Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीवसईत ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन

वसईत ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन

पालघर (प्रतिनिधी) : वसईतील कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
गुगल इंडियातर्फे आणि पाथ, या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने देशभरात ८० ऑक्सिजन प्रकल्प सामाजिक कार्य करणाऱ्या विविध रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वसईच्या कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आशीर्वाद विधी हा वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी केले.

हा ऑक्सिजन प्रकल्प दिवसाला ११ लाख लिटर ऑक्सिजन पुरविणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे वर्षाला ३६ लाख रुपये वाचणार आहेत. या प्रकल्पातील ऑक्सिजन प्राथमिक तत्वावर रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात येणार असून पुढे गुगलच्या परवानगीने तो शहरातील इतर रुग्णांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी रामदास आठवले यांनी रुग्णालयासाठी आपल्या खासदार निधीतून २५ लाखांची मदत जाहीर केली. यावेळी रुग्णालयाचे उपाध्यक्ष थॉमस ब्रिटो यांनी करोना काळात २ हजार ५०० रुग्णांवर आतापर्यंत उपचार केल्याची माहिती दिली. गरीब आणि गरजूंना मदत व उपचार यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रुग्णालयासाठी हवी ती मदत करण्यास कायम पुढे राहीन, असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी यावेळी दिले. कार्यक्रमास पाथ सेवाभावी संस्थेचे अधिकारी डॉ. जयेंद्र कासार व निलेश गंगावरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. माजी महापौर प्रवीण शेट्टी, रुग्णालयाचे सचिव युरी गोन्साल्विस, माजी अध्यक्षा इव्हेट कुटिनो यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -