राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!
भालचंद्र महाराजांचा नामघोष काही केल्या बंद होईना. घरातील सर्व मंडळी नाना प्रयत्न करून दमली. असे काही दिवस गेल्यावर ते एके दिवशी गारगोटीला पसार झाले. तिथे संपूर्ण शहरभर वेड्यासारखे भटकू लागले. सुमारे सहा महिने ते गारगोटीला फिरत होते. त्यावेळी त्यांची अवस्था फार केविलवाणी झाली होती.
भालचंद्र गारगोटीस आहेत, असा घरातील मंडळींस ज्यावेळी पत्ता लागला, त्यावेळी त्यांना परत घरी आणण्याच्या इराद्याने गावातील बरीच माणसे, त्यांचे स्वत: चुलते वगैरे गेले होते; पण स्वारी नेमकीच कुठेतरी दडी मारून बसत असे. त्यावेळी गारगोटीला मुळे महाराज नावाचे साक्षात्कारी योगी पुरुष राहत असत. त्यांच्या तावडीत भालचंद्र एकदा सापडले. उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव जसा परमेश्वरप्राप्तीसाठी वनात जाऊन बसला असता ब्रह्मर्षी नारदमुनींनी भेट देऊन सांगितले की, गुरुमंत्राशिवाय देव भेटत नाही. तसेच मुळे महाराजांच्या तावडीत भालचंद्र सापडले तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की, तू येथे न थांबता, सरळ दाणोलीला जा व योगीराज साटम महाराजांची सेवा कर.
संत नामदेवाला गोरोबा काकांनी कच्चा ठरविल्याने भालचंद्रांना जणू आपला अपमान झाल्यासारखे वाटले, म्हणून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करून आपल्या आवडत्या दैवताची विठ्ठलाची जोरदार आराधना सुरू केली. त्यावेळी साक्षात पांडुरंगाने त्याला भेटून सांगितले की, तू विसोबा खेचराची सेवा कर, म्हणजे पूर्णत्व पावशील.
नामदेवांनी देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून ते विसोबा खेचर ज्या गावी राहत असत त्या गावी शोध करीत गेले व त्यांची काही काळ सेवा केली व ते पूर्णत्व पावले. तद्वतच मुळे महाराजांनी भालचंद्राची केविलवाणी दशा पाहून दाणोलीला साटम महाराजांच्या सेवेला जा, असे सांगितले होते. ते त्यांचे वचन नामदेवाप्रमाणेच भालचंद्रानी पूज्य मानून सुख, दु:ख, भूक, तहान यांची तमा न बाळगता उभा कोल्हापूर जिल्हा पादाक्रांत करून गारगोटीहून ते अंबोली घाटाने दाणोलीला गेले. तिथे गेल्यावर साटम महाराजांची अवलिया अवस्था पाहून भालचंद्र नामदेवाप्रमाणे चकित झाले व त्यांच्या सेवेत रमले. सद्गुरूवाचून जगात कोणीच तरला नाही. संत शिरोमणी तुकोबांनी जाहीर सांगितले आहे की, ‘सद्गुरू वाचोनी सापडेना सोय’ सद्गुरू हे जीवननौकेचे जणू सुकाणू आहे! सार्थ गुरूचरित्रकार म्हणतात, ‘गुरू एवढा श्रेष्ठ आहे की ब्रह्मा तोच! विष्णूही तोच!! आणि महेशही तोच!!!
किंबहुना गुरू हे परब्रह्म आहेत!’ तरी अशा थोर परब्रह्मरूपी साटम महाराजांची काही काळ सेवा केल्यावर गुरूंच्या आज्ञेवरूनच पुन्हा सावंतवाडी, कुडाळ, कसालमार्गे मालवण येथे काही काळ राहून पुन्हा कसालातून कणकवलीकडे भालचंद्र महाराजांनी वाटचाल केली.
(क्रमश:)