Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीआता केवळ स्मृती उरल्या

आता केवळ स्मृती उरल्या

आनंद भाटे , प्रख्यात गायक

लहानपणापासून रामदासजींची गाणी कानावर पडली होती. त्यामुळे त्या कोवळ्या वयामध्ये ‘नाट्यक्षेत्रातलं एक मोठं नाव’ अशी त्यांची छबी मनावर बिंबली होती.कोणालाही आपलीशी वाटावी आणि पटकन आवडावी अशी त्यांची गायकी होती. त्यांची शब्द उच्चारण्याची, ताना घेण्याची पद्धत या सगळ्यांतच सहजता होती. रामदासजींचा स्वभावही अत्यंत पारदर्शी होता. कलाकाराबरोबरच माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. स्वभावातला प्रामाणिकपणा त्यांच्या गाण्यात स्पष्ट दिसायचा. त्यांच्या गाण्यात कधीही मुद्दाम केलेले गिमिक्स दिसले नाहीत. अतिशय छान आणि सुस्पष्ट मांडणी हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं तर, त्यांची गायकी इतकी छान होती की, कधी गिमिक्स करण्याची गरजच भासली नाही.

संगीत रंगभूमीवरचं त्यांचं योगदानही खूप मोठं आहे. त्यांनी नव्या-जुन्या संगीत नाटकांचे शेकडो प्रयोग केले. ते शेवटपर्यंत गायनसेवेत रममाण राहिले. त्यांनी उतारवयात गायलेलं गाणं मी ऐकलं आहे. पण त्या गाण्यातही त्यांनी तरुणवयात गायलेल्या गाण्यातली तडफ, उत्साह टिकून असल्याचं जाणवलं होतं. म्हणजेच शरीराचं वय पुढे गेलं असलं तरी, त्यांच्या गाण्यातल्या तजेला मात्र कायम होता. याचं मर्म नक्कीच त्यांच्या अनेक वर्षांच्या गानसाधनेत दडलं होतं. अन्य कलाकारांचं मनमुराद कौतुक करणं, हे रामदासजींचं स्वभाववैशिष्ट्य होतं. यातूनही त्यांच्या महान आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडत असे.

भीमसेनजींनी संगीत दिलेल्या ‘धन्य ते गायनी’ या नाटकातली गाणी रामदासजींनी गायली होती. रामदासजींची सगळीच गाणी संस्मरणीय आहेत. त्यातही ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ ही गाणी मला विशेष आवडतात. यातून अभिषेकीवुवांच्या चाली आणि रामदासजींचं गायन यांच्या मंगल मिलापाचा आनंद मिळतो. कार्यक्रमांच्या निमित्तानं बरेचदा माझी आणि त्यांची भेट होत असे. एका वैयक्तिक समारंभात त्यांची माझी मैफल आयोजित केली होती. माझ्या दृष्टीनं तो एक सुंदर योग होता. रामदासजींच्या अशा अनेक स्मृती कायम आपल्यासवे राहतील. त्यांना श्रद्धांजली…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -