मुंबई :कोरोनाच्या महासंकटामुळे लांबणीवर पडलेल्या १३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव अर्थातच भारत श्री स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. तामिळनाडूचा एम. सर्वानन उपविजेता ठरला. रेल्वे स्पोर्टसने सांघिक विजेतेपद पटकावले. तामिळनाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
‘भारत श्री’च्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी सागरसमोर तामिळनाडूचा एम. सर्वानन आणि आर. कार्तिकेश्वर यांचे आव्हान होते. पीळदार पोझेसनी जजेसना मोहित करताना सागरने पहिल्यांदा ‘भारत श्री’वर नाव कोरले. कोरोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता. मात्र ‘भारत श्री’ स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. सागर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत फक्त आपल्या ८० किलो वजनी गटात विजेता व्हायचा, पण आज त्याने त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.
७० किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडूच सोने जिंकू शकला. गतवर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला महेंद्र चव्हाण हा ९०किलो वरील गटात दुसरा आला. याव्यतिरिक्त फिटनेस फिजीक गटात अचल कडवेने बाजी मारली.
या स्पर्धेत वैयक्तिक पुरस्कारांमध्ये बेस्ट पोझरचा पुरस्कार एस. कृष्णा रावने ( भारतीय पोस्ट) मिळवला. सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू म्हणून नितीन चंडिला याला (हरयाणा) गौरवण्यात आले.