची कल्पना पुढे आली. हा फक्त पुरस्कार सोहळा नव्हता, तर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अनेक कार्यक्रम सादर होत असत. नाट्यदर्पण रजनीला नाट्यक्षेत्रातल्या दिग्गजांची आवर्जून हजेरी असायची. हा कार्यक्रम साहित्य संघ रंगमंदिर, रवींद्र नाट्य मंदिर येथे रंगायची. ही रजनी लोकप्रिय होऊ लागल्यानंतर रसिकांची गर्दी वाढू लागली. मग हा कार्यक्रम ‘रंगभवन’च्या खुल्या रंगमंचावर होऊ लागला.
दामले कधीही स्वस्थ बसले नाहीत. नानाविध कल्पना लढवत राहिले, मनोरंजनपर, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले. नाट्यक्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलं होतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीत एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. नाटकांना सर्वस्व मानणारा आणि मराठी नाट्यसृष्टीसाठी विविध उपक्रम राबवणारा एक अवलिया नाट्यवेडा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘नाट्यदर्पण रजनी’ अजरामर करणारे सुधीर दामले नाट्यरसिकांच्या मनात कायम राहतील, याबाबत शंका नाही.