मुंबई (प्रतिनिधी) : वाचनसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी ‘वाचू आनंदे, या उपक्रमांतर्गत डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित बालसाहित्यिका माजी विश्वकोश अध्यक्षा, सुप्रसिद्ध लेखिका आणि दैनिक प्रहारच्या स्तंभलेखिका डॉ. विजया वाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय १०० कवी, लेखक आणि ११ प्रकाशकांची फौज घेऊन बालसाहित्याच्या १६ पानी पुस्तकांचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा रंगणार आहे. १८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, प्रवीण दवणे, माधवी घारपुरे, माधवी कुंटे, ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या विश्वस्त डॉ. समृद्धी म्हात्रे, संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा म्हात्रे-चिराटे आदी मान्यवरांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल.
अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड मार्गदर्शक असून पूनम राणे, विश्वनाथ खंदारे, मनीषा कदम समन्वयक आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण म्हात्रे आणि दिपाली केळकर करणार आहेत.
या कार्यक्रमाला अक्षर चळवळ, अक्षरक्रांती, गुरूमाऊली, जाणीव, जे. के. मीडीया, डिम्पल, नवचैतन्य, नीहारा, पाणिनी, भरारी, यशोदीप, वावर आदी प्रकाशन संस्था आणि त्यांचे प्रकाशक सहभागी होणार आहेत.