श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. बाबर असे या दहशतवाद्याचे नाव सून तो 2018 पासून शोपियान आणि कुलगाममध्ये सक्रीय होता. कुलगाम येथे बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत चाचलेल्या चकमकीक बाबरला कंठस्नान घालण्यात आले.
यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्याकडून एक एके-47 रायफल, एक पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तर, या चकमकीत जम्मूचे रहिवासी पोलीस कर्मचारी रोहित चिब हे शहीद झाले आहेत. याशिवाय लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिकही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परवान भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सुरक्षा दलाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. पोलिसांचा वेढा अधिक कडक झाल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांकडूनही गोळीबार सुरू झाल्याने चकमक सुरू झाली. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी बाबरचा जवानांनी खात्मा केला.
यासंदर्भात काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी बाबर मारला गेला आहे. त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यात एक पोलीस शहीद झाला आहे. लष्कराचे तीन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे आयजी विजयकुमार यांनी स्पष्ट केले.